अंतराळात असलेला एक अशनी (Asteroid) पृथ्वीच्या कक्षेत येण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. शास्त्रज्ञही याविषयी चिंतेत आहेत. अनेक अशनी पृथ्वीच्या जवळून जातात. परंतु, अशनी ग्रहावर आदळण्याची शक्यता फारच कमी असते. परंतु, या अशनी विषयी शास्त्रज्ञ अधिक चिंतेत आहेत. ‘द प्लॅनेटरी सायन्स जर्नल’ने प्रकाशित केलेल्या नवीन संशोधनानुसार २०२९ मध्ये ‘गॉड ऑफ कॅओस’ म्हणून ओळखला जाणारा अशनी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा ग्रह पृथ्वीला धडकल्यानंतर होणार्या परिणामांबद्दलची चिंता वाढली आहे. काय आहे ‘गॉड ऑफ कॅओस’? खरंच हा अशनी पृथ्वीवर धडकणार का? त्याविषयी जाणून घेऊ.
‘गॉड ऑफ कॅओस’ काय आहे?
‘99942 Apophis’ किंवा ‘गॉड ऑफ कॅओस’ म्हणून ओळखला जाणारा हा पृथ्वीजवळील १२१० फूट रुंद अशनी आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, ‘अपोफिस’ हे नाव इजिप्शियन देवता ‘अपेप’च्या प्राचीन ग्रीक नावावरून आले आहे; ज्याचा उच्चार ‘अपेपी’ किंवा ‘आपेप’ असादेखील होतो. अराजकतेचे प्रतिनिधित्व करणारा आणि विश्वातील सकारात्मकतेच्या विरोधात उभा राहणारा देव म्हणून या देवतेची पूजा केली जायची. इजिप्शियन धर्मशास्त्रात सर्वांत शक्तिशाली आणि भूकंप, मेघगर्जना, वादळ व मृत्यूशी संबंधित देवता, अशी त्याची ओळख आहे.
हेही वाचा : ‘Symbiosexual’नंतर आता ‘Abrosexual’ची चर्चा; काय आहे ही नवीन लैंगिक ओळख?
अपोफिस हा एक ‘एस’ प्रकारचा अशनी म्हणून वर्गीकृत आहे. हा अशनी निकेल व लोहमिश्रित सिलिकेट पदार्थांनी तयार झाला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या मते, त्याचा आकार शेंगदाण्यासारखा आहे. हा अशनी १३ एप्रिल २०२९ रोजी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ३२ हजार किलोमीटरच्या आत जाईल. ‘विओन न्यूज’नुसार २००४ मध्ये पहिल्यांदा या अशनीची ओळख झाली. ‘टोरिनो इम्पॅक्ट डेंजर स्केल’वर ०-१० अशी असते. त्यामध्ये अशनीचा स्तर चार म्हणून वर्गीकरण करण्यात आला. या स्केलनुसार, शून्याचा अर्थ होतो की, टक्कर होण्याची शक्यता नाही; १० चा अर्थ होतो की, टक्कर होणे निश्चित आहे आणि परिणामी जागतिक हवामानात आपत्तीदायक बदल होऊ शकतात.
नासाने संभाव्य धोकादायक ‘निअर-अर्थ ऑब्जेक्ट्स’ (NEOs)चा मागोवा घेण्यास सुरुवात केल्यानंतर स्केलवर चार स्तर दिलेला हा पहिला अशनी होता. ‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, दर ७,५०० वर्षांनी मोठा अंतराळ खडक एकदा पृथ्वीच्या जवळ येतो. जेव्हा या अशनीचा शोध लागला, तेव्हा शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, हा अशनी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता २.७ टक्के आहे. कॅनेडियन खगोलशास्त्रज्ञ व संशोधन अहवालाचे सह-लेखक पॉल विगर्ट यांनी लक्ष वेधले की, अशनीवर आघात करणारी एखादी लहान वस्तूदेखील यात लक्षणीय बदल करू शकते.
टक्कर होण्याची कितपत शक्यता?
बेंजामिन हयात यांच्यासमवेत विगर्ट यांनी कोणत्या आकाराच्या वस्तू अपोफिसचा मार्ग बदलू शकतो, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी संभाव्य टकरीमुळे बदलणाऱ्या परिस्थितीनुसार अशनी २०२९ नंतर पृथ्वीच्या दिशेने वळू शकतो हे पाहिले. अभ्यासानुसार, ‘गॉड ऑफ कॅओस’ पृथ्वीवर आघात करू शकतो आणि केवळ ०.६ मीटर इतक्या लहान वस्तूमुळे किंवा दोन फूट रुंद वस्तूमुळे हे घडू शकते. पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक ठरू पाहणार्या या अशनीला उघड्या डोळ्यांनीही पाहता येईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. २०२९ मध्ये ही धडक होईलच, असे सांगणे फार कठीण असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. टक्कर होण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता अधिक आहे. मात्र, खरंच टक्कर होईल का, हे सांगणे कठीण आहे.
अशनी हलला की नाही हे कसे ओळखता येणार?
अशनी हलला हे प्रत्यक्षात घडले की नाही हे शोधण्यासाठी आम्हाला आणखी तीन वर्षे वाट पाहावी लागेल, असे विगर्ट यांनी सांगितले आहे. “मुख्य म्हणजे मे २०२१ पासून अपोफिसचे दुर्बिणीद्वारे मोठ्या प्रमाणात निरीक्षण केले गेले आहे आणि २०२७ पर्यंत ते चालूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : चष्म्याचा नंबर घालवणारा जादुई आयड्रॉप? काय आहे ‘PresVu Eye Drop’?
‘नासा’ची यावरील प्रतिक्रिया काय?
गेल्या वर्षी या अशनीचा अभ्यास केल्यानंतर यूएस स्पेस एजन्सीनेदेखील या संभाव्य परिस्थितीला प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले, “अपोफिस १३ एप्रिल २०२९ रोजी आपल्या ग्रहाच्या अत्यंत जवळून जाणार आहे. यादरम्यान किंवा नजीकच्या भविष्यात अपोफिस पृथ्वीवर धडकणार नसला तरी २०२९ मध्ये पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणारा हा अशनी पृष्ठभागापासून ३२ हजार किलोमीटरच्या क्षेत्रात येईल आणि त्यामुळे हा अशनी उघड्या डोळ्यांना दिसू शकेल, असे त्यांनी सांगितले आहे.