जर्मनीतील भेटीदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बुधवारी बर्लिनमधील हम्बोल्ट फोरम संग्रहालयासमोर उभ्या असलेल्या सांचीच्या भव्य स्तूपाच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीजवळ थांबले. लाल सॅन्डस्टोनमध्ये तयार करण्यात आलेल्या या गेटवेचे अनावरण २०२२ साली डिसेंबर महिन्यात करण्यात आले होते. हे प्रवेशद्वार मूळ तोरणाची हुबेहूब प्रतिकृती आहे. त्याचे वजन अंदाजे १५० टन आहे. तर उंची १० मीटर आणि रुंदी ६ मीटर आहे.
सांचीचा महान स्तूप
स्तूप हे एक बौद्ध स्मारक आहे. स्तूपाच्या आत गौतम बुद्ध किंवा त्यांचे शिष्य असलेले भिक्खू किंवा अर्हतपद प्राप्त केलेल्या साधकाचे शारीरधातू किंवा इतर पूजनीय वस्तू असतात. स्तूपाची रचना ही गोलाकार-अर्ध अंडाकृती असते. या स्वरूपाच्या रचनेचे मूळ हे बुद्धपूर्व काळात सापडलेल्या समाधींकडे (burial mounds) जाते. सांचीचा स्तूप हे त्याचे विकसित रूप आहे. या स्तूपाची पायाभरणी सम्राट अशोकाने इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात केली. सांचीच्या स्तूप संकुलाची रचना बौद्ध स्थापत्य कलेतील सर्वात मोठी आणि जुनी रचना आहे. यात अनेक इतर स्तूप, चैत्य/मंदिर आणि विहारांचा समावेश होतो.
देबला मित्रा या १९८१ ते १९८३ या कालखंडात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या महासंचालक होत्या. त्यांनी लिहिलेल्या सांची (१९५७) या पुस्तकात म्हटले आहे की, “सांची केवळ सर्वात परिपूर्ण आणि संरक्षित स्तूप नाही तर [भारतातील] बौद्ध कला आणि स्थापत्यकलेची उत्पत्ती, विकास आणि ऱ्हास यांचा अभ्यास करण्यासाठीचा विस्तृत पटच आहे.” सांचीचा भव्य स्तूप हा भारतातील सर्वात प्राचीन दगडी बांधकामांपैकी एक आहे, ज्याची उभारणी बुद्धधातूंवर करण्यात आली आहे. त्याच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याचं काम स्वतः अशोकाची पत्नी देवी हिने केलं होतं. देवी ही मूळची जवळच्या विदिशा या व्यापारी शहरातील होती. सांची संकुलाच्या विकासाला विदिशाच्या व्यापारी समुदायाने अर्थसहाय्य दिले होते.
भव्य स्तूपाचे प्रवेशद्वार
मूळ स्तूपाची रचना साधी होती. अर्ध-अंडाकृती रचनेवर छत्रावली होती. या स्तुपासमोर असलेल्या अलंकारिक तोरणामुळे हा स्तूप नजरेस भरतो. या स्तूपाच्या आत प्रवेश करण्यासाठी चारही बाजूने प्रवेशद्वारं आहेत. इसवी सनपूर्व पहिल्या शतकात सातवाहन कालखंडात ही तोरणं घडवली गेली. या तोरणांची रचना दोन खांबांच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. हे दोन्ही खांब आडव्या पट्ट्यांनी जोडण्यात आले आहेत. या खांबांवर वेगवगेळ्या बुद्ध प्रतिमांचे, जातक कथांमधील कथांचे, बुद्धाच्या जीवनातील प्रसंगांचे अंकन करण्यात आलं आहे. या तोरणांवर आढळणारी शिल्पं, त्यावरील नक्षीकाम यांच्यातील लयबद्धता, प्रमाणबद्धता आणि सौंदर्य तसेच वनस्पती आणि प्राण्यांचे अचूक हाताळलेले आकृतिबंध यामुळे अद्वितीय प्रभाव निर्माण होतो. या तोरणांच्या शिल्पांमध्ये इतर काही शिल्पांचाही समावेश केलेला आहे, जे बुद्धाच्या मूळ शिकवणुकीचा भाग नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौतम बुद्धांचे मानवी रूपातील अंकन हे होय असे मित्रा यांनी म्हटले आहे. एकेकाळी स्तूपाच्या सभोवतालचे बलस्ट्रेड-कठडा आणि तोरण रंगवलेले होते.
पूर्व दरवाजा आणि त्याची प्रतिकृती
युरोपमध्ये सांची तोरणांपैकी पूर्वेकडील प्रवेशद्वार सर्वात प्रसिद्ध आहे. यामागे ऐतिहासिक कारण आहे. १८१८ साली ब्रिटीश अधिकारी हेन्री टेलरला ज्यावेळी हा स्तूप आढळला त्यावेळी या स्तूपाचे अवशेष अगदीच भग्न अवस्थेत होते. भारतीय पुरातत्त्व खात्याचे पहिले महासंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी १८५१ साली यांची येथे झालेल्या पहिल्या उत्खननाचे नेतृत्त्व केले. या स्तूपाचे आताच्या स्थितीत संवर्धन १९१० च्या दशकात तत्कालीन महासंचालक जॉन मार्शल यांनी भोपाळच्या बेगमांनी दिलेल्या निधीतून केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जीर्णोद्धाराचे काम सुरू होईपर्यंत खजिना शोधणाऱ्यांनी आणि हौशी पुरातत्वशास्त्रज्ञांनी सांचीचा स्तूप वारंवार खोदून काढला. त्यामुळे तो उद्ध्वस्त झाला होता. अनेक युरोपियन हौशींची सांचीची तोरण युरोपला नेण्याची इच्छा होती, परंतु ते शक्य झाले नाही. पर्यायाने त्यांना प्लास्टरच्या प्रतिकृती घेऊन जाव्या लागल्या. १८६० च्या उत्तरार्धात व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासाठी लेफ्टनंट हेन्री हार्डी कोल यांनी पूर्वेकडील तोरणांची प्रतिकृती तयार केली. आणि त्यानंतर अनेक प्रतिकृती तयार करण्यात आल्या ज्या संपूर्ण युरोपभर विखुरल्या. नवीन बर्लिन प्रतिकृतीचे मूळ हे पहिल्या प्लास्टरच्या प्रतिकृतीत सापडते.
अधिक वाचा: ५० हजार वर्षे प्राचीन बासरी खरंच मानव निर्मित आहे का?
हम्बोल्ट फोरमच्या वेबसाइटनुसार,“लंडनमधून खरेदी केलेल्या मूळ गेटवेचे प्लास्टर कास्ट १८८६ पासून कोनिग्लिचेस संग्रहालय für Völkerkunde बर्लिनच्या गेटवे हॉलमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. “हम्बोल्ट फोरमच्या प्रतिकृतीसाठी 3D स्कॅनिंग, आधुनिक यंत्रमानव, कुशल जर्मन आणि भारतीय शिल्पकार आणि मूळ तोरणाचे मोठे केलेले फोटो मदतीसाठी वापरण्यात आले होते. या तोरणाच्या वरच्या आर्किट्रेव्हवर सात मानुषी बुद्ध कोरण्यात आलेले आहेत. तर मधल्या भागात भगवान बुद्धांच्या महाप्रस्थानाचे दृश्य कोरण्यात आलेले आहे. तर खालच्या भागात गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली ते दृश्य कोरण्यात आलेले आहे. इतर शिल्पांमध्ये शालभंजिका, हत्ती, पंख असलेला सिंह आणि मोर यांचा समावेश होतो.