सध्याचे जग हे सोशल मीडियाचे जग आहे. प्रत्येकजण आपले सुख, दु:ख सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. काही लोक तर आपल्या आयुष्यातील काही खास क्षण कॅमेऱ्यात कैद करून ते सोशल मीडियावर शेअर करतात. काही दिवसांपूर्वी एका तरुणीने सोशल मीडियावर आपल्या प्रियकराला प्रपोज करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या तरुणीने थेट केदारनाथ मंदिर परिसरात आपल्या प्रियकराला प्रपोज केले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. काही लोकांनी या तरुणीचे समर्थन केले आहे, तर काही लोकांनी मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी असे कृत्य करणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके काय आहे? हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर प्रशासन समितीने काय काय भूमिका घेतली? लोकांनी काय भावना व्यक्त केल्या? हे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके प्रकरण काय आहे?

विशाखा फुलसुंगे या यूट्यूबरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ केदारनाथ मंदिर परिसरातील आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियामध्ये चांगलाच वाद रंगला आहे. व्हिडीओत विशाखा फुलसुंगे ही तरुणी आणि तिच्या बाजूला उभा असलेल्या तरुण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत. सुरुवातीला हे दोघेही प्रार्थना करताना दिसत आहेत. त्यानंतर अचानकपणे व्हिडीओतील तरुणीने गुडघ्यावर बसत बाजूला उभ्या असलेल्या तरुणाला प्रपोज केले आहे. मंदिर परिसरातच या तरुणीने व्हिडीओतील तरुणाच्या बोटात अंगठीदेखील घातली आहे. शेवटी व्हिडीओमध्ये दोघांनीही एकमेकांना मिठी मारल्याचे दिसत आहे.

तरुणीच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय आहे?

तरुणीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओसोबत तिने आपल्या प्रियकराला प्रपोज करण्यासाठी कसे नियोजन केले याबद्दल सांगितले आहे. “गेल्या कित्येक महिन्यांपासून या क्षणासाठी मी प्लॅनिंग (सारखेच पकडे, अंगठीचा आकार, प्रवासाची तयारी) करत होते. हा क्षण आज सत्यात उतरला. समुद्रसपाटीपासून ११ हजार ७५० फूट उंचीवर असलेल्या केदारनाथ मंदिर परिसरात मी त्याला आज ऑफिशियली लग्नासाठी विचारणा केली आहे. हे स्थळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे,” असे या तरुणीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

“धार्मिक स्थळाप्रति आदार ठेवायला हवा”

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “धार्मिक स्थळाप्रति आदार ठेवायला हवा. लोक मोठ्या श्रद्धेने तसेच मेहनत घेऊन केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात. तुमच्यासारखे लोक हेलिकॉप्टरने प्रवास करतात. मंदिर परिसरात सारखे कपडे परिधान करतात. तुमच्यासारख्या लोकांना सामान्यांच्या श्रद्धेची काय कल्पना असणार? तुम्ही प्रसिद्ध होण्यासाठी अशा प्रकारचा ड्रामा करता,” अशी भावना एका नेटकऱ्याने व्यक्त केली.

“मंदिराच्या परिसरात मोबाईल वापरण्यावर बंदी घालावी”

तसेच “याच कारणामुळे धार्मिक स्थळांच्या परिसरात स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातली पाहिजे. मंदिराच्या २० किलोमीटर परिसरात फोन वापरण्यास बंदी घातल्यास तेथील अनावश्यक गर्दी लगेच कमी होईल,” अशी भावना आणखी एका नेटकऱ्याने व्यक्त केली.

काही लोकांनी मात्र तरुणीला दिला पाठिंबा..

