भारतीय वंशाचे उद्योजक आणि वैमानिक गोपी थोटाकुरा हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. रविवारी (१९ मे) गोपी थोटाकुरा यांच्यासहित एकूण सहा जणांनी अंतराळ पर्यटन मोहिमेत सहभाग नोंदवत अवकाशातील सफारीचा आनंद घेतला. गोपी थोटाकुरा हे आतापर्यंत ५० हून अधिक जणांनी केलेल्या या हौशी मोहिमेतील पहिले भारतीय ठरले आहेत.
निम्नस्तरीय (Sub-Orbital) पर्यटन म्हणजे काय?
ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीच्या ‘न्यू शेफर्ड’ या कार्यक्रमाअंतर्गत पार पडलेली ही सातवी मोहीम आहे. ‘एनएस-२५’ असे या मोहमेचे नाव होते. उड्डाण करण्यापासून ते पृथ्वीवर पुन्हा परतण्यापर्यंतचा सगळा प्रवास फक्त दहा मिनिटांचा होता. या मोहिमेमध्ये अंतराळयान पृथ्वीपासून साधारण १०५ किमी अंतरावर जाऊन आले. ही अंतराळात केली गेलेली सर्वात लहान आणि जलद सफारींपैकी एक होती. मानवी इतिहासातील ही २५ वी अंतराळ मोहीम होती. गोपी थोटाकुरा यांच्यासोबत अंतराळ पर्यटनासाठी जाऊन आलेल्या सदस्यांमध्ये मॅसन एंजेल, सिल्वेन कायरन, केनेथ एल. हेस, कॅरोल शॅलर आणि माजी हवाई दल कॅप्टन एड ड्वाइट यांचा समावेश आहे. यातील एड ड्वाइट ९० वर्षांचे असून त्यांनीही अंतराळात जाण्याचा आनंद घेतला आहे.
हेही वाचा : हवामान खात्याकडून वाढत्या उष्णतेबाबत इशारा; ‘रेड अलर्ट’ म्हणजे काय आणि तो कधी दिला जातो?
अंतराळ पर्यटनाचे सामान्यत: निम्नस्तरीय (Sub-Orbital) आणि कक्षीय (Orbital) अंतराळ पर्यटन असे दोन मुख्य प्रकार पडतात. निम्नस्तरीय अंतराळ पर्यटनामध्ये पर्यटकाला कर्मन रेषेच्या (Kármán Line) थोडे पुढे नेले जाते. ही रेषा आपल्यापासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर अवकाशामध्ये आहे. या रेषेला पृथ्वीचे वातावरण आणि बाहेरील अवकाश यांच्यामधील सीमारेषा असेही मानले जाते. निम्नस्तरीय अंतराळ पर्यटनामध्ये पर्यटकाला काही मिनिटांसाठी बाहेरील अवकाशात जाऊ दिले जाते आणि त्यानंतर परत पृथ्वीवर आणले जाते. या कर्मन रेषेच्या खाली उडणाऱ्या कोणत्याही वस्तूला विमान असे म्हणतात, तर ही रेषा ओलांडणाऱ्या वाहनाला अंतराळयान असे म्हटले जाते.
थोटाकुरा यांची मोहीम निम्नस्तरीय (Sub-Orbital) अंतराळ पर्यटनामध्ये मोडते. त्यांचे अंतराळयान पृथ्वीभोवतीच्या कक्षेमध्ये गेले नाही. या अंतराळयानाने कर्मन रेषेला पार केले, तिथे काहीवेळ थांबले आणि त्यानंतर ते थेट खाली आले. बहुतेक अंतराळ पर्यटनांमधील उड्डाणे अशाचप्रकारे केली जातात.
अंतराळ पर्यटनामध्ये याहून मोठा प्रवास केला जाऊ शकतो का?
गोपी थोटाकुरा आणि इतर सदस्यांनी केलेली ही मोहीम फक्त दहा मिनिटांमध्ये पार पडली. मात्र, याहून अधिक कालावधीची उड्डाणेही करता येतात. अंतराळ पर्यटनामध्ये सामान्यत: प्रवाशाला काही दिवस ते आठवड्याहून अधिक काळ जमिनीपासून सुमारे १.३ दशलक्ष फूट उंचीवर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये राहता येते. पृथ्वीपासून सुमारे ४०० किमी उंचीवर हे अवकाश स्थानक आहे. डेनिस टिटो हे पहिले अंतराळ पर्यटक होते. २००१ मध्ये त्यांनी ‘सोयुझ’ या रशियन अंतराळयानातून हा प्रवास केला होता. ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये तब्बल सात दिवस राहिले होते. २००१ ते २००९ या दरम्यानच्या काळात रशियाने सात पर्यटकांना अवकाशात नेले होते. यातील चार्ल्स सिमोनी हे पर्यटक दोनदा अवकाशात जाऊन आले आहेत.
अंतराळ पर्यटनामध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींसाठी आणखीही काही भन्नाट सफारींच्या योजना आखल्या जात आहेत. यामध्ये चंद्राभोवती फेरफटका आणि इतर ग्रहांवर किंवा लघुग्रहांवर जाऊन पृथ्वीवर परत येण्यासाठीच्या कल्पना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या भविष्यातील योजना असून त्याला आणखी कालावधी लागेल. सध्यातरी निम्नस्तरीय अंतराळ पर्यटन आवाक्यात असून अनेक पर्यटकांकडून या सफारींचा आनंद घेतला जात आहे.
‘ब्लू ओरिजीन’ या कंपनीने आतापर्यंत ३७ पर्यटकांना अंतराळात नेले आहे. यातील सर्व सफारी या निम्नस्तरीय पर्यटनाच्या होत्या. अशा प्रकारच्या अंतराळ पर्यटनाची सुविधा पुरवणाऱ्या जवळपास दहाहून अधिक कंपन्या जगभरात अस्तित्वात आहेत. यामध्ये व्हर्जिन गॅलेक्टिक, स्पेसएक्स, एक्सियम स्पेस, झिरो ग्रॅव्हीटी कॉर्पोरेशन आणि बोईंग आणि एअरबस यांसारख्या हवाई उड्डाण कंपन्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : विश्लेषण: उत्तर प्रदेशानेच का दिले भारताला सर्वाधिक पंतप्रधान?
अंतराळ पर्यटनासाठी किती खर्च येतो?
गोपी थोटाकुरांसहित इतर सदस्यांनी या अंतराळ सफारीसाठी किती खर्च केला, याचा खुलासा ब्लू ओरिजीन कंपनीने केलेला नाही. मात्र, ‘स्पेस’ वेबसाइटनुसार, व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानाने असाच प्रवास केला होता. त्यांना या प्रवासासाठी सुमारे $450,000 (३.७५ कोटी रुपये) इतका खर्च आला होता. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी २० ते २५ दशलक्ष डॉलर्सचा (१६० ते २१० कोटी रुपये) खर्च येतो. स्पेस एक्स आणि स्पेस ॲडव्हेंचर्स या अंतराळ पर्यटन करणाऱ्या कंपन्या सुमारे ७० ते १०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६०० ते ८५० कोटी रुपये) खर्च करून चंद्राभोवती प्रवास करण्याची योजना आखत असल्याचे ‘नासा’च्या एका शोधनिबंधामध्ये नमूद करण्यात आले आहे. अर्थातच, अंतराळ पर्यटन ही बाब सध्या केवळ अतिश्रीमंतांनाच परवडणारी आहे. मात्र, ही बाजारपेठ सध्या वेगाने वाढत आहे.