सिक्कीममध्ये होत असलेल्या मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे राज्याच्या उत्तरेस समुद्रसपाटीपासून १७ हजार फूट उंचीवर असलेले दक्षिण ल्होनक सरोवर गुरुवारी मध्यरात्री फुटले; ज्यामुळे सरोवरातील पाणी मोठ्या प्रमाणात खालच्या बाजूला पसरले. अचानक आलेल्या या पुरामुळे सिक्कीममध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला असून, १०२ लोक बेपत्ता आहेत. त्यामध्ये सैन्यातील २२ जवानांचाही समावेश आहे. सरोवर फुटल्यामुळे चार जिल्ह्यांतून वाहणाऱ्या तिस्ता नदीच्या (Teesta river) पाणी पातळीत मोठी वाढ होऊन मंगन, गंगटोक, पाक्योंग व नामची या जिल्ह्यांत ४ ऑक्टोबर रोजी पूर आला, अशी माहिती सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SSDMA) दिली.
प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीमच्या उत्तरेला असलेल्या ल्होनक सरोवराचा मोठा भाग फुटल्यामुळे पाण्याची पातळी अचानक ‘१५एम / सेकंद’ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली. धोक्याच्या पातळीपेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात ही पातळी असल्याचे सांगण्यात आले.
अनेक वर्षांपासून हिमनदी वितळत असल्यामुळे ल्होनक सरोवरच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत होती, तसेच त्याचा आकारही वाढत होता. याकडे अनेक संशोधकांनी लक्ष वेधून हिमनदी सरोवर फुटून पूर (Glacial Lake Outburst Flood – GLOF) येण्याची शक्यता वर्तवली होती. हिमनदी सरोवर किंवा तलाव म्हणजे काय? दक्षिण ल्होनक तलावाचा आकार का वाढत होता? ग्लोफ (GLOF) म्हणजे नेमके काय? या बाबतीत घेतलेला हा आढावा…
हे वाचा >> समजून घ्या : हिमनदीला आलेला पूर म्हणजे काय? का आणि कसा होतो याचा उद्रेक?
ग्लोफ (GLOF) म्हणजे काय?
हिमनदी वितळल्यामुळे दक्षिण ल्होनक सरोवराप्रमाणे अनेक छोटे-मोठे तलाव तयार होत असतात. अशा तलावात हिमनदीतून वाहून येणाऱ्या बर्फाची, पाण्याची भर पडत असते. त्यामुळे हे तलाव मोठमोठे होत जातात. असे तलाव बहुतेक वेळा अस्थिर बर्फ, सैल खडक आणि दगडधोंड्यांसह गाळाने तयार झालेले असतात. भूस्खलन, भूकंप किंवा हिमकडा कोसळल्यामुळे अशा तलावातील बर्फ फुटतो किंवा पाण्याची पातळी अचानक वाढते. त्यामुळे सरोवराभोवतीची सीमा तुटून पर्वताच्या खालच्या बाजूला पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहू लागते. अशा वेळी खालच्या भागात आलेल्या पुराला हिमनदी तलाव फुटून आलेला पूर किंवा ग्लोफ (GLOF) असे म्हणतात.
“ग्लोफसारखी परिस्थिती निर्माण व्हायला अनेक बाबी कारणीभूत ठरतात; जसे की, भूकंप, मुसळधार पाऊस व हिमस्खलन”, अशी माहिती न्यूझीलंडमधील कँटरबरी विद्यापीठातील डिझास्टर रिस्क अँड रेजलियन्स विभागाचे प्राध्यापक टॉप रॉबिन्सन यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. टॉप रॉबिन्सन म्हणाले की, असे तलाव हे अनेकदा उंच, डोंगराळ भागात आढळतात. त्यामुळेच भूस्खलन किंवा हिमस्खलन झाल्यामुळे त्याचा परिणाम थेट या तलावांवर होतो. त्यामुळे तलावांतील पाण्याची पातळी अचानक वाढून नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले एक प्रकारचे धरण फुटते आणि त्यातील पाण्याचा प्रवाह खालच्या दिशेने वाहू लागतो.
२०१३ ला केदारनाथ इथे झालेला विध्वंस हा अशाच घटनेमुळे झाला होता. हिमनदीपासून तयार झालेला चोराबारी तलाव फुटल्याने पाण्याचा लोंढा वेगाने खाली आला. प्रवाहाबरोबर दगडधोंडे वाहून येत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चोराबारी तलाव फुटून निर्माण झालेल्या पुरामुळे हजारो लोक मारले गेले होते.
दक्षिण ल्होनक तलाव धोकादायक कसा बनला?
जागतिक तापमानवाढ सातत्याने होत असल्यामुळे सिक्कीम हिमालयातील अनेक हिमनद्या झपाट्याने वितळू लागल्या आहेत; ज्यामुळे अनेक हिमनदी सरोवरे निर्माण होत आहेत. तसेच आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या सरोवरांचाही आकार वाढत आहे. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार सिक्कीम हिमालयात ३०० हून अधिक हिमनदी तलाव आहेत. त्यापैकी १० तलाव फुटण्याची शक्यता असून, ते असुरक्षित म्हणून ओळखले गेले आहेत.
असुरक्षित तलावांपैकीच एक आहे तो दक्षिण ल्होनक तलाव. अनेक वर्षांपासून सरकारी यंत्रणा या तलावाचे निरीक्षण करीत होत्या. सिक्कीम वन आणि पर्यावरण विभागाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, मागच्या पाच दशकांत तलावाच्या आकारमानात लक्षणीय वाढ झाली आहे. १९८९ च्या तुलनेत ल्होनक तलावामध्ये १.५ पट आणि दक्षिण ल्होनक तलावामध्ये २.५ पट वाढ झाली आहे. या तलावापासून अंदाजे ७० किमी अंतरावर भविष्यात भूकंप आल्यास हिमनदी तलाव फुटून मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते, असे अहवालात म्हटले होते.
दक्षिण ल्होनक तलावाच्या विस्ताराचा सामना करण्यासाठी सिक्कीम सरकारने काय केले?
सिक्कीम सरकारने यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिक्कीमच्या विज्ञान, तंत्रज्ञान व हवामान विभाग आणि इतरांनी मिळून दक्षिण ल्होनक तलावातील पाणी काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.
‘थ्री इडियट्स’मुळे चर्चेत आलेले सोमन वांगचूक यांच्या देखरेखीखाली हे पाणी उपसण्याचे तंत्र राबविण्यात आले. पाणी उपसण्यासाठी अधिकाऱ्यांनी आठ इंच रुंद आणि १३०-१४० मीटर लांब असलेले तीन हाय डेन्सिटी पॉलिथिलीन (HDPE) पाईप बसविले. या पाईपमधून प्रतिसेकंद १५० लिटर वेगाने पाणी बाहेर काढले गेले, अशी माहिती सिक्कीम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली.