गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवला. राज्यातील एकूण २१७१ जागांपैकी १६०८ जागा भाजपने जिंकल्या. मात्र या यशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी भाजपकडून ७६ मुस्लिम उमेदवार यशस्वी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदुत्वाची प्रयोगशाळा

गुजरात हा भाजपचा अभेद्य गड. राज्यात १९९५ पासून पक्षाची निर्विवाद सत्ता असून, तीन दशकांहून अधिक काळ भाजपच्या वर्चस्वाला होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे गृहराज्य. गेल्या म्हणजे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील १८२ पैकी १५६ जागा भाजपने पटकावल्या. हादेखील एक विक्रमच. ही आकडेवारी पाहता गुजरात ही भाजपच्या हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानली जाते. जणू राज्यात भाजपला फारसे आव्हानच नाही अशीच स्थिती आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यावर शिक्कमोर्तब झाले. भाजपने ६८ पैकी ६० नगरपालिका, तीनही पंचायत समित्या तसेच जुनागड महापालिकेवर झेंडा रोवला. समाजवादी पक्षाला दोन तर काँग्रेसला एकमेव नगरपालिका जिंकता आली. पाच नगरपालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. अपक्ष सत्तेकडे जातात हे समीकरण लक्षात घेतले तर तेथेही भाजप आपल्या विचाराचा अध्यक्ष यावा यासाठी प्रयत्न करेल अशीच शक्यता आहे.

शंभरावर मुस्लिम उमेदवारांना संधी

भाजपकडून अधिकाधिक संख्येने मुस्लिम विजयी झाले हा या निवडणुकीतील महत्त्वाचा भाग. जेथे मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे येथे भाजपने चांगले यश मिळवले. या पालिकांमध्ये यापूर्वी २०१८ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी भाजपकडून ४५ मुस्लिम नगरसेवक विजयी झाले होते. यंदा ही संख्या ७६ वर गेली, त्यात ३३ महिला आहेत. भाजपने १०३ मुस्लिम उमेदवारांना संधी दिली होती. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. आता हे चित्र पाहता दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप मुस्लिम समाजाला संधी देणार काय, हा मुद्दा आहे. पाटण, खेडा, पंचमहल आणि जुनागड येथे गेल्या वेळी भाजपकडून एकही मुस्लिम विजयी झाला नव्हता. यंदा हे चित्र बदलले. सात वर्षांपूर्वी राज्यात भाजपचे एकूण २५२ मुस्लिम नगरसेवक होते. यंदा ही संख्या २७५ वर गेली. जवळपास २८ टक्के प्रतिनिधित्व आहे, तर काँग्रेसकडून ३९ टक्के मुस्लिम विजयी झाले. आम आदमी पक्षाचे १३ मुस्लिम नगरसेवक विजयी झाले. 

विकास योजनांचा लाभ

मुस्लिम समाजाला विकास योजनांचा लाभ मिळाला. त्यामुळे तुष्टीकरणाच्या राजकारणापेक्षा भाजपचे विकासाचे राजकारण समाजाला हवे आहे, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मोहसीन लोखंडवाला यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. भाजप विकासकामांमध्ये भेदभाव करत नाही याची खात्री मुस्लिमांना असल्याचे लोखंडवाला यांनी नमूद केले. काँग्रेसकडून समाज भाजपकडे वळत असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. २०१८ मध्ये एकूण २०६४ प्रभागांपैकी त्यांच्याकडे ६३२ जागा होत्या. यंदा ही संख्या घसरून २५२ वर आली. पक्षाकडून विजयी होणाऱ्या मुस्लिम उमेदवारांची संख्याही १३३ वरून १०९ इतकी खाली आली. अर्थात काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व ते विजयी झाल्याचे राज्यातील काँग्रेसचे एकमेव मुस्लिम आमदार इम्रान खेडावाला यांनी स्पष्ट केले. विकासकामे होणे महत्त्वाचे असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. 

किमान सुविधांची अपेक्षा

जिंकण्यासाठी जी जिद्द लागते त्याचा काँग्रेसमध्ये अभाव दिसतो. मुस्लिम समाजाला किमान सुविधांची अपेक्षा आहे. अशा वेळी जर काँग्रेस समाजाला मदत करणार नसेल तर मग ते भाजपकडे वळतील, अशी प्रतिक्रिया येथील अभ्यासकांनी दिली. एआयएमआयएमने राज्यात ७१ उमेदवार दिले होते. त्यातील १२ हिंदू होते. मात्र त्यांना राजकोट जिल्ह्यात उपलेटा पंचायतीत एकच जागा जिंकता आली. आम्हाला एकच जागा मिळाली असली तरी, आमच्या उमेदवारांची अनामत रक्कम कोठेही जप्त झाली नाही, अशी प्रतिक्रिया एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सबीर कबलीवाला यांनी दिली. देशभरात भाजपचे प्राबल्य २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर वाढल्याचे हरियाणा, महाराष्