भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीच्या पदरी वर्षअखेरीस निराशा पडली. बुडापेस्टमध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात एरिगेसीने निर्णायक भूमिका बजावली होती. तसेच पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदनंतर २८०० एलो गुणांकनाचा टप्पा पार करणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला होता. मात्र, जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेत चमक न दाखवता आल्याने त्याला २०२६ च्या आव्हानवीरांच्या (कँडिडेट्स) स्पर्धेत पात्रता मिळवता आली नाही. त्यामुळे जगज्जेतेपदाच्या लढतीत तो गुकेशसमोर खेळण्याची शक्यताही मावळली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कँडिडेट्स’साठी पात्र न ठरण्यामागे काय कारण?

जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) क्रमवारीत एरिगेसी चौथ्या स्थानी असून जगज्जेता दोम्माराजू गुकेशही त्याच्याहून मागे आहे. या क्रमवारीसह तो जागतिक जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) अजिंक्यपद स्पर्धेसाठी न्यूयॉर्क येथे दाखल झाला. त्याला आव्हानावीरांच्या स्पर्धेची पात्रता मिळण्यासाठी जलद स्पर्धेत जेतेपद मिळवणे गरजेचे होते. या स्पर्धेत मॅग्नस कार्लसन आणि हिकारू नाकामुरा यांसारख्या खेळाडूंचे तगडे आव्हान त्याच्यासमोर होते. तसेच ‘कँडिडेट्स’साठी पात्रता मिळवण्याकरिता त्याला ‘फिडे’ सर्किटमधील गुण वाढविण्याची आवश्यकता होती. तो यामध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या फॅबियानो कारूआनाहून सहा गुणांनी मागे होता. जागतिक जलद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी त्याने पाच फेऱ्यांपैकी चारमध्ये विजय मिळवले. मात्र, पुढे त्याला सातत्य राखता आले नाही. रशियाच्या वोलदार मुर्झिनने जलद स्पर्धा १० गुणांसह जिंकली, तर ॲलेक्झांडर ग्रिश्चूक आणि इयन नेपोम्नियाशी हे ९.५ गुणांवर होते. एरिगेसी पाच खेळाडूंसह संयुक्तपणे नऊ गुणांवर होता. त्यामुळे तो ‘कँडिडेट्स’साठी पात्र ठरू शकला नाही.

हेही वाचा : विश्लेषण : मुंबई – नागपूर ८ तासांत, मुंबई – पुणे सुसाट… नवे वर्ष रस्ते विकासाचे?

एरिगेसी कसा पिछाडीवर पडला?

‘कँडिडेट्स २०२६’साठी पात्रता मिळवणारा अमेरिकेचा फॅबिआनो कारूआना हा पहिला बुद्धिबळपटू ठरला. ‘फिडे’ सर्किट गुणतालिकेत कारूआना अग्रस्थानी आहे. सेंट लुईस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद मिळवत कारूआनाने १६.३९ गुणांची कमाई केल्याने ‘फिडे’ सर्किटमध्ये तो एरिगेसीच्या पुढे गेला. एरिगेसीने कतार मास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तो या स्पर्धेत दुसऱ्या स्थानी राहिला. ‘फिडे’ सर्किटच्या अंतिम गुणतालिकेसाठी लागणाऱ्या सात स्पर्धा दोन्ही खेळाडूंनी खेळल्या होत्या. कारूआनाकडे त्यावेळी एरिगेसीवर सहा गुणांची आघाडी होती. न्यूयॉर्क येथे झालेल्या जागतिक जलद स्पर्धेनंतरही ती कायम राहिली. एरिगेसीने जलद स्पर्धा जिंकली असती, त्याने २० हून अधिक गुणांची कमाई केली असती. त्यामुळे त्याला कारूआनाच्या पुढे जाता आले असते. मात्र, यात तो अपयशी ठरला.

‘फिडे’ सर्किट म्हणजे काय?

‘फिडे’ सर्किटच्या माध्यमातून ‘कँडिडेट्स २०२६’ स्पर्धेसाठी बुद्धिबळपटूंना पात्रता मिळवता येते. २०२४ मधील पात्र स्पर्धांतून जो बुद्धिबळपटू सर्वोत्तम गुणांसह आघाडीवर असतो, त्याला ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्रता मिळते. प्रत्येक खेळाडूने किमान पाच पात्र स्पर्धा खेळणे गरजेचे असते. ज्यापैकी वेळेचे बंधन असणाऱ्या चार स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य आहे. अंतिम गुण बुद्धिबळपटूंच्या सात सर्वोच्च गुणांची बेरीज करून ठरवले जातात. जागतिक जलद स्पर्धेनंतर ‘फिडे’ सर्किट गुणतालिकेत कारूआना १३०.४२ गुणांसह आघाडीवर होता, तर एरिगेसीच्या खात्यात १२४.४० गुण होते. उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तारोव (१०८.४९ गुण) तिसऱ्या, फ्रान्सचा अलिरेझा फिरूझा (८८.१६ गुण) चौथ्या, तर गुकेश (८४.१३ गुण) पाचव्या स्थानावर होता.

हेही वाचा : गेल्या १५ डावांत एकदा ५०, दोनदा २०… अपयशी रोहितची सिडनी कसोटी अखेरची? कर्णधारपदासाठी दावेदार कोण? 

‘कँडिडेट्स’साठी कोणाचे स्थान निश्चित?

आतापर्यंत केवळ कारूआनाने ‘कँडिडेट्स २०२६’ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेत एकूण आठ बुद्धिबळपटूंचा सहभाग असेल. त्यामुळे सात बुद्धिबळपटूंचे स्थान रिक्त आहे. २०२५च्या विश्वचषक स्पर्धेतील अव्वल तीन बुद्धिबळपटू, ‘फिडे’ ग्रँड स्विस २०२५ मधून दोन, एक २०२५ सर्किट रेटिंगमधून, तर एक बुद्धिबळपटू ऑगस्ट २०२५ व जानेवारी २०२६ दरम्यान गुणांच्या सर्वोत्तम सरासरीतून स्थान मिळवेल. ‘कँडिडेट्स २०२६’चा विजेता बुद्धिबळपटू सर्वांत युवा जगज्जेत्या भारताच्या गुकेशला आव्हान देईल. जगज्जेतेपदाच्या लढतीत पराभूत झालेल्या डिंग लिरेनला यंदा ‘कँडिडेट्स’मध्ये थेट प्रवेश मिळणार नाही. त्यालाही इतर बुद्धिबळपटूंप्रमाणे सर्वोत्तम कामगिरीसह पात्रता मिळवावी लागेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grandmaster arjun erigaisi fourth in chess rankings cant be a challenge for d gukesh for world championship print exp css