Most Popular Visa in The World : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात ‘गोल्ड कार्ड’ योजनेची घोषणा केली. याअंतर्गत परदेशी नागरिकांना ५० लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच ४४ कोटी रुपये भरून अमेरिकेचं नागरिकत्व मिळवता येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात १० लाख ‘गोल्ड कार्ड’ दिले जाणार आहेत. मात्र, ही योजना इतर देशांच्या तुलनेत खूपच महागडी असल्याचं दिसून आलं आहे. युरोपातील असे अनेक देश आहेत, जे अमेरिकेच्या तुलनेत खूपच कमी किमतीत गोल्डन व्हिसा देतात. त्यामध्ये ग्रीसचा समावेश आहे. परदेशात स्थलांतरित होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी ग्रीस हे सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे.
गुंतवणूक स्थलांतर सल्लागार संस्था हेन्ली अँड पार्टनर्सच्या मते, जगातील १०० हून अधिक देशांनी ‘गोल्डन व्हिसा’ देण्याची योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये अमेरिका, यूके, कॅनडा, ग्रीस, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांचा समावेश आहे. संस्थेच्या मते २०२५ मध्ये युरोपियन राष्ट्र गोल्डन व्हिसा देण्यात अव्वल स्थानावर आहेत. दरम्यान, गोल्डन व्हिसा म्हणजे नेमकं काय, ग्रीसचा व्हिजा इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक लोकप्रिय का आहे हे जाणून घेऊ.
गोल्डन व्हिसा म्हणजे काय?
गोल्डन व्हिसा हा एक विशिष्ट प्रकारचा व्हिसा आहे, जो विदेशातील नागरिकत्व मिळवण्यासाठी काही ठराविक गुंतवणुकीच्या आधारावर दिला जातो. या व्हिसासाठी संबंधित व्यक्तीला त्या देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागते, ज्यामध्ये प्रॉपर्टी विकत घेणे, व्यवसाय सुरू करणे किंवा इतर आर्थिक योगदान देणे यांसारख्या बाबींचा यामध्ये समावेश आहे. बहुतेक देश हे सुरुवातीला गोल्डन व्हिसा देऊन गुंतवणूकदारांना तात्पुरत्या स्वरुपात देशाचे नागरिकत्व देतात. काही वर्षांनी त्या गुंतवणूकदारांना कायमस्वरुपी त्या देशाचं नागरिकत्व देण्यात येतं. हा व्हिसा प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींनाच मिळतो.
“गोल्डन व्हिसा मिळवणे हे अस्थिर जगातील आर्थिक आणि राजकीय जोखमींविरुद्ध सर्वोत्तम विमा धोरण आहे,” असे हेनली अँड पार्टनर्सने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी युरोपवर मोठं आर्थिक संकट ओढवलं होतं, ज्याला तोंड देण्यासाठी युरोपिन देशांनी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. यादरम्यान गोल्डन व्हिसाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
ग्रीसने गोल्डन व्हिसाची सुरुवात कधीपासून केली?
२०१३ मध्ये ग्रीसवर मोठं आर्थिक संकट ओढवलं आणि देशाची अर्थव्यवस्था कर्जाच्या बोजाखाली सापडली, तेव्हा डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी ग्रीसने गोल्डन व्हिसा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे युरोपिन देशाबाहेरील नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना परदेशात राहण्याची संधी उपलब्ध झाली. परंतु, गोल्डन व्हिसा मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तींना देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार होती. याशिवाय दर पाच वर्षांनी व्हिसाचे नूतनीकरणही करावे लागणार होते. आकडेवारीनुसार ग्रीसने गोल्डन व्हिसासाठी देशात सुमारे ४००,००० (३.६५ कोटी) युरोंची मालमत्ता खरेदी करण्याची अट घातली होती.
तसेच व्यावसायिक मालमत्ताचे निवास वापरात रुपांतर करण्यासाठी आणि सूचीबद्ध इमारतींचे पुनर्संचयित करण्यासाठी २,५०,००० (२.२ कोटी) युरोंच्या गुंतवणुकीची अट होती. याशिवाय अथेन्स, थेस्सालोनिकी आणि ३,१०० पेक्षा जास्त रहिवासी असलेल्या बेटांवर ८००,००० (७.३ कोटी) गुंतवणूक आवश्यक असल्याचं ग्रीसने म्हटलं होतं. दरम्यान, ग्रीसने सुरू केलेली ही योजना अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाली. गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी श्रीमंत व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात ग्रीसमध्ये आर्थिक गुंतवणूक केली, ज्यामुळे डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली.
गोल्डन व्हिसाचा ग्रीसला काय फायदा झाला?
गेल्या वर्षीपर्यंत ग्रीसमध्ये किमान गुंतवणुकीची अट २५०,००० (२८ कोटी) युरो इतकी होती. यामुळे मोठ्या संख्येने परदेशी गुंतवणूकदार आकर्षित झाले. परिणामी अथेन्स, मायकोनोस आणि सँटोरिनीसारख्या लोकप्रिय शहरे आणि बेटांवर मालमत्तेच्या किमती वाढल्या. या वाढीमुळे स्थानिकांना घरे खरेदी करण्यास खूपच अडचणी येऊ लागल्या, ज्यामुळे ग्रीस सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये गोल्डन व्हिसा देण्यासाठी गुंतवणुकीची मर्यादा वाढवली. मागणी असलेल्या क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक झाल्यामुळे परदेशी लोकांना कमी दाटीवाटीच्या परिसरात घरे उपलब्ध करून देण्यात आली.
