अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेनंतर बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. याचबरोबर यूस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएड) संस्थेचा निधी कमी केला. जगभरातील अनेक देशांमध्ये अत्यावश्यक आरोग्य व्यवस्थांसाठी या माध्यमातून निधी उपलब्ध होत होता. जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी अमेरिकेकडून आतापर्यंत सर्वाधिक निधी मिळत होता. आता या निधीचा ओघ आटल्याने अनेक देशांतील आरोग्य व्यवस्थांसमोर संकट निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालात या संकटाबद्दल धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

इशारा नेमका काय?

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या जगभरातील विविध देशांतील कार्यालयांचे सर्वेक्षण केले. अमेरिकेसह अनेक देशांकडून आरोग्यासाठीचे अधिकृत विकास साहाय्य बंद झाल्याने अथवा ते कमी झाल्याने तेथील आरोग्य व्यवस्थांना धोका निर्माण झाला आहे. जगभरातील ७० टक्के देशांमध्ये हा धोका दिसून येत आहे. सध्याची बदलती परिस्थिती, त्याचे आरोग्य व्यवस्थेवर होणारे दीर्घकालीन परिणाम याची माहिती या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. जगभरात १०८ देशांमध्ये संघटनेची कार्यालये असून, त्यातील बहुसंख्य ही अल्प व मध्यम उत्पन्न गटांतील देशांमध्ये आहेत. या देशातील आधीच कमकुवत असलेल्या आरोग्य व्यवस्था यामुळे संकटात आल्या आहेत.

परिणाम काय?

जगभरातील गरीब देशांतील आरोग्य व्यवस्था या आंतरराष्ट्रीय मदतीवर चालतात. आता आंतरराष्ट्रीय मदत कमी होऊ लागल्याने या देशांची चिंता वाढली आहे. त्यांना स्वत:कडील निधी यासाठी द्यावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेडरॉस ॲडहॅनोम घेब्रेयेसस यांनी याचा थेट परिणाम कोट्यवधी नागरिकांच्या आरोग्यावर होण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, निधीच्या पातळीवर सध्या सुरू असलेली उलथापालथ काही प्रमाणात भविष्यासाठी आशादायी असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. काही ठरावीक देशांवर मदतीसाठी अवलंबून राहण्याचे धोरण सोडून सर्वच देशांनी यात योगदान देण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

साथरोगांच्या धोक्यात वाढ?

साथरोग संसर्गाचे निदान आणि तो आटोक्यात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना अनेक देशांना मदत करते. आर्थिक मदत कमी झाल्याने जगभरातील एक तृतियांश देशांमध्ये साथरोगांच्या उद्रेकाचे निदान आणि प्रतिसाद यावर गंभीर परिणाम झालेला आहे. यामुळे या देशांमध्ये साथरोगाच्या धोक्यात वाढ झाली आहे. एखाद्या साथरोगाचा उद्रेक झाल्यास त्यावर उपाययोजना करण्यासही त्यांच्याकडे पुरेसा निधी नसल्याचे चित्र आहे. हिवताप, एचआयव्ही, शारीरिक संबंधांतून संक्रमित होणारे रोग, कुटुंब नियोजन आणि माता व बाल आरोग्य सेवांवरही परिणाम झालेला दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणात आरोग्य सेवांची सज्जता आणि प्रतिसाद यावर ७० टक्के परिणाम झालेला दिसून आला असून, सार्वजनिक आरोग्य सर्वेक्षण ६६ टक्के, मानवतावादी मदत ५६ टक्के आणि आरोग्य कर्मचारी ५४ टक्के असा परिणाम झालेला आढळून आला आहे.

कोविडनंतरची बिकट स्थिती?

कोविड संकटावेळी आरोग्य सेवेत मोठी उलथापालथ झाली होती. कोविड संसर्गाची तीव्रता सर्वोच्च असतानाही ती अधिक होती. त्याच प्रकारची परिस्थिती आता दिसून येत आहे. महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा आणि आरोग्य उत्पादनांची टंचाई अनेक देशांत जाणवून येत आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय मदत कमी झाल्याने आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांमध्ये कपात होत आहे. अनेक देशांमध्ये निम्म्याहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे, असेही सर्वेक्षणात समोर आले आहे.

ट्रम्प यांच्या भूमिकेचा अर्थ काय?

ट्रम्प यांच्याकडून यूएसएडच्या निधीत कपात केल्याने जागतिक पातळीवर आरोग्यासाठी मिळणारा निधी मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यातून आरोग्यासाठीच्या निधीचे संकट निर्माण झाले आहे. जगभरातील २६ अल्प व मध्यम उत्पन्न देशांतील १.३८ अब्ज लोकसंख्या अमेरिकेच्या जागतिक आरोग्य मदतीवर अवलंबून आहे. अमेरिकेनंतर ब्रिटननेही जागतिक पातळीवरील आरोग्य मदत कमी केली आहे. ती गेल्या २५ वर्षांतील नीचांकी पातळीवर आली आहे. जागतिक आरोग्य मदतीवर अवलंबून असलेले गरीब देश स्वत:हून तातडीने पावले उचलून त्यांची आरोग्य व्यवस्था सक्षम करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर आणि पर्यायाने जगासमोर भविष्यात आरोग्य संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

sanjay.jadhav@expressindia.com