Investigating a photo of Buddha’s tooth relic: बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या धर्माच्या मार्फत भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. त्यामुळेच आजही आशियातील अनेक देशांमध्ये भारतीय संस्कृतीची पाळंमुळं सापडतात. या बाबतीत श्रीलंका अग्रेसर आहे. भारत आणि श्रीलंकेला विलग करणारा समुद्र असला तरीही सांस्कृतिक नाळ आजही अबाधित आहे.
रामायण, बौद्ध धर्म या दोन्ही परंपरांनी हा बंध अधिकच दृढ केला आहे. याच बंधातील एक दुवा सध्या विशेष चर्चेत आहे. तो म्हणजे गौतम बुद्धांच्या दंत अवशेषाचा फोटो. गौतम बुद्धांच्या पवित्र दाताच्या अवशेषाचा दुर्मिळ फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यामुळे श्रीलंकेतील पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) या फोटोची सत्यता तपासण्यासाठी चौकशी सुरु केली आहे. या तपासाचा उद्देश्य वायरल झालेला डिजिटल फोटो सर्व प्लॅटफॉर्मवरून डिलीट झाला आहे की नाही याची खातरजमा करणे हा आहे.
या फोटो भोवती फिरणारा नेमका वाद काय आहे? (Why is the image causing a stir?)
गौतम बुद्धांचा दंत अवशेष हा कँडी शहरातील प्रसिद्ध टेंपल ऑफ द टूथ या मंदिरात आहे. NewsX ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सध्या वायरल होणारा फोटो हा याच मंदिरातून घेतल्याचा दावा आहे. अलीकडेच गौतम बुद्धांचे दंत अवशेष हे सार्वजनिक दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हा अवशेष सार्वजनिक प्रदर्शनासाठी फारच कमी वेळा ठेवण्यात येतो. १६ वर्षांनंतर प्रथमच राष्ट्रपती अनुर कुमार दिसानायके यांच्या विनंतीवरून हा दंत अवशेष काटेकोर सुरक्षेअंतर्गत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी फोटो काढण्यास सक्त मनाई होती. किंबहुना मंदिरात प्रवेश करताना भाविकांची तपासणी केली जाते. कुठल्याही प्रकारच्या वस्तू मंदिरात नेण्यास परवानगी नाही. मोबाइल फोन वापरणेही पूर्णतः निषिद्ध आहे. त्यामुळेच इतका कडेकोट बंदोबस्त असताना जर फोटो घेतला असेल तर ही गंभीर बाब असल्याचे मानले जात आहे.
हा दंत अवशेष भारतातून श्रीलंकेत पोहोचला कसा?
महापरिनिब्बान सुत्तात नमूद केल्याप्रमाणे, गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या चार दातांचे अवशेष मागे शिल्लक होते. त्यातील दोन दातांपैकी एक त्रायस्त्रिंश देवांच्या लोकात आणि दुसरा नागराजाच्या राज्यात होता. तर उरलेले दोन दंत अवशेष पृथ्वीवर गंधार आणि कलिंगमध्ये होते. महावंस आणि दाठावंस या ग्रंथामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, गौतम बुद्धांवरील अंत्यसंस्कारानंतर त्यांचा डावा ‘canine tooth’ त्यांचे शिष्य खेमा यांना प्राप्त झाला. खेमा यांनी हा दंत अवशेष कलिंगच्या ब्रह्मदत्त राजाला पूजा करण्यासाठी दिला आणि तो दंतपुरा (आधुनिक दंतपुरम) येथे ठेवण्यात आला होता. याच कालखंडात हा दात ज्याच्याकडे असेल त्याला सर्व प्रकारची कीर्ती मिळते अशी वदंता पसरली. त्यामुळे कलिंगचा गुहसीव राजा आणि पांडू राजा यांच्यात युद्ध झाल्याचा उल्लेख दाठावंसमध्ये आहे. प्रचलित दंतकथेनुसार, कलिंगमध्ये झालेल्या संघर्षानंतर हा दंत अवशेष श्रीलंकेतील अनुराधापूर येथील अभयगिरी विहारात नेण्यात आला. त्यानंतर श्रीलंकेच्या बदलत्या राजधानीप्रमाणे या अवशेषांचेही स्थान बदलत होते. अखेरीस, हा दंत अवशेष कॅंडी शहरात नेण्यात आला आणि सध्या तो दंतमंदिरात (Temple of the Tooth) आहे. मात्र, ब्रिटिश इतिहासकार चार्ल्स बॉक्सर यांचे म्हणणे वेगळे होते. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे, गोवाच्या बिशपने १५५० च्या सुमारास स्थानिक धर्म नष्ट करण्याच्या प्रयत्नात बुद्धधर्मासाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा हा दात जाहिरपणे खलबत्त्यामध्ये कुटून नष्ट केला होता. परंतु, त्यांनी मांडलेल्या या गृहीतकाची सत्यता सिद्ध करणारे पुरावे नाहीत.
पोलिस तपास कसा करत आहेत? (How is the police investigating the matter?)
सध्या श्रीलंकन सरकारने गुन्हे अन्वेषण विभागाला वायरल फोटोची सत्यता तपासण्याचे आदेश दिले आले आहेत. हा फोटो नेमका कधी काढण्यात आला हे तपासण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहे. हा फोटो भाविकांपैकी कोणी घेतला आहे का? किंवा कृत्रिमरीत्या तयार करण्यात आला आहे, याची पडताळणी सध्या पोलीस करत आहेत.
बुद्धांच्या दाताच्या अवशेषाचे महत्त्व काय आहे? (What is the importance of the tooth relic?)
हा पवित्र दात केवळ धार्मिकच नव्हे, तर श्रीलंकेतील राजकीय सार्वभौमत्वाचं प्रतीक मानला जातो. ऐतिहासिक नोंदीनुसार, हा दंत अवशेष १५९० साली कँडी शहरात आला. Press Trust of India ने दिलेल्या वृत्तानुसार, पारंपारिकरित्या हा दंत अवशेष कधीच सार्वजनिकरित्या दर्शनासाठी ठेवला जात नव्हता. या पवित्र स्थळी मुख्य प्रवेश पूर्वी केवळ राजांना आणि काही महत्त्वाच्या भिक्षूंनाच होता. मात्र, आधुनिक कालखंडात दर्शनासाठी सामान्य लोकांनाही प्रवेश देण्यात आला. परंतु, लांबूनच दर्शन घेण्याची परवानगी आहे. यावेळी सार्वजनिक प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच सुमारे १,२५,००० भक्तांनी मंदिराला भेट दिली. हे प्रदर्शन दररोज पाच तासांहून अधिक वेळ खुलं आहे. हे १० दिवसांचं प्रदर्शन २७ एप्रिलला संपणार आहे. या दर्शनासाठी आलेल्या प्रचंड गर्दीमुळे कँडी शहरात वाहतूक विस्कळीत झाली असून हजारो भक्त रात्रभर मंदिर परिसरात ठाण मांडून बसले होते.