अमेरिकेत नोकऱ्यांची स्थिती आणखी अवघड होताना दिसत आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली आहे. जानेवारी २०२५ मध्ये ४९,७९५ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले. हा आकडा डिसेंबरच्या तुलनेत २८ टक्के जास्त आहे. मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲमेझॉन आणि मेटासारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. अहवाल असे सूचित करतात की, अमेरिकेमध्ये किमान दोन डझनपेक्षा जास्त कंपन्यांमधील हजारो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. एकेकाळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा जो बोलबाला होता, तो ओसरतोय असे चित्र सध्या या क्षेत्रात पाहायला मिळत आहे. टेक क्षेत्रातील एकूण परिस्थिती काय? कोणकोणत्या मोठ्या कंपन्या नोकर कपात करत आहेत? त्यामागील कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
कर्मचारी कपात करणाऱ्या मोठ्या कंपन्या कोणत्या?
ॲमेझॉनने २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी केली होती. या कंपनीने जानेवारीमध्येही ही नोकर कपात सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रभावित कर्मचाऱ्यांची नेमकी संख्या लोकांसमोर सादर करण्यात आलेली नाही. परंतु, ‘सीएनबीसी’ने मिळवलेल्या अंतर्गत मेमोमध्ये याचे प्रमाण लहान’ असल्याचे सांगण्यात आले आहे. ॲमेझॉनचे जनसंपर्क आणि कॉर्पोरेट प्रमुख Drew Herdener यांनी कर्मचाऱ्यांना कपातीबद्दल सूचित केले. गेल्या तीन वर्षांत कंपनीने २७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/tech-comapanies-lay-off.jpg?w=830)
हेही वाचा
मायक्रोसॉफ्टनेदेखील अशाच प्रकारची नोकर कपात जाहीर केली होती; ज्यामुळे कंपनीच्या कामगिरीच्या मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी झालेल्या अनेक विभागांमधील कामगारांवर परिणाम झाला. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यानेदेखील नोकर कपातीची माहिती दिली, त्यांनी एकूण किती कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला हे उघड केले नाही. ‘बिझनेस इनसाइडर’च्या वृत्तानुसार, एका स्त्रोताने दिलेल्या माहितीनुसार नोकर कपातीत मायक्रोसॉफ्टच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. कंपनीतील या घडामोडी असूनही मायक्रोसॉफ्टचे भारत आणि दक्षिण आशिया प्रमुख पुनीत चंडोक यांनी सांगितले की, अशा कोणत्याही नोकर कपातीचा भारताच्या कामकाजावर परिणाम होणार नाही.
‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ३,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. झुकरबर्ग म्हणाले की, कार्यप्रदर्शन व्यवस्थापन आणि कामात कमी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.” ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांना १० फेब्रुवारी रोजी सूचित केले जाईल. या नोकर कपातीचा उल्लेख करत झुकरबर्ग यांनी या वर्षाचा उल्लेख ‘आव्हानात्मक वर्ष’ असा केला आहे. याचा परिणाम सप्टेंबरपर्यंत मेटाच्या ७२,४०० कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे पाच टक्के कर्मचाऱ्यांवर होईल. मेटाने २०२२ पासून २१ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. दरम्यान, ‘टाइम्स नाऊ’ला गूगलच्या प्रवक्त्याने सांगितले, “कंपनीतील प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइसेस टीम नोकरी सोडण्यास इच्छुक असणाऱ्यांना ऑफर प्रदान करते. ही टीम यूएस येथील गूगलर्सला स्वेच्छेने कंपनी सोडण्याची क्षमता एक विभक्त पॅकेजसह प्रदान करते.”
वर्कडे या फर्मने बुधवारी सांगितले की, ते सुमारे १,७५० लोकांना नोकरीवरून काढत आहेत. या कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ८.५ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात येत आहे. वर्कडे सीईओ कार्ल एस्चेनबॅच म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता वाढवण्यासाठी नोकर कपात आवश्यक आहे. गेल्या वर्षी ३१ जानेवारीपर्यंत कंपनीने सुमारे १८,८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. वॉशिंग्टन पोस्टने जानेवारीमध्ये सांगितले की, खर्चात कपात करण्यासाठी ते सुमारे चार टक्के कर्मचारी किंवा १०० पेक्षा कमी कर्मचाऱ्यांना काढून टाकतील, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे. वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्र अनेक व्यावसायिक कार्यांमध्ये बदल करत आहे. एका प्रवक्त्याने सांगितले की, नोकरीतील कपातीमुळे त्यांच्या न्यूजरूमवर परिणाम होणार नाही. वॉशिंग्टन पोस्टने त्यांच्या डिजिटल वाचकांची संख्या कमी झाल्याची नोंद केली आहे आणि २०२३ मध्ये ७७ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान नोंदवले आहे.
कपातीचे कारण काय?
वेगवेगळ्या कंपन्यांनी नोकऱ्या कमी करण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सर्वेक्षणात, जगभरातील सुमारे ४१ टक्के कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढीमुळे पुढील पाच वर्षांमध्ये त्यांचे कर्मचारी कमी करण्याची शक्यता वर्तवली आहे. कंपन्यांनी नफा वाढवावा, असा गुंतवणूकदारांचा दबाव आहे. महागाई आणि आर्थिक संकटामुळे कंपन्या आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवत आहेत. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमॉन म्हणाले, “कृत्रिम तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात नाट्यमय सुधारणा करेल,” असे इम्पेरियो कन्सल्टिंगचे सीईओ एरिक ब्राउन यांनी या परिस्थितीविषयी बोलताना सांगितले. “टेक आणि ग्राहककेंद्रित क्षेत्रांना अनेकदा बाजारातील अस्थिरतेचा फटका बसतो,” असेही ते पुढे म्हणाले.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/tech-comapanies-lay-off-reason-.jpg?w=830)
अमेरिकेची अर्थव्यवस्था तेजीत असूनही नोकर कपात का होत आहे?
अमेरिकन अर्थव्यवस्थेत जानेवारीमध्ये तीन लाख ५३ हजार नवीन नोकऱ्यांची नोंद करण्यात आली. हा आकडा अर्थशास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट आहे. तरीही गूगल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, डिसकॉर्ड, सेल्सफोर्स आणि ईबे या सर्वांनी जानेवारीमध्ये लक्षणीय नोकर कपात केली आहे. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, कंपन्यांवर गुंतवणूकदारांकडून नफा वाढवण्याचा दबाव असल्याने नोकरीत कपात होत आहे. बऱ्याच टेक कंपन्यांनी कामगारांना काढून टाकले आहे. आता एक्झिक्युटिव्ह कमी लोकांद्वारे जास्त काम करून घेण्याच्या तयारीत आहेत. २०२२ आणि २०२३ मधील आर्थिक चिंता आणि चलनवाढीमुळेदेखील सॉफ्टवेअर आणि क्लाउड सेवांच्या खरेदीच्या प्रमाणात घट झाली आहे, असे वृत्तात नमूद केले आहे.