-राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक तापमान वाढीला आळा घालण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत असले तरीही ते अपुरे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जगासमोरच नवे आव्हान निर्माण झाले आहे. प्रामुख्याने या तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढत आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांची जमीन आणि ओळख गमावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मालदीव, तुवालू, मार्शल आयलँड्स, नाउरू आणि किरिबाती या पाच देशांसाठी ही भीती सर्वाधिक आहे. यांतकील मालदीव हिंद महासागरातील असून, उर्वरित चार देश प्रशांत महासागरात आहेत. मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी अलीकडेच ही भीती बोलून दाखवली आहे. असे झाल्यास ही मोठी शोकांतिका ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही भीती प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी जगभरातून कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

समुद्राच्या पातळीत कधीपासून वाढ?

हवामान तज्ज्ञांच्या मते १९०० सालापासून समुद्राची पातळी १५ ते २५ सेंटीमीटर म्हणजेच सहा ते दहा इंचांनी वाढली आहे. या वाढीचा वेगही अधिक आहे. काही उष्णकटिबंधीय भागात तो दिसून येतो. समुद्राची पातळी वाढण्यासाठी तापमानात होणारी वाढ सर्वाधिक कारणीभूत आहे. ती अशीच सुरू राहिल्यास शतकाच्या अखेरीस प्रशांत आणि हिंद महासागरांतील चिमुकल्या बेटराष्ट्रांभोवती समुद्राची पातळी सुमारे ३९ इंचांनी वाढू शकते, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास धोके कोणते?

समुद्राची पातळी वाढल्यास वादळांमध्ये वाढ होईल. भरती आणि ओहोटीमध्येदेखील वाढ होईल. त्यामुळे पाणी आणि जमिनीवर क्षार दूषित झाल्यामुळे अनेक प्रवाळ (लहान आकाराच्या प्राण्यांच्या वसाहती) समुद्रात स्थापित होण्यापूर्वीच त्यातील जीवसृष्टी नष्ट होतील. बेटे अदृश्य होऊन मूळ लोकांना इतर भागात विस्थापित व्हावे लागेल. जलाशयांमधील पाणी प्रदूषित होऊन ओलसर जमिनीवर पूर येतो. त्यामुळे या पारिस्थितिकीमध्ये राहणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवनावर परिणाम होईल.

किनारी भागात समुद्राची वाढ झाल्यास कशावर परिणाम होईल?

समुद्रकिनारी सूर्यस्नान करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता त्यासाठी जागा राहणार नाही. समुद्री कासव साधारणपणे किनाऱ्यावर वाळूत अंडी घालतात. मात्र, समुद्राची पातळी वाढल्याने त्यांना अंडी घालण्यासाठी जागा राहणार नाही. किनारपट्टीची हानी तर होईलच, पण कृषी उपक्रम, सार्वजनिक सेवा आदींवर देखील त्याचा परिणाम होईल. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रस्ते आणि मानवी वस्ती यावरही परिणाम घडून येईल.

समुद्राची पातळी वाढण्यामागील कारण काय?

मानवी कृतींमुळे हरितगृह वायूच्या उत्सर्जनात वाढ होत आहे. परिणामी जागतिक सरासरी तापमानात वाढ होत आहे. याशिवाय भूकवचातील उभ्या स्थानिक हालचाली, भूभागावरील बर्फाच्या स्वरूपातील साठा, ध्रुवीय प्रदेशातील बर्फाचे वितळणे, पर्जन्यवृष्टी, महासागरांचे औष्णिक प्रसरण, समुद्रातील पाण्याचे तापमान व क्षारता, हवेचा भार, हवामानातील बदल, ऋतुमानातील बदल, सागरी प्रवाहांचे वितरण, सागरी लाटा, गुरुत्त्वाकर्षण, भरती-ओहोटी, वारा, वादळ, नद्यांद्वारे सागराला होणारा पाण्याचा पुरवठा इत्यादी कारणांमुळे समुद्रपातळीत व पर्यायाने समुद्रसपाटीच्या पातळीत वाढ होत आहे.

समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास मानवी नुकसान किती?

वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळण्याचा वेग वाढत असून २०५० पर्यंत समुद्राची पातळी एक मीटरने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्राच्या किनाऱ्यावरील ५७० पेक्षा जास्त विविध शहरांवर तसेच गावांवर त्याचा प्रभाव पडणार आहे. जगातील एकूण ८० कोटी लोकांना याचा थेट फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global warming temperature rise these 5 nations will face extreme climate change threats print exp scsg
Show comments