मंगळवारी (२३ जुलै) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय भाषणात कर्करोगाच्या (कॅन्सर) रुग्णांना दिलासा देणारी घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर्करोगाच्या तीन औषधांवरील सीमाशुल्कात (कस्टम ड्युटी) सवलत जाहीर केली. ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमरटिनिब आणि दुर्वालूमॅब, अशी या तीन औषधांची नावे आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेपूर्वी या औषधांवर सुमारे १० टक्के सीमाशुल्क आकारण्यात येत होते. नव्या निर्णयामुळे ही औषधे भारतीय रुग्णांसाठी अधिक स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि कर्करोगाच्या उपचारांचा एकूण खर्च कमी होईल. ही तीन औषधे कर्करोगग्रस्त रुग्णांवर कशी कार्य करतात? सरकारच्या या निर्णयाचा काय परिणाम होईल? भारतातील कर्करोगाची सद्य परिस्थिती काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

कर्करोगावरील परिणामकारक औषधे

कर्करोगावरील औषधे केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सामान्य पेशींवर या औषधांचा परिणाम होत नाही. ही औषधे कर्करोगाच्या पेशींमध्ये विशिष्ट आनुवंशिक बदलांना लक्ष्य करतात. कर्करोगासाठी सामान्यतः करण्यात येणारी उपचारपद्धती केमोथेरपीच्या तुलनेत या औषधांचे चांगले परिणाम आणि कमी दुष्परिणाम आहेत. नवीन कर्करोग उपचार जसे की, इम्युनोथेरपीमध्ये कोणत्याही औषधाचा वापर होत नाही. त्याऐवजी या उपचारपद्धतीद्वारे कर्करोगाच्या पेशी शोधणे आणि त्यांना लक्ष्य करणे यांसाठी रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढवली जाते.

हेही वाचा : आसामचे पिरॅमिड म्हटलं जाणाऱ्या चराईदेव मोईदामला हेरिटेज दर्जा; काय आहे या ठिकाणाचं महत्त्व?

ही तीन औषधे कशी कार्य करतात?

ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन : हे अँटीबॉडी औषध HER-2 नावाच्या विशिष्ट प्रकारच्या प्राथिनांना ब्लॉक करते. प्रामुख्याने हे औषध स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी वापरले जाते. मेटास्टॅसिस ब्रेस्ट कॅन्सर किंवा त्यावर ऑपरेशन केले जाऊ शकत नाही अशा कोणत्याही कर्करोगावर उपचार करण्यासाठी हे औषध वापरले जाते.

डायची सँक्यो यांनी विकसित केलेले ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन हे औषध पारंपरिक उपचार अयशस्वी झाल्यास वापरले जाते. २०१९ मध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी आणि २०२१ मध्ये विशिष्ट प्रकारच्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल कर्करोगांना लक्ष्य करण्यासाठी या औषधांना मंजुरी मिळाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, यूएस फूड अॅण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) कडून मान्यता मिळविणारे हे त्याच्या वर्गातील पहिले औषध ठरले. याचा अर्थ असा की, हे औषध आता कोणत्याही कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

किंमत : या औषधाच्या एका लहान बाटलीची किंमत सुमारे १.६ लाख रुपये आहे.

ओसिमरटिनिब : हे भारतातील कर्करोगाच्या तीन औषधांपैकी सर्वांत जास्त वापरले जाणारे औषध आहे. अँस्ट्रा झेनेकाद्वारे टॅग्रीसो म्हणून विक्री केले जाणारे हे औषध एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर्स (ईजीएफआर) असलेल्या फुप्फुसाच्या कर्करोगावरील उपचारासाठी वापरले जाते. ओसिमरटिनिब कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबविण्यास मदत करते. ट्युमरवरील शस्त्रक्रियेनंतर किंवा कर्करोग मेटास्टेसिस झाल्यावर प्रथम श्रेणीतील उपचार म्हणून हे औषध लिहून दिले जाऊ शकते. कर्करोगाचे प्रमाण वाढेपर्यंत या औषधाचे सेवन केले जाऊ शकते. फोर्टिस गुरुग्राम येथील वैद्यकीय ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ संचालक डॉ. अंकुर बहल यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “इतर उपचारांच्या तुलनेत ओसिमरटिनिब औषधाच्या सेवनानंतर कर्करोगाच्या रुग्णांचे आयुष्य चार ते पाच वर्षांनी वाढू शकते.”

