कोकण म्हटल्यावर अनेकांना आंबा, काजू, फणस याची आठवण होते. त्यातही गोवा म्हटलं की, काजू विशेषत्वाने आठवतो. परंतु, काजू ही गोव्याची विशेष ओळख कशी ठरली ? काजू उत्पादनातून गोव्याची उभी राहणारी अर्थव्यवस्था, गोव्यात काजूला विशेषत्वाने ओळख कशी मिळाली आणि जीआय टॅग मुळे काजू उत्पादनाला फायदा होईल का, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक स्तरावर गोव्यातील काजूला विशेष ओळख आहे. गोव्यामध्ये उत्पादित होणाऱ्या काजूचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन गोव्यातील काजूला जीआय टॅग देण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काजू उत्पादनाला मिळालेला जीआय टॅग हा गोव्याच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेतील मैलाचा दगड आहे, असे म्हटले आहे. विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उत्पादित होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांना जीआय टॅग देण्यात येतो. या जीआय टॅगमुळे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत त्या घटकाला ओळख प्राप्त होते. चेन्नईतील जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रीने हा जीआय टॅग दिला आहे.

गोव्यामध्ये काजूचे उत्पादन कधीपासून होऊ लागले?

काजू हे लॅटिन अमेरिकेतील ईशान्य ब्राझीलचे मूळ उत्पादन आहे. पोर्तुगीजांनी १६व्या शतकात काजू प्रथम गोव्यामध्ये आणला. गोवा काजू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (जीसीएमए) जीआयकरिता सादर केलेल्या ऐतिहासिक नोंदीनुसार ख्रिश्चन मिशनरींनी लॅटिन अमेरिकन देशांतून काजू गोव्यामध्ये आणला आणि त्याची लागवड गोव्यामध्ये केली.

म्युरेले मारिया लिओनिल्डेस दा कोस्टा यांच्या ‘हिस्ट्री ऑफ ट्रेड अँड कॉमर्स इन गोवा १८७८-१९६१’ या संशोधन प्रबंधानुसार, गोव्यातील पहिले काजू प्रक्रिया केंद्र १९२६ मध्ये उभारण्यात आले. १९३० मध्ये पहिल्यांदा गोअन काजू विक्रीसाठी सिद्ध झाला. दा कोस्टा यांच्या प्रबंधानुसार, १९६१ मध्ये गोवा स्वतंत्र होण्याच्या दशकात २० लाख रुपयांहून अधिक प्रक्रिया केलेल्या काजूंची निर्यात करण्यात आली. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, जपान, सौदी अरेबिया आणि पश्चिम जर्मनीमध्ये सुमारे १५०० टन प्रक्रिया केलेले काजू निर्यात केले जात होते. काजू उत्पादनाकरिता १९५९-६० मध्ये मोझांबिकमधून कच्चा माल आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आले. तसेच परदेशी बाजारपेठा खुल्या करून देण्यात आल्या. या काजू उद्योगाशी संबंधित अन्य घटकांनाही चालना मिळाली. परिणामी १९६१ मध्ये गोव्याच्या अर्थव्यवस्थेत ६० टक्के वाटा हा गोअन काजूचा होता.

गोव्यातील काजूला का देण्यात आला जीआय टॅग?

मागील आठवड्यात गोव्यातील काजूला जीआय टॅग देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे गोव्यातील काजूला नक्कीच महत्त्व प्राप्त होणार आहे. काजू उत्पादन हे कोकण परिसरासह अन्य राज्यांमध्येही अनेक ठिकाणी होते. पण, गोव्यातील काजू हा अन्य काजूंपेक्षा वेगळा असतो. चव आणि रंग यामध्ये गोव्यामध्ये उत्पादित होणारा काजू वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. जीआय टॅग मिळाल्यामुळे गोव्यातील काजू आणि बाहेरील राज्यांमध्ये उत्पादित होणारा काजू यातील फरक लक्षात येण्यास मदत होईल. बाहेरील राज्यातील काजू अनेक वेळा गोव्यातील काजू म्हणून विकून ग्राहकांची फसवणूक करण्यात येते. ही टाळण्यासाठी गोव्यातील काजूला मिळालेला जीआय टॅग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

