काही दिवसांपासून देशात ‘एक देश, एक निवडणूक’, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. नुकत्याच देशभरात सात विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका झाल्या. नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरवर्षी देशात कुठे ना कुठे निवडणुका सुरूच असतात. त्यामुळे ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेवर अनेक लोक चर्चा करीत आहेत. या चर्चेदरम्यान असे दिसते की, समाजातील एका वर्गाला वर्तमान राजकीय परिस्थितीचा तिटकारा वाटतो. काही राज्यांत तर निवडणुकीत ज्या पक्षाला मतदान केले, त्यांचे सरकार न येता दुसऱ्याच पक्षाची सरकारे स्थापन झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. आपण राजकीय पक्षांना मत देतो, त्याचे पुढे काय होते? त्याचा आपल्या जीवनावर काही सकारात्मक परिणाम होत आहे का? अशी विचारणा होत आहे. लोकांच्या या भावनेचा किंवा तात्त्विक गोंधळाचा युक्तिवाद काही शतकांपूर्वी प्रख्यात ग्रीत तत्त्ववेत्ता प्लेटो (इ.स.पू. ४२८‒ इ.स.पू. ३४८) यांनी केला आहे.

ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना आपल्या लिखाणातून मांडली आहे. ‘रिपब्लिक’ हा प्लेटो यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. या ग्रंथातून राज्य आणि त्यासाठीचे आवश्यक घटक यांची सविस्तरपणे मांडणी करण्यात आली आहे. या ग्रंथामध्ये प्लेटो यांचे गुरू सॉक्रेटिस आणि इतर विचारवंतांमधील संवादाच्या माध्यमातून आदर्श राज्य संकल्पनेला पूरक असलेल्या घटकांची चर्चा करण्यात आली आहे. या ग्रंथात एक वाक्य उद्धृत केले आहे, “ज्यावेळी सक्षम लोक राज्य करण्यास नकार देतात, तेव्हा एखाद्या निकृष्ट व्यक्तीच्या हातात राज्य जाते.” सक्षम लोकांची अनास्था ही निकृष्ट राज्यकर्ते मिळण्यास कारणीभूत ठरते, असे प्लेटो यांना सांगायचे आहे. हजारो वर्षांनंतर प्लेटो यांचा युक्तिवाद आजही समकालीन वाटतो. ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये प्लेटो यांचा सिद्धांत आणि वर्तमान राजकीय परिस्थिती यांची सांगड घालून विश्लेषणात्मक लेख लिहिला गेला आहे. त्याचाच हा आढावा…

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…

प्लेटो यांच्या वाक्याचा संदर्भ काय?

‘रिपब्लिक’ या ग्रंथात प्लेटो यांनी राज्यसंस्थेचा उगम, विकास, उद्देश, कार्यपद्धती इत्यादी प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. ही चर्चा करताना त्यांनी न्याय, सौंदर्यशास्त्र, शिक्षण, आदर्श राज्य पद्धत आणि मानवी संस्कृतीची सर्वंकष मीमांसा केली आहे. प्लेटो हे सॉक्रेटिस यांचे विद्यार्थी होते. अविवेकी शासनकर्त्यांमुळे सॉक्रेटिस यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली. त्यानंतर आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी प्लेटो यांनी रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संवादात्मक स्वरूपात आहे आणि ग्रंथातील सॉक्रेटिस हे पात्र आदर्श राज्याविषयीच्या विचारांची मांडणी करताना दिसते.

रिपब्लिक या ग्रंथात ‘लोकशाही : स्वरूप आणि मूल्यमापन’ या प्रकरणात प्लेटो यांनी केलेल्या युक्तिवादावर अनेकांनी टीका केलेली आहे. या प्रकरणात प्लेटो म्हणतात, “व्यक्तींच्या जन्मसिद्ध क्षमता आणि पात्रता भिन्न असतात. साहजिकच त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणारी जबाबदारी, त्यानुसार ठरणारा दर्जा व महत्त्व भिन्न असले पाहिजे.” प्लेटो यांचा जन्म ग्रीकच्या अथेन्स शहरात झाला होता, त्यावेळी प्लेटो यांना जे लोकशाहीचे जे स्वरूप दिसले, त्यावर त्यांनी टीका केली होती. प्लेटो यांना सामान्य व्यक्तीच्या निर्णयक्षमतेबाबत शंका आहे. म्हणून लोकशाहीमध्ये प्रशिक्षित लोक म्हणजेच तत्त्वज्ञानी असलेल्यांच्या हातात राज्य चालवायला दिले गेले पाहिजे, अशी निकड ते व्यक्त करतात.