हेनली अँड पार्टनर्सने फर्स्टपोस्टला सांगितले की, “जेव्हा रिअल इस्टेटच्या किमती वाढतात, तेव्हा स्थानिकांसाठी घरे महाग होतात, ज्यामुळे भाडेदेखील जास्त आकारले जाते, म्हणूनच ग्रीक सरकारने गोल्डन व्हिसा देण्याच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला.” त्यांच्या मते, गुंतवणूक नियमांमध्ये बदल झाल्यापासून व्यावसायिक मालमत्तांचे निवासी घरांमध्ये रूपांतर करण्यासाठी २५०,००० युरोची गुंतवणूक करण्याचा नवीन पर्याय लोकप्रिय झाला.
सध्या ग्रीसचा गोल्डन व्हिसा मिळविण्यासाठी गुंतवणूकदार विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत आहेत, ज्यामध्ये ग्रीस क्रेडिट संस्थेत ५००,००० (रु. ४.५७ कोटी) युरोंची गुंतवणूक आणि रिअल इस्टेट कंपनीमधील भांडवली योगदानाचा समावेश आहे. हेन्ले अँड पार्टनर्सच्या मते, गुंतवणूकदार तीन महिन्यांच्या उर्वरित मुदतीसह ५००,००० युरो किमतीचे ग्रीस सरकारी बाँड खरेदी करू शकतात. याशिवाय ते किमान ८००,००० युरो किमतीचे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये किमान ३५०,००० युरो किमतीच्या शेअर्सची खरेदी करू शकतात.
ग्रीसचा गोल्डन व्हिसा मिळवण्याचे फायदे काय?
आर्थिक गुंतवणूक करून ग्रीसचा गोल्डन व्हिसा मिळवलेल्या व्यक्तींना देशात शिक्षण घेण्याचा आणि राहण्याचा अधिकार मिळतो. याशिवाय युरोपच्या शेंगेन क्षेत्रात व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी मिळते, ज्यामध्ये २९ राष्ट्रांचा समावेश आहे. मात्र, गोल्डन व्हिसा गुंतवणूकदारांना ग्रीसमध्ये काम करण्याचा अधिकार देत नाही.
हा व्हिसा प्रामुख्याने कुटुंबांना दिला जातो, ज्यामध्ये मुख्य अर्जदार, त्याची पत्नी किंवा त्याचे पालकांना व्हिसा दिला जातो. दरम्यान, गोल्डन व्हिसासाठी अर्जदाराला स्टॅम ड्युटी म्हणून सरकारला काही पैसेही द्यावे लागतात. सात वर्ष देशात निवास केल्यानंतर ते ग्रीस नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र होतात.
ग्रीसचा गोल्डन व्हिसा इतका लोकप्रिय का?
२०१९ पासून ग्रीसच्या गोल्डन व्हिसाला खूपच लोकप्रियता मिळाली आहे. यामागचं कारण म्हणजे, इतर देशांच्या तुलनेत ग्रीसचा गोल्डन व्हिसा मिळविण्यासाठी कमी आर्थिक गुंतवणूक करावी लागत आहे. गोल्डन व्हिसाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ग्रीसच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेत पुन्हा भरभराट झाली आहे. भारतीय इमिग्रेशन कन्सल्टन्सी असलेल्या XIPHIASचे व्यवस्थापकीय संचालक वरुण सिंग म्हणाले की, ग्रीस हा सर्वात जास्त परवडणारा गोल्डन व्हिसा देतो. तसेच देशात गुंतवणूकदारांना केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो.
हेही वाचा : Shahzadi Khan Case : यूएईमध्ये भारतीय महिलेला फाशी का देण्यात आली? शहजादी खान कोण होती?
ग्रीसचा गोल्डन व्हिसा किती लोकांना मिळाला?
२०२१ मध्ये ग्रीसचा गोल्डन व्हिसा मिळविण्यासाठी जवळपास एक हजार परदेशी नागरिकांनी अर्ज केले होते. २०२३ मध्ये त्यात वाढ होऊन आठ हजार ४४८ अर्ज आले. गेल्यावर्षी व्हिसासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींची संख्या चार हजार ७३४ इतकी होती. दरम्यान, ग्रीसने गोल्डन व्हिसा देण्याची योजना जाहीर केल्यानंतर आतापर्यंत जगभरातील ३३ हजार ५०० लोकांना गोल्डन व्हिसा मिळाला आहे. हेन्ली अँड पार्टनर्सने शेअर केलेल्या डेटानुसार, यापैकी नऊ हजार १०० लोक चीनमधील आहेत, तर एक हजार ३४० लोक हे तुर्कीमधील आहेत. त्यानंतर रशियन, लेबनीज, इराणी आणि इजिप्शियन आहेत.
२०२१ ते २०२३ दरम्यान व्हिसा कार्यक्रमातून ग्रीकने ४.३ अब्ज युरो (३.९ लाख कोटी रुपये) किमतीची गुंतवणूक सुरक्षित केली आहे.
भारतातील किती लोकांनी गोल्ड व्हिसा घेतला?
ग्रीसच्या गोल्डन व्हिसाचे भारतीयांमध्येही मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. विशेषतः मुंबई, नवी दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या लोकांनी ग्रीसमध्ये आर्थिक गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्यांना गोल्डन व्हिजादेखील मिळाला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ग्रीकमध्ये आर्थिक गुंतवणूक करून अनेक भारतीयांनी कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला आहे. मोठ्या संख्येने भारतीय गुंतवणूकदार युरोपिय देशाकडे वळत असल्याने भारताचेही मोठं नुकसान होत आहे. आगामी काळात भारतालादेखील गुंतवणूक वाढविण्यासाठी अशाच प्रकारच्या योजना जाहीर करणे गरजेचं आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.