विद्यार्थ्यांमधील गणित, विज्ञान यांसारख्या मूलभूत विषयांमधील जिज्ञासा वाढविण्यासाठी देशभरातील ५० हजार शाळांमध्ये पुढील पाच वर्षांत नव्या अटल टिंकरिंग लॅब सुरू होणार आहेत.
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प काय आहे?
भारतात लोकसंख्येच्या तुलनेत नवोन्मेष (इनोव्हेशन), संशोधन विकासाचे प्रमाण नगण्य आहे. त्यामागे असलेल्या अनेक कारणांमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, कुतूहल नसणे हेही एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अटल टिंकरिंग लॅब या प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी नसते उद्याोग करणे अपेक्षित आहे. त्यातून त्यांना स्टेमचे म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग अँड मॅथेमॅटिक्स – STEM) या विषयांतील प्रयोगशील शिक्षण नवोन्मेषाच्या माध्यमातून आत्मसात करता येईल. स्टेमच्या मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामातून, उपकरणे हाताळून समजून घेता येतील आणि आपल्या कल्पकतेची भर त्यात घालता येईल.
अटल इनोव्हेशन मिशन कशासाठी?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अशी घोषणा केली की देशातील ५० हजार शाळांमध्ये पुढील पाच वर्षांत अटल टिंकरिंग लॅब सुरू होतील. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २०१६ मध्ये निती आयोगाअंतर्गत (नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) महत्त्वाकांक्षी अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गतच आतापर्यंत ८,७०६ अटल टिंकरिंग लॅब सुरू झाल्या आहेत. लहान मुलांमध्ये विविध समस्यांची उत्तरं शोधण्याचे आणि सर्जनशीलतेची बीजे रोवण्याचे या अटल टिंकरिंग लॅबचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणापलीकडे जाऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्याचे माध्यम म्हणून या प्रयोगांकडे पाहिले जात आहे.
या प्रयोगशाळांमध्ये काय असते?
देशातील कोणतीही सरकारी शाळा या प्रयोगशाळेची मागणी करू शकते. अर्थात त्यासाठी काही अटी आहेत. शाळा माध्यमिक असावी, शाळेत किमान १५०० चौ. फुटांची जागा असावी. खूप विज्ञान शिक्षक असायला हवेत. दहावीत सलग तीन वर्षे शाळेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असायला हवेत, अशा अनेक अटी शाळांसाठी ही प्रयोगशाळा उघडण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. शाळेला २० लाख रुपयांचा निधी मिळतो. पहिल्या वर्षी त्यापैकी १२ लाख रुपये सुरुवातीच्या सेटअपसाठी दिले जातात. यापैकी सात लाखांचे तर सायंटिफिक मटेरियलच असते. थ्रीडी प्रिंटर, रोबोटिक्सशी संबंधित मटेरिअल, क्राफ्ट मटेरिअल, इलेक्ट्रॉनिक्स, ड्रिलिंग मशीनसारखे टूल, कॉम्प्युटर मायक्रो कंट्रोल बोर्डसारखी अनेक साधने या प्रयोगशाळेत असतात.
या प्रयोगशाळांमध्ये काय शिकता येते?
या प्रयोगशाळांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, आयओटी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स, थ्रीडी प्रिंटिंग आणि रोबोटिक्स या विषयांमधील डीआयवाय (स्वत: बनवायचे) किट तयार करता येतात. कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल्स तयार करता येतात. शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मेंटॉरशिप कार्यक्रम येथे उपलब्ध असतात. अटल स्पेस मिशनसारख्या विविध नवोन्मेष स्पर्धांचे आयोजन केले जाते. एटीएलमध्ये नसणारी मुलेही यात भाग घेऊ शकतात.
सरकारी शाळांसाठीही संधी?
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान शाखांच्या प्रवेश परीक्षांना अवास्तव महत्त्व प्राप्त झाले. त्यात गणित, विज्ञानासारख्या मूलभूत विषयांमध्ये राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची पीछेहाट होऊ लागली. आयआयटी प्रवेश परीक्षा, होमी भाभा विज्ञान परीक्षा, ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये मुलांची चुणूक वाढवायची असेल तर लहान वयापासूनच जिज्ञासा निर्माण करणे गरजेचे आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना अनेक व्यासपीठे उपलब्ध होतात, मात्र सरकारी शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांच्या या मूलभूत विषयांतील कुतूहल, शिकण्याच्या उमेदीला वाव द्यायचा असेल तर एक चांगले व्यासपीठ हवे, या गरजेतून अटल टिंकरिंग प्रयोगशाळा सुरू झाल्या आणि लाखो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांना वाव मिळावा आणि सरकारी शाळेतले विद्यार्थीही भविष्यातील उद्योजक व्हावेत हाही या प्रयोगशाळांचा हेतू आहे.
शिक्षकांची भूमिका महत्त्वाची?
एखादी पिढी उत्तम घडवायची असेल तर पालकांहून अधिक सजग भूमिका शिक्षकांची असते. पण आपल्या शिक्षणव्यवस्थेचे दुर्दैव हे की ही उत्तम पिढी घडविण्याची आस असलेले चांगले शिक्षक बोटांवर मोजण्याइतके असतात. नवोन्मेषाची बीजे असली तरी ती अंकुरण्यासाठी माती सुपीक असावी लागते, शिक्षकरूपी खतपाणी लागते. पण अनेक शाळांमधील शिक्षक विज्ञान परिषदेसारखे वार्षिक कार्यदेखील विद्यार्थ्यांना रेडीमेड विज्ञान मॉडेल्सच्या मदतीने पार पाडू देतात. त्यामुळे केवळ प्रयोगशाळा उभारण्यापलीकडे अटल इनोव्हेशन मिशनपुढील आव्हाने मोठी आहेत, हे मात्र नक्की. manisha.devne @expressindia.com