प्लेटो यांनी आदर्श राज्यासाठी शिक्षण महत्त्वाचा आधार मानले आहे. सूत्रबद्ध पद्धतीने प्रत्येकाच्या वयानुरूप आणि पात्रतेनुसार शिक्षण देण्यास प्लेटोने सुचविले. बौद्धिक शिक्षणासोबतच शारीरिक शिक्षण, संगीत, साहित्य या घटकांनाही तेवढेच महत्त्व दिले गेले पाहिजे, असे प्लेटोचे मत होते. प्रशिक्षण देऊन राज्यकला आणि राज्यकारभाराचे विषय शिकवले जावेत. लोकांना ज्ञानी बनविण्यासोबतच त्यांच्यात सदगुणही असावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आदर्श राज्याबाबत चर्चा करीत असताना प्लेटो एके ठिकाणी म्हणतात की, पात्रता नसलेल्या व्यक्तींनी राज्य करताना सार्वजनिक घडामोडींबाबत केलेल्या घोडचुकांची किंमत चांगल्या माणसांना मोजावी लागते.

अपात्र लोकांनी राज्यकारभार करू नये, यासाठीचा युक्तिवाद काय?

रिपब्लिक ग्रंथात सॉक्रेटिसच्या तोंडून प्लेटोने स्वतःचे विचार मांडले आहेत. एके ठिकाणी ते म्हणतात, “जर मोबदला मिळत नसेल, तर कुणीही शासन करण्यास पुढे येणार नाही. कारण- वाईट गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचे काम कुणालाही हातात घ्यायला आवडत नाही. त्यामुळे राज्यकर्ते शासन करण्यास इच्छुक असावेत, यासाठी त्यांना तीनपैकी एक प्रकाराचा मोबदला दिला गेला पाहिजे. पैसे, प्रतिष्ठा किंवा शासन करण्यास नकार दिल्याबद्दल दंड… असे तीन प्रकार प्लेटो यांनी सुचविले.

पण यातील शेवटच्या ‘दंड’ या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सॉक्रेटिस या पात्राने त्याचेही स्पष्टीकरण दिले, “चांगली माणसे पैसा आणि प्रतिष्ठेच्या ध्येयापायी प्रेरित होत नाहीत. चांगल्या माणसांना राज्यकारभार करण्यासाठी उघडपणे मोबदला मागायचा नसतो किंवा चोरांच्या नावाने त्यांना सार्वजनिक महसुलातून स्वतःला छुप्या पद्धतीने मदत मिळवायची इच्छा नसते आणि महत्त्वाकांक्षी नसल्यामुळे प्रतिष्ठा मिळवण्याचीही त्यांना फार पर्वा नसते.”

“त्यामुळे दंडाचा धाक दाखवून त्यांना राज्यकारभारासाठी तयार करावे लागेल. हे कसे होईल? तर त्यांनी राज्य नाही केले, तर त्यांच्या जागी दुसरा कुणीतरी राज्य करील आणि त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल, या भीतीने चांगल्या माणसांना सेवा देण्यास प्रवृत्त करायला हवे. जर चांगल्या माणसांनी राज्य केले नाही, तर त्यांची जागा पात्रता नसलेले लोक घेतील.” प्लेटो यांच्या मतानुसार, सार्वजनिक सेवेद्वारे इतर लोकांची सेवा करण्याची प्रेरणा ही वैयक्तिक मोबदला किंवा स्वतःच्या प्रतिष्ठेच्या लालसेतून नाही, तर कोणतीही अयोग्य व्यक्ती राज्यकारभार करून अपयशी ठरेल, या भीतीतून ही प्रेरणा यायला हवी.

