पृथ्वीवर पूर्वी लोकर असलेले महाकाय हत्ती अर्थात मॅमथ अस्तित्वात होते. मात्र तापमानवाढ आणि व्यापक मानवी शिकार या कारणांमुळे कालांतराने हे हत्ती नष्ट झाले. आता पुन्हा अशा प्रकारच्या हत्तींची प्रजाती निर्माण करण्यासाठी अमेरिकी जीवशास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी उंदरांवर प्रयोग केले आहेत. शास्त्रज्ञांनी नेमका काय प्रयोग केला आहे आणि हा प्रयोग यशस्वी होईल का, याविषयी…

अमेरिकी जीवशास्त्रज्ञांची योजना काय?

कोलोसल बायोसायन्सेस नावाची एक अमेरिकी जैवविज्ञान कंपनी, शतकानुशतके नामशेष झालेल्या प्राण्यांना पुन्हा जिवंत करण्याचा उपक्रम बऱ्याच काळापासून राबवत आहे आणि भूतकाळात त्यांनी त्यांच्या संशोधनात मिळवलेल्या यशांबद्दल काही घोषणा केल्या आहेत. लोकर असलेले महाकाय हत्ती म्हणजेच मॅमथला पुनरुज्जीवित करण्याची त्यांची योजना आहे. या कंपनीच्या शास्त्रज्ञांनी आशियाई हत्तींमध्ये अनुवांशिकरीत्या बदल करून त्यांना लोकरीचे मॅमथ गुणधर्म देण्याची योजना आखली आहे. त्यांना आशा आहे की २०२८ च्या अखेरीस अशा प्रकारच्या हत्तीचे पहिले पिल्लू जन्माला येईल. कोलोसलचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बेन लॅम म्हणाले की, शास्त्रज्ञांचा चमू प्राचीन मॅमथ जीनोमचा अभ्यास करत आहे आणि त्यांची तुलना आशियाई हत्तींच्या जीनोमशी करत आहे, जेणेकरून ते कसे वेगळे आहेत हे समजून घेता येईल. पेशींचे जीनोम-संपादन आधीच सुरू केले आहे.

यशस्वी होण्यासाठी कोणते प्रयोग?

लोकरी मॅमथला पुन्हा जिवंत करण्यासाठी शास्त्रज्ञ उंदरांवर प्रयोग करत आहेत. त्यासाठी त्यांनी लोकर असलेले उंदीर तयार केले आहेत. जनुकीयदृष्ट्या सुधारित उंदरांमध्ये थंडी सहनशीलतेसाठी सज्ज असलेले गुणधर्म असतात, हत्तींमध्ये बदल करण्याच्या दिशेने हे एक पाऊल पुढे मानले जात आहे. या संशोधनाचा अद्याप इतर संशोधकांनी आढावा घेतलेला नाही. मात्र चमूने अनेक जीनोम एडिटिंग तंत्रांचा वापर केला, ज्यामध्ये फलित उंदरांच्या अंड्यांना अनुवांशिकरीत्या सुधारित केले गेले किंवा भ्रूण उंदरांच्या स्टेम सेल्समध्ये बदल केले गेले आणि त्यांना सरोगेट्समध्ये रोपण करण्यापूर्वी उंदरांच्या भ्रूणांमध्ये इंजेक्ट केले गेले. शास्त्रज्ञांनी केसांचा रंग, पोत, लांबी, नमुना किंवा केसांच्या कूपांशी संबंधित नऊ जनुकांना विस्कळीत करण्यावर लक्ष केंद्रित केले. यापैकी बहुतेक जनुके निवडली गेली, कारण ती आधीच उंदरांच्या आवरणांवर प्रभाव पाडण्यासाठी ज्ञात होती. मॅमथमध्ये दिसणारे शारीरिक गुणधर्म निर्माण होतील का याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष दिले. मॅमथला सोनेरी केस असत, याकडेही शास्त्रज्ञांनी प्रयोग करताना लक्ष वेधले. उंदरांमध्ये लक्ष्यित दोन जनुके मॅमथमध्येदेखील आढळली, जिथे त्यांनी लोकरीच्या आवरणात योगदान दिले आहे असे मानले जाते. शास्त्रज्ञांनी उंदरांमध्ये चरबीचे चयापचय करण्याच्या पद्धतीशी संबंधित एक जनुकही विस्कळीत केले आणि ते मॅमथमध्येही आढळले. थंड वातावरणात राहण्यासाठी ते महत्त्वाचे होते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. 

या प्रयोगात काय दिसले?

शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांमुळे उंदरांची पिल्ले निर्माण झाली नाहीत, तरी जन्माला आलेल्या उंदरांमध्ये लोकरीचे केस, लांब केस आणि सोनेरी-तपकिरी केस अशा विविध प्रकारच्या केसांचे संयोजन होते. तथापि, चरबीच्या चयापचयाशी संबंधित जनुक बदलले गेले किंवा नाही तरीही त्यांचे सरासरी शरीर वजन समान होते. काही महिन्यांत या उंदरांच्या वर्तणुकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. थंड वातावरणात ते कसे जुळवून घेतात, हे पाहण्यात येईल, असे कोलोसलचे मुख्य विज्ञान अधिकारी बेथे शापिरो यांनी सांगितले. मॅमथना निर्माण करण्यासाठी जनुकांमध्ये बदल करणे खूप गुंतागुतीचे आहे. कारण प्राणी केवळ मॅमथसारखे दिसू नयेत तर त्यांच्यासारखे वागावेत यासाठी अनुवांशिक बदलांची आवश्यकता असेल की नाही हे स्पष्ट नव्हते, असे त्यांनी सांगितले.

लोकर असलेल्या हत्तींच्या अस्तित्वाविषयी…? 

लोकर असलेले हत्ती ५० लाख वर्षांपूर्वी जिवंत होते. आफ्रिका, युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत त्यांचे अस्तित्व होते. तापमानवाढ आणि मानवी शिकारी यांमुळे इतर अनेक प्राण्यांप्रमाणे हे प्राणी नामशेष झाले. या महाकाय हत्तींची सापडलेली जीवाश्म हाडे, दात यांवरून त्यांच्या शरीररचनेचा अभ्यास करण्यात आला आणि त्या हत्तींच्या शारीरिक वैशिष्ट्यांबद्दल माहिती मिळाली. सायबेरिया आणि अलास्कामध्ये गोठलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्यावर अभ्यास करणे अधिक सुलभ झाले. त्याशिवाय काही प्रागैतिहासिक गुहांमध्येही या प्राण्यांची चित्रे आढळली आहेत. या हत्तींच्या स्वरूपाची कल्पना या चित्रांमुळे करता येऊ शकते. लोकरी मॅमथ हे आधुनिक आफ्रिकी हत्तींच्याच आकाराचे होते. शरीरावर लोकर असल्याने ते थंड वातावरणाशी जुळवून घेत होते. त्यांचे दात चांगले लांबलचक होते. अगदी १५ फुटांपर्यंतही त्यांच्या दातांचा आकार होता.  

sandeep.nalawade@expressindia.com