दिल्ली न्यायालयाने मंगळवारी (दि. २५ जुलै) हरियाणाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गोपाल गोयल कांडा यांची ११ वर्ष जुन्या ‘आत्महत्येस प्रवृत्त’ करण्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी या प्रकरणातील सहआरोपी अरुणा चढ्ढा यांचीही निर्दोष मुक्तता केली. गोपाल कांडा यांची ‘एमडीएलआर’ नावाची हवाई वाहतूक कंपनी होती. या कंपनीत काम करणाऱ्या एअर होस्टेस गीतिका शर्मा यांनी ऑगस्ट २०१२ रोजी आत्महत्या केली. गीतिका यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कांडा यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. त्यावेळी कांडा हरियाणा सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. पुढच्याच वर्षी गीतिका शर्मा यांच्या आईनेही आत्महत्या केली. १९९० साली रेडिओ दुरुस्तीचे दुकान चालविणारे गोपाल कांडा वीस वर्षांत राज्याचे गृह राज्यमंत्री झाले. त्यांचा हा प्रवास चित्रपटाच्या कथेप्रमाणे रंजक आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाचा निकाल आल्यानंतर हरियाणा भाजपाचे प्रवक्ते संजय शर्मा यांनी माध्यमांशी बोलत असताना गोपाल कांडा यांच्या भाजपाप्रवेशाबाबत सुतोवाच केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१२ साली गीतिका शर्मा यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या चिठ्ठीनुसार कांडा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचाही गुन्हा जोडण्यात आला. गोपाल कांडा आणि हवाई कंपनीतील कर्मचारी अरुणा चढ्ढा यांच्या प्रकरणावर मे २०१३ पासून सुनावणी सुरू झाली. त्याच वर्षी जुलै महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन कांडा यांनी बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचे कलम काढून टाकावे, अशी मागणी केली. ६ डिसेंबर २०१३ रोजी सत्र न्यायालयाने कांडा आणि चढ्ढा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीचा खटला सुरू केला.

गोपाल कांडा यांनी द इंडियन एक्सप्रेसला २०१९ साली दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मी काहीही चुकीचे केले नाही. कुणी कुणावरही काहीही आरोप करू शकते. निवडून आलेल्या उमेदवारांपैकी फौजदारी स्वरुपाच्या खटल्याला तोंड देणारा मी एकटाच आहे का? त्याठिकाणी जवळपास १२ आमदारांवर विविध कलमाखाली फौजदारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत.”

भाजपाकडून पक्षात येण्याचा प्रस्ताव

गोपाल कांडा निर्दोष असल्याचा निकाल दिल्याच्या काही तासानंतर भाजपाचे हरियाणामधील प्रवक्ते संजय शर्मा यांनी सांगितले की, गोपाल कांडा हे भाजपाच्या एनडीएमधील सहकारी आहेत. आम्ही कायद्याचा आदर करतो आणि कायद्याने त्याचा निर्णय सुनावला आहे. मला माहीत आहे की, अपक्ष आमदार इतर कोणत्या पक्षात जाऊ शकत नाहीत. पण कांडा यांना भाजपात प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. भाजपाचे प्रवक्ते शर्मा पुढे असेही म्हणाले की, नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण कांडा यांना देण्यात आले होते. त्यांनी आपले भाऊ गोविंद कांडा यांना या बैठकीसाठी पाठवले होते.

कोण आहेत गोपाल कांडा?

गोपाल कांडा सध्या हरियाणातील सिरसा विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्याच हरियाणा लोकहित पार्टीचे आमदार आहेत. मे २०१४ रोजी त्यांचा भाऊ गोविंद कांडा यांच्यासोबत त्यांनी या पक्षाची स्थापना केली. हरियाणामध्ये भाजपा सरकारला मदत करण्यासाठी कांडा यांच्या पक्षाने नेहमीच हात पुढे केला. २०१९ पासून त्यांच्या पक्षाने भाजपा सरकारला पाठिंबा दिलेला आहे.

नव्वदच्या दशकात कांडा रेडिओ दुरुस्ती करण्याचे दुकान चालवित होते. दुकानाच्या मिळकतीमधून कसेबसे गुजराण होत होते. त्यानंतर त्यांनी भावासोबत मिळून सिरसा येथे बुटांचा व्यवसाय सुरू केला. आपल्या मित्रांच्या सहाय्याने कांडा व्यापारी, व्यावसायिक आणि राजकारणी लोकांशी सलगी वाढवून त्यांचा विश्वास संपादन करत असे. काही वर्षांनी दोघा भावांनी मिळून बुटांचा कारखाना उघडला.

काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बन्सी लाल यांच्या निकटवर्तीयांमध्ये सामील झाल्यानंतर कांडा यांच्यातही राजकीय महत्त्वकांक्षी जागी झाली. मात्र बन्सी लाल यांचे सरकार गडगडताच कांडा यांनी चौटाला यांच्या छावणीत प्रवेश केला. (चौटाला हे ‘इंडियन नॅशनल लोक दल’ पक्षाचे नेते होते, त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला होता) कांडा यांनी हरियाणातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांशी मैत्री साधून आपला व्यवसाय आणखी वाढवला. काही वर्षांनंतर कांडा यांनी सिरसा येथून गुरगावला आपले बस्तान हलविले आणि रिअल इस्टेटच्या व्यवसायात प्रवेश केला.

गीतिका शर्मा प्रकरण काय होते?

कांडा यांच्या ‘एमडीएलआर’ या हवाई वाहतूक कंपनीत काम करणाऱ्या गीतिका शर्मा यांनी यांनी दिल्ली येथील निवासस्थानी ऑगस्ट २०१२ रोजी आत्महत्या केली. दोन पानांच्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी कांडा आणि कंपनीतील महिला सहकारी अरूणा चढ्ढा यांच्यावर बरेच आरोप केले होते. फेब्रुवारी २०१३ साली गीतिका शर्मा यांच्या आईनेही आत्महत्या केली. आपल्या कुटुंबावर कांडा यांच्याकडून बळजबरी केली जात असून नाहक त्रास दिला जात आहे, असा आरोप त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केला.

कांडा यांची राजकीय वाटचाल

२००७ साली गोपाल कांडा यांनी आपले वडील मुरलीधर लखराम यांच्या नावाने ‘एमडीएलआर’ या हवाई वाहतूक कंपनीची सुरुवात केली होती. त्यांचे वडील मुरलीधर हे सिरसामधील प्रथितयश वकील होते. त्यांनी १९२६ साली राष्ट्रीय स्वंयसेवक संघात प्रवेश केला होता, असे कांडा सांगतात. १९५२ साली त्यांनी सिरसा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. ‘एमडीएलआर’ कंपनी फार काळ चालू शकली नाही, काही वर्षांतच कंपनी बंद पडली. कांडा यांनी सर्वप्रथम चौटाला यांच्या ‘इंडियन नॅशनल लोक दल’कडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा विचार झाला नाही. त्यानंतर २००९ साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

२००९ साली काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भुपिंदर हुडा यांना दुसऱ्या टर्मचे वेध लागले होते. मात्र बहुमतासाठी फक्त काही आमदार कमी पडत होते. हुडा यांनी कांडा यांना सरकारमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला. पण पक्के व्यवसायिक असलेल्या कांडा यांनी मंत्रिपदाशिवाय सरकारला पाठिंबा देणार नसल्याचे ठामपणे सांगितले. अखेर त्यांना गृह राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopal kanda acquitted in 2012 air hostess suicide case bjp give offer to joined party who is the haryana mla kvg
Show comments