सोशल मीडियावर काही लोकांनी या तरुणीला पाठिंबा दिला आहे. “मला या व्हिडीओमध्ये काहीही चुकीचे वाटले नाही. मुळात हा व्हिडीओ खूप छान आहे. भारतात लग्न हे मंदिरातच होतात. जर एखादी जोडी भगवान श्री केदार यांच्या साक्षीने सोबत राहण्याची शपथ घेत असेल तर यात चुकीचे काहीही नाही. या व्हिडीओमधील जोडीने योग्यरित्या कपडे परिधान केलेले आहेत. आजच्या काळात तरुणांचा हिंदू देव-देवतांवर विश्वास असणे हे चांगलेच आहे,” अशी भावना एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्यक्त केली. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने व्हिडीओतील जोडी त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण भगवान महादेवाला साक्ष ठेवून साजरा करत आहेत, याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे, अशी भावना व्यक्त केली आहे.

कोणाचेही नाव न घेता पोलिसांत तक्रार

मात्र या व्हिडीओवर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने आक्षेप घेतला आहे. मंदिर समितीने कोणाचेही नाव न घेता पोलिसांकडे तक्रार केली आहे. अशा प्रकारांवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी मंदिर समितीने केली आहे. अशा कृत्यांमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावत आहेत, असेही मंदिर समितीने म्हटले आहे.

मंदिर समितीने घेतला आक्षेप

“काही यूट्यूबर्स आणि इन्स्टाग्राम एन्फ्लुएन्सर्स मंदिराच्या परिसरात व्हिडीओ तयार करत आहेत. हे व्हिडीओ यूट्यूब शॉर्ट्स तसेच इन्स्टाग्राम रील्स म्हणून अपलोड केले जात आहेत. मंदिरात देवाच्या दर्शनाला जगभरातून भक्त येत असतात. अशा कृत्यांमुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत,” असे मंदिर समितीने म्हटले आहे. मंदिर समितेचे कार्यकारी अधिकारी रमेश चंद्र तिवारी यांनी अशा प्रकारांवर आळा बसावा यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

मंदिर समितीत मोबाईल बंद ठेवण्याचे आवाहन

मंदिर समितीने वरील मागणी केल्यापासून केदारनाथ मंदिराच्या परिसरात मोबाईल बंद ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. आगामी काळात मंदिर परिसरात येताना मोबाईल बाहेर ठेवण्यासाठी व्यवस्था केली जाणार, असल्याचेही सांगितले जात आहे.

यापूर्वी अशाच प्रकारे झाला होता वाद

मंदिर समितीने केदारनाथ मंदिर परिसरात व्हिडीओ काढण्यास मनाई केल्याचा हा पहिल प्रसंग नाही. गेल्या वर्षाच्या मे महिन्यात रोहन त्यागी नावाच्या एका ब्लॉगरच्या विरोधात मंदिर समितीने पोलिसांत तक्रार केली होती. हा तरुण मंदिराच्या परिसरात त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन आला होता.

मंदिर समितीने घेतला होता आक्षेप

रोहन त्यागी तसेच त्यांची महिला साथीदार ७ मे रोजी २०२२ रोजी त्यांच्या ‘नवाब’ या कुत्र्याला घेऊन केदारनाथ मंदिर परिसरात गेले होते. त्यानंतर रोहन त्यागी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांच्या पाळीव कुत्र्याने मंदिरातील नंदीचे वाकून दर्शन घेतले होते. हा व्हिडीओदेखील तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर मंदिराच्या समितीने आक्षेप घेत अशा कृत्यांमुळे धार्मिक भावान दुखावल्याज जातात, असा आरोप केला होता. तसेच पोलिसांनी योग्य ती कारवाई कारावी, अशी मागणीही केली होती.

“अशा कृत्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या”

“व्हिडीओतील ब्लॉगरने केलेले कृत्य हे आक्षेपार्ह आहे. या कृत्यामुळे ज्या लोकांची बाबा केदारनाथ यांच्यावर श्रद्धा आहे, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अशा कृत्यांमुळे मंदिराचे पावित्र्य नाहीसे होते,” अशा भावना तेव्हा केदारनाथ मंदिर समितीने व्यक्त केल्या होत्या. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर रोहित त्यागी तसेच त्याच्या महिला साथीदाराने प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मंदिर परिसरात आमच्या नवाब या कुत्र्याला सर्वजण प्रेम करत होते. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच आक्षेप घेण्यात आला, असे ते म्हणाले होते.