आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या ‘युनायटेड हेल्थकेअर’ या कंपनीच्या सीईओची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना संशयित म्हणून लुइगी मँगिओन याला सोमवारी (९ डिसेंबर) ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याच्याकडून ‘घोस्ट गन’ जप्त करण्यात आली. तेव्हापासून ‘घोस्ट गन’ हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरू लागला आहे. ‘घोस्ट गन’ म्हणजे काय? गुन्हेगारांमध्ये याचा वापर का वाढला आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
मँगिओनची बंदूक थ्रीडी प्रिंटर वापरून तयार केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. ही घरगुती शस्त्रे आहेत; जी विविध थ्रीडी मुद्रित भाग, जसे की धातू आणि प्लास्टिक यांच्या संयोजनाने तयार केली जातात. एकेकाळी अमेरिकेमध्ये घोस्ट गन हा लोकांच्या आवडीचा विषय होता. लोक छंद म्हणून घोस्ट गन स्वतःजवळ ठेवत असत. हे अमेरिकन स्वातंत्र्यवादाचे प्रतीक होते. तंत्रज्ञानाद्वारे या घोस्ट गन विकसित करण्यात आल्या असून, त्यांच्याद्वारे प्राणघातक हल्लेदेखील केले जात आहेत. घोस्ट गनचा शोध घेणे कठीण असल्यामुळे गुन्हेगारांमध्ये त्याच्या वापराचे प्रमाण वाढत आहे. या बंदुकांमध्ये इतर बंदुकांप्रमाणे चिन्हांकित केलेले आकडे किंवा ठरावीक क्रमांक नसतो. त्यामुळे पोलिसांना किंवा तपास पथकाला एखाद्या व्यक्तीचा शोध घ्यायचा असल्यास वैयक्तिक खरेदीदाराकडे जाऊन शोध घेणे कठीण होते. या बंदुकांसाठी व्यावसायिक बंदूक विक्रीकरिता आवश्यक असलेल्या परवान्याचीही गरज नसते.
अमेरिकेत घोस्ट गन ही एक मोठी समस्या?
घोस्ट गनला औपचारिकपणे प्रायव्हेटली मेड फायरआर्म्स (पीएमएफ) म्हणून ओळखले जाते, या बंदुकांचा धोका अमेरिकेमध्ये वाढत आहे. मुख्यतः त्यांचा शोध घेता येत नसल्याने २०२२ मध्ये यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने घरगुती जप्तीमध्ये २५,७८५ घोस्ट गन जप्त केल्या. अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी संस्थांनी २०१७ ते २०२१ दरम्यान सुमारे ३८,००० संशयित घोस्ट गन जप्त केल्या. २०२१ मध्ये १९,२७३ घोस्ट गन जप्त केल्या गेल्या. त्याच्या तुलनेत २०२० मध्ये ८,५०४ घोस्ट गन जप्त करण्यात आल्या, असे यूएस ब्युरो ऑफ अल्कोहोल, टोबॅको, फायरआर्म अॅण्ड एक्सपलोझिव्ह (एटीएफ) च्या २०२१ च्या अहवालात म्हटले आहे. यातून एका वर्षात या बंदुकांच्या वापराचे प्रमाण दुप्पट झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
अमेरिकेमध्ये घोस्ट गन कायदेशीर आहेत का?
अमेरिकेत बंदूक नियंत्रण हा एक ध्रुवीकरणाचा मुद्दा राहिला आहे. २०२२ मध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक नवीन नियम स्थापित केला. या नियमामुळे घोस्ट गनला व्यावसायिक बंदुकांसारखेच नियम असणे अनिवार्य केले गेले; ज्यात खरेदीदारांसाठी अनुक्रमांक आणि पार्श्वभूमी तपासणी या बाबींचा समावेश करण्यात आला. परंतु, या उपायाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. अद्याप या प्रकरणात अंतिम निर्णय जारी करण्यात आलेला नाही.
हेही वाचा : चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताला रशियाची मदत! काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली?
घोस्ट गनचे समर्थक म्हणतात की, घोस्ट गनचा वापर केवळ छंद म्हणून केला जातो. त्यांचा असाही युक्तिवाद आहे की, लोकांना अशी शस्त्रे तयार करण्याचा अधिकार दुसऱ्या दुरुस्तीच्या अंतर्गत आहे; ज्यात अमेरिकन नागरिकांना बंदूक ठेवण्याचा आणि बाळगण्याचा अधिकार असल्याचे नमूद आहे. अमेरिकेमधील प्रमुख बंदूक नियंत्रण कायदा, १९६८ च्या गन कंट्रोल कायद्यानुसार, नागरिकांना वैयक्तिक खासगी वापरासाठी बंदुका तयार करण्यास परवानगी देतो. काही नियम असे आहेत, ज्यात घोस्ट गनची खरेदी करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या घोस्ट गनची नोंदणी केलेली असावी किंवा ती शोधण्यायोग्य असणे आवश्यक आहे; जोपर्यंत ती मालकाद्वारे विकली जात नाही.