गोव्यातील काजूला मिळालेला जीआय टॅग हा ‘गोअन कॅश्यू’साठी आहे. ‘कॅश्यू’ हा शब्द पोर्तुगीज caju या शब्दावरून आलेला आहे. कोंकणी भाषेतही काजू (kaju) असे म्हणतात. हा जीआय टॅग मिळावा, यासाठी गोवा काजू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने गोवा सरकारच्या सहकार्याने प्रयत्न केले. स्टेट कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे पेटंट फॅसिलिटेशन सेंटरचे नोडल ऑफिसर दीपक परब यांनी जीआय टॅगविषयी अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले की, ”गोवन काजू हा जीआय लोगोसह विक्रीसाठी येईल. जे व्यापारी त्यांच्या व्यवसायाची नोंदणी करतील, काजू उत्पादन नोंदणीकृत असेल, त्यांनाच हा जीआय टॅग वापरता येणार आहे. गोवा काजू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (जीसीएमए)चे अध्यक्ष रोहित झांट्ये यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. ”गोव्यामध्ये उत्पादित होणारा काजू हा गोव्याच्या अस्मितेचा एक मुख्य, अविभाज्य भाग आहे. तसेच अन्य कोणत्याही ठिकाणी उत्पादित होणाऱ्या काजूपेक्षा गोव्यामध्ये उत्पादित होणारा काजू हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. पर्यटक गोव्यात येतात तेव्हा आणि गोव्यातून परत जातानाही काजू घेऊन जातात. गोवा म्हणजेच काजू असे समीकरण झालेले आहे. पण अन्य राज्यातून काजू गोव्यात स्वस्तात आणला जातो आणि त्याची ‘गोअन काजू’ म्हणून विक्री करण्यात येते. यामुळे मूळ गोव्यात उत्पादित होणाऱ्या काजूच्या अस्मितेला धोका निर्माण होतो,” असे रोहित झांट्ये यांनी सांगितले.

गोव्यातील कळंगूट येथे सुमारे ३०० हून अधिक काजूची विक्री करणारी दुकाने आहेत. या दुकानांमध्ये बेनिन, घाना, आयव्हरी कोस्ट, टांझानिया आणि भारताच्या अन्य राज्यांमधून गोव्यामध्ये काजू आणला जातो. हा काजू ‘गोअन काजू’ म्हणून विकण्यात येतो. या दुकानदारांकडून करण्यात येणारे पॅकिंग, काजूचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असतो. त्यामुळे पर्यटक गोव्यातील काजूविषयी तक्रारी करतात. याचा परिणाम पर्यायाने ‘गोवा ब्रँड’वर होतो.

गोव्यामध्ये इतर ठिकाणांहून आयात केलेला काजू स्वस्तात विकण्यात येऊ लागला. त्यामुळे गोव्यामध्ये उत्पादित होणाऱ्या काजूची मागणी घसरली. विक्री कमी होऊ लागली. गोअन काजूला गोव्यातच बाजारपेठ मिळेनाशी झाली. २००५मध्ये ४० हून अधिक काजूप्रक्रिया केंद्रे आता १५ पेक्षाही कमी आहेत. याला कारण बाहेरून येणारा काजू ठरत आहे, असेही रोहित झांट्ये यांनी सांगितले.

गोव्यामध्ये काजूची विक्री करणाऱ्या एका उत्पादकानेही बाहेरून येणाऱ्या काजूचा स्थानिक उत्पादनावर होणारा परिणाम सांगितला. बाहेरील काजू दर्जाहीन असला तरी तो स्वस्तात मिळतो. सामान्य ग्राहकाला गोअन काजू आणि आयात केलेला काजू यातील फरक सहसा कळत नाही. त्यामुळे तेसुद्धा स्वस्तात मिळणारा काजू खरेदी करतात. ते ज्या किंमतीत काजू विकतात त्या किंमतीत गोअन काजू विकणे शक्य नाही. त्यामुळे आमची गोव्यातील काजूची विक्री कमी झाली.

गोअन काजूला जीआय टॅग कसा ठरेल महत्त्वपूर्ण ?

जीसीएमए सदस्य माधव सहकारी यांनी जीआय टॅगसह बेकायदेशीर काजू विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. कारण, पर्यटकांना जीआय टॅग असणारा मूळ गोअन काजू आणि बेकायदेशीररित्या स्वस्तात मिळणारा काजू यातील फरक समजणार नाही. व्यापाऱ्यांना बेनिन काजूच्या विक्रीमुळे गोअन काजूपेक्षा अधिक फायदा झाला होता. गोव्यातील स्थानिक उत्पादक संघटित नसल्यामुळे ते व्यापारी स्पर्धा करू शकत नाहीत. पर्यायाने आयात केलेल्या काजूला चांगला भाव मिळतो, असेही सहकारी यांनी स्पष्ट केले.

यामुळे गोअन काजूला मिळालेला जीआय टॅग हा निर्णय स्तुत्यच आहे, तसेच गोव्यामध्ये होणाऱ्या बेकायदेशीर काजू विक्रीवरही बंधने आणणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gi tag now required on cashew nuts know how cashew became a boon for goa vvk
Show comments