प्लेटोच्या युक्तिवादाचा काय अर्थ लावता येईल?

प्लेटोच्या विचारांवर अनेक विचारवंतांनी टीका करून, त्यातील मर्यादा लक्षात आणून दिलेल्या आहेत. तत्त्वज्ञ हे राज्यकर्ते असले पाहिजेत, अशी भूमिका प्लेटो मांडत असले तरी काही प्रज्ञावंतांनी इतर लोकांवर आपली सत्ता टिकविणे कितपत रास्त आहे, असा प्रश्न यातून निर्माण होतो. यातून हुकूमशाही प्रवृत्तीचा जन्म होऊ शकतो. प्लेटो यांच्या ‘रिपब्लिक’ ग्रंथाचे मराठी भाषांतर डॉ. ज. वा. जोशी यांनी केले आहे. या पुस्तकातील प्रस्तावनेत जोशी सांगतात, “प्लेटोने सुचविल्याप्रमाणे प्रज्ञावंताच्या मार्गदर्शनाखाली सामजिक प्रगती साधेलही; पण काही निवडक व्यक्तींचा विवेक नेहमीच ग्राह्ययुक्त ठरेल कशावरून? प्रज्ञावंतांनी प्रमाद केले, तर न्याय कुठे आणि कसा मागायचा? याची व्यवहार्य उत्तरे प्लेटोच्या शब्दशिल्पात सापडत नाहीत.”

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या लेखात, प्लेटोचा सिद्धांत चांगला असल्याचे म्हटले आहे. केवळ भौतिक फायदा मिळतोय म्हणून लोकांना समाजासाठी काहीतरी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळणार नाही. अनेक धर्मांच्या शिकवणींनी हे मान्य केले आहे की, इतरांसाठी चांगले काम करताना वैयक्तिक फायद्याचा विचार न करता, समाजाच्या भल्याचा विचार करावा.

“म्हणूनच सार्वजनिक संस्थांचा भाग होण्यापूर्वी स्वतःच्या महत्त्वाकांक्षांना मध्ये आणू नये, असे प्लेटो यांना सुचवायचे आहे. मला काय मिळेल, हा स्वार्थी विचार करण्याऐवजी इतर लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो याचा विचार केला गेला पाहिजे. तसेच ज्यांचे चांगले हेतू नाहीत, अशा निकृष्ट दर्जाच्या लोकांच्या हातात शासन गेल्यास त्याचे परिणाम काय होतील? याचा विचार केला गेला पाहिजे. एका अर्थी, राजकारण आणि सामाजिक जीवनात सहभाग घेणाऱ्यांनाही हे लागू होते. मतदान करताना किंवा राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेताना, ज्यांच्याकडे अधिकार आहेत, त्यांनी थेटपणे काहीतरी मिळवणे किंवा गमावणे आवश्यक नाही”, अशा पद्धतीने ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या लेखात प्लेटोचा सिद्धांत आजच्या परिस्थितीशी कसा अनुरूप आहे, हे सांगितले आहे.

सभोवतालच्या जगाची जाणीव असूनही लोक राजकीय निर्णय घेण्यात योगदान देत नाहीत, जीवनाचा दर्जा सुधारणे किंवा समाजातील उपेक्षितांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. लोक सहसा राजकारण आणि समाजकारणातील सहभागातून मिळणाऱ्या लाभांपासून प्रेरित होत नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रभागातील नागरी समस्यांचे निवारण करायचे आहे. नगरपालिकेच्या प्रतिनिधींशी (नगरसेवक) संपर्क साधून काम होणे शक्य आहे. तरीही लोक असे करण्यास धजावत नाहीत कारण त्यांना वाटते की, याच्यातून काहीही साध्य होणार नाही.

त्यासाठी प्लेटो यांनी चांगल्या लोकांनी सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे सुचविले आहे. यातून किती ध्येय साध्य होईल याची कल्पना नाही. पण, चुकीच्या लोकांच्या हातात शासन जाऊ नये आणि समाजाच्या भल्यासाठी इतर लोकांनी सार्वजनिक जीवनात सहभाग घेतला पाहिजे, असा सिद्धांत प्लेटो यांनी विशद केला.

Story img Loader