अमेरिकेत ‘ॲक्सिअम मिशन ४’ अंतर्गत भारताच्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला येत्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतातील ‘विविधतेत एकता’ दर्शविणाऱ्या काही बाबी ते अवकाशात घेऊन जाणार आहेत. भारताचे अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यासाठीही ते विशेष भेट घेऊन जाणार आहेत.
‘ॲक्सिअम मिशन ४’ नेमके काय ?
‘ॲक्सिअम मिशन ४’साठी अमेरिकेतील खासगी अवकाश कंपनी ‘ॲक्सिअम स्पेस’ने पुढाकार घेतला आहे. ‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’ यांच्याबरोबर भागीदारी त्यासाठी करण्यात आली आहे. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्याखेरीज अमेरिका, पोलंड, हंगेरी या देशांचा प्रत्येकी १ अंतराळवीर या मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणार आहे. शुक्ला ‘स्पेस-एक्स’चे ‘क्रू ड्रॅगन’ अवकाशयानाचे सारथ्य करतील.
पहिले भारतीय
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे भारताचे पहिले अंतराळवीर असतील. ‘स्पेस एक्स ड्रॅगन’ अवकाशयानातून ते अवकाशात जातील. फ्लोरिडा येथून ते उड्डाण करतील. ‘नासा’चे माजी अंतराळवीर आणि ‘ॲक्सिअम मिशन ४’चे संचालक पेगी व्हाइटसन या मोहिमेचे नेतृत्व करतील. तर, ग्रुप कॅप्टन शुक्ला वैमानिक असतील. युरोपीय अवकाश संस्थेचे आणि पोलंडचे अंतराळवीर स्लावोझ उझ्नान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे तिबूर कपू मोहीम तज्ज्ञ असतील. शुक्ला यांची नियुक्ती म्हणजे अमेरिकेची ‘नासा’ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संयुक्त प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यांच्यात तसा करार झाला आहे.
ग्रुप कॅप्टन शुक्ला कोण आहेत?
उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील असलेले ग्रुप कॅप्टन शुक्ला (वय ४०) भारतीय हवाई दलामध्ये लढाऊ वैमानिक आहेत. लहानपणापासून त्यांना अवकाश क्षेत्राची आवड होती. मात्र, भारतामध्ये मानवी अवकाशमोहिमांना मर्यादा असल्यामुळे नंतर ते लढाऊ विमानांकडे वळले आणि तेथे लढाऊ वैमानिक झाले. २००६ मध्ये ते भारतीय हवाई दलात दाखल झाले. विविध विमानांवर त्यांना दोन हजार तासांचा हवाई उड्डाणांचा अनुभव आहे. यामध्ये सुखोई-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जॅग्वार, हॉक, डॉर्नियर आदी विमानांचा समावेश आहे. भारताची मानवी अवकाशमोहीम ‘गगनयान’चेही ते नियोजित अंतराळवीर आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘इस्रो’मधून फोन आला. रशियातील मॉस्को येथे ‘युरी गॅगारिन कॉस्मोनॉट प्रशिक्षण केंद्र’ येथे त्यांचे वर्षभर प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.
राकेश शर्मा यांच्यासाठी विशेष भेट
राकेश शर्मा भारताकडून अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर. तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या ‘सोयूझ टी-११’ मोहिमेंतर्गत ते अवकाशात गेले होते. तेथे आठ दिवस ते राहिले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधला होता. अवकाशातून भारत कसा दिसतो, असे इंदिरा गांधी यांनी विचारल्यानंतर त्यांचे जगप्रसिद्ध असे उत्तर होते, ‘सारे जहाँ से अच्छा… ’
अवकाशात जाताना अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यासाठी ते विशेष भेट नेणार आहेत. ही बाब ग्रुप कॅप्टन शुक्ला यांना गोपनीय ठेवायची आहे. मोहीम पूर्ण झाल्यानंतरच ते सर्वांना कळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याखेरीज, भारतातील विविध प्रांतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तू ते बरोबर नेतील. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाताना देशभरातून छोटे टोकन शुक्ला बरोबर नेणार आहेत. प्रत्येक विभागातून कुठली गोष्ट अंतराळात नेता येईल, यासाठी इस्रोने विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनाही आवाहन केले आहे.
गगनयान मोहिमेमध्येही सहभाग
ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्यासह हवाई दलातील तीन अधिकाऱ्यांची भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झाली आहे. राकेश शर्मा यांच्या संपर्कात सातत्याने असून, त्यांचे मार्गदर्शन घेत असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. ‘अंतराळवीरांच्या निवडीपासून प्रत्येक टप्प्यावर ते सक्रिय सहभागी असून, भारताच्या मानवी अवकाशमोहिमेमध्ये त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. मला ते विविध गोष्टींवर मार्गदर्शन करतात. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत,’ असे ग्रुप कॅप्टन शुक्ला म्हणाले.
prasad.kulkarni@exressindia.com