-दत्ता जाधव
अमेरिका, चीन, ब्राझीलसह युरोपमधील बहुतेक देश दुष्काळ आणि उष्णतेच्या तीव्र लाटांच्या झळांनी अक्षरश: होरपळत आहेत. शेती, पशुधनासह अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. जागतिक समस्या बनलेल्या या दुष्काळाविषयी…
अमेरिकेतील धरणांनी तळ गाठला?
अमेरिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या धरणांनी तळ गाठला असून तेथे १९३७ नंतरची सर्वांत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक ॲन्ड स्पेस ॲडमिस्ट्रेशनने (नासा) जाहीर केलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील सुमारे २.५ कोटी लोकांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या लेक मीड या जलाशयाने तळ गाठला आहे, अशी स्थिती १९३७ नंतर प्रथमच निर्माण झाली आहे. कमी पाऊस आणि उष्णतेच्या लाटांमुळे अमेरिकेतील दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, टेक्सास, ओरेगॉन, नेवाडा, युटा आणि न्यू मेक्सिको या राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती सर्वांत गंभीर आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुष्काळाचा अमेरिकेच्या कृषी आणि पशुधनावर विपरित परिणाम होणार आहे. दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे गवतांच्या कुरणांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पशुधनाचे उत्पादन कमी होऊ शकते. शेतीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थांमध्ये दिसून येणार आहे. अन्न प्रक्रिया आणि कृषी सेवा क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होऊन प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर अन्नाच्या किमती वाढू शकतात. अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या कापूस, गहू, मका आदी पिकांचे उत्पादन घटणार आहे.
युरोपात पाचशे वर्षांतील भीषण दुष्काळ?
युरोपीय कमिशनने युरोपातील दुष्काळ ऑगस्ट २०२२, या नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे, की युरोपातील अनेक देशांना वर्षाच्या सुरुवातीपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. जुलै, ऑगस्ट महिन्यात या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. उष्णतेच्या लाटा या दुष्काळात भर टाकत आहेत. संपूर्ण युरोपातील नद्यांची पातळी घटली आहे, अनेक नद्या कोरड्या पडल्या आहेत. पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे पाणी आणि जलविद्युत क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. अन्नधान्यांसह मका, सोयाबीन आणि सूर्यफुलांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. पुढील तीन महिने नेहमीच्या परिस्थितीपेक्षा कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बीबीसी, सीएनबीसी या वृत्तवाहिन्यांसह अनेक संस्था हा पाचशे वर्षांतील सर्वांत भीषण दुष्काळ असल्याचे सांगत आहेत. जर्मनी, नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंड या देशांची अर्थवाहिनी असलेली ऱ्हाईन नदी आणि मध्य युरोपातून काळ्या समुद्रापर्यंत वाहणारी डॅन्यूब, ओडर, लोरी, पो, वाल या प्रमुख नद्यांसह युरोपातील अनेक नद्या कोरड्या पडल्या आहे. युरोपातील नद्यांवर अवलंबून असलेली ८० अब्ज डॉर्लसची अर्थव्यवस्था थंडावली आहे. संपूर्ण युरोपात आगामी वर्षात अन्नधान्यांची टंचाई निर्माण होणार आहे.
चीनच्या यांगत्से नदीचे पात्र रोडावले?
चीन ६१ वर्षांतील भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. सुमारे ४० कोटी लोकांना पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करणारी यांगत्से नदीचा प्रवाह रोडावला आहे. नदीकाठावरील भात, मक्याचे पीक अडचणीत आले आहे. या शिवाय पोयांग या सरोवरात फक्त २५ टक्के पाणीसाठा राहिला आहे. सिचुआन, हुबई, हुनान, जिआंग्शी, अनहुई, चोंगाकिंग या प्रातांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यांगत्से आशियातील सर्वात मोठी नदी असून नदीवरील जलविद्युत प्रकल्प बंद झाले आहेत. शांघायसह अन्य प्रमुख शहरातील दिवे रात्री बंद केले जात आहे, इतक्या भीषण वीज टंचाईला चीन सामोरे जात आहे. टेस्ला, टोयोटासारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पाण्याअभावी आपले प्रकल्प बंद केले आहेत.
आफ्रिकेतील देशांकडे जगाचे दुर्लक्ष?
रिजनल ह्युमेनेटेरियन ओव्हरह्यू ॲण्ड कॉल टू ऑक्शन, या संस्थेने हॉर्न ऑफ आफ्रिका ड्रॉट या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाने आफ्रिकेतील भीषण दुष्काळी स्थिती जगासमोर आणली आहे. इथिओपिया, केनिया आणि सोमालियाच्या काही भागांमध्ये सलग चार वर्षांपासून दुष्काळ आहे. आफ्रिकेतील अनेक देश उपासमारीचा सामना करत आहेत. मागील ४० वर्षांतील हा मोठा दुष्काळ असल्याचे सांगितले जात आहे. इथिओपिया, केनिया आणि सोमालियामध्ये कमीत कमी १.८६ कोटी लोक आधीच उपासमार आणि कुपोषणाचा सामना करीत आहेत. सोमालिया, इथिओपिया, केनियामधील लोकांचे जगण्यासाठी स्थलांतर सुरू झाल्याचे युनिसेफने म्हटले आहे.
जागतिक अन्नधान्यांचा बाजार काय सांगतो?
अमेरिका, चीन, युरोपीय देश आपल्या गरजेइतके अन्नधान्य पिकवितात. चीन जगातील आघाडीचा गहू आणि तांदूळ उत्पादक देश आहे. युरोपीय देश काही प्रमाणात गहू आयात करतात. पण, या देशांतील दुष्काळामुळे जागतिक बाजारात अन्नधान्यांची मागणी अचानक वाढण्याची शक्यता आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे अगोदरच तेजीत असलेल्या अन्नधान्यांच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास समृद्ध अमेरिका, चीन आणि युरोपीय देश हवी ती किंमत मोजून अन्नधान्य आयात करातील. पण, गरीब आफिक्री, अरबी देशांची संपूर्ण अन्नसुरक्षाच धोक्यात येणार आहे. जगातील मोठ्या लोकसंख्येला उपासमारीचा, कुपोषणाचा सामना करावा लागू शकतो. ‘द गार्डियन’ने दुष्काळामुळे आफ्रिकेतील २.२ कोटी लोक आजघडीला उपासमारीच्या उंबरठ्यावर असल्याचे म्हटले आहे. ही उपासमारीची समस्या आणखी उग्र होण्याचा धोका आहे.