किंमत: हे औषध इतर औषधांच्या तुलनेत खूप महाग आहे. या औषधाच्या १० गोळ्यांच्या प्रत्येक पाकिटाची किंमत १.५ लाख आहे आणि ही गोळी दररोज घ्यावी लागते.

दुर्वालूमॅब: हा एक इम्युनोथेरपी उपचार आहे. या औषधाचा वापर विशिष्ट फुप्फुसाचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग व यकृताच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी वापरला जातो. हे औषध PD-L1 प्रथिनांबरोबर काम करते. PD-L1 प्रथिने कर्करोगाच्या पेशींच्या पृष्ठभागावर असतात. हे औषध शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे कर्करोगाच्या पेशी ओळखून त्यांना लक्ष्य करते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हे औषध घेतलेले रुग्ण जास्त काळ जगतात.

किंमत : इमफिंझी म्हणून विकल्या जाणाऱ्या दुर्वालूमॅबच्या प्रत्येक १० मिलिलिटरच्या बाटलीची किंमत सुमारे १.५ लाख रुपये आहे.

सीमाशुल्क सवलतींचा काय परिणाम होईल?

या औषधांवरील सीमाशुल्क सवलतींमुळे कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना एका कर्करोग रुग्णाने सांगितले की, १२ हजार रुपयांनी किंमत कमी केल्याने त्यांना अधिक औषधे खरेदी करण्यात मदत होईल आणि ती रक्कम चाचण्या आणि इतर खर्चासाठी वापरता येईल.

नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)मधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अभिषेक शंकर म्हणाले, “सरकारचे हे एक सकारात्मक पाऊल आहे. या औषधांची किंमत लाखांच्या घरात आहे. किमतींमध्ये थोड्या प्रमाणात घट झाली असली तरी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर याचा लक्षणीय परिणाम होईल. या औषधी म्हणजे असे उपचार आहेत, जे पारंपरिक उपचारांपेक्षा बरेच चांगले परिणाम दाखवितात.” ते म्हणाले की, भारतात सुमारे एक लाख रुग्णांना ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन, ओसिमरटिनिब व दुर्वालूमॅबची गरज आहे.

भारतातील कर्करोगाची स्थिती

दिवसागणिक भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. २०२२ मध्ये कर्करोगाची अंदाजे १४.६ लाख नवीन प्रकरणे आढळून आली; तर २०२१ मध्ये १४.२ लाख व २०२० मध्ये १३.९ लाख प्रकरणे आढळून आली होती, असे नॅशनल कॅन्सर नोंदणी डेटामध्ये नमूद करण्यात आले आहे. कर्करोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २०२२ मध्ये अंदाजे ८.०८ लाख झाली होती. २०२१ मध्ये ही संख्या ७.९ लाख आणि २०२० मध्ये ७.७ लाख इतकी होती. महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. २०२० मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे १०३.६ टक्के महिला कर्करोगग्रस्त होत्या; तर ९४.१ टक्के पुरुष कर्करोगग्रस्त होते. पुरुषांमध्ये फप्फुस, तोंड, जीभ व पोट यांच्या कर्करोगाचे प्रमाण सामान्य आहे; तर स्त्रियांमध्ये स्तन, गर्भाशय, अंडाशय, फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.

हेही वाचा : Cocaine Sharks: शार्कमध्ये आढळले चक्क कोकेन, याचा सागरी जीवनावर कसा परिणाम होणार? यासाठी कारणीभूत कोण?

स्वस्त होणारी औषधे फुप्फुस आणि स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी उपयुक्त आहेत. हे दोन्ही कर्करोग पुरुष आणि स्त्रियांमध्ये आढळणार्‍या सर्वांत सामान्य कर्करोगांपैकी एक आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या अभ्यासानुसार, लोकसंख्येवर आधारित कर्करोगाच्या नोंदींचा वापर करून केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, नऊ भारतीयांपैकी एकाला कर्करोग होतो. ६८ पैकी एका पुरुषाला फुप्फुसाचा कर्करोग होतो आणि २९ पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होतो, असे अभ्यासात म्हटले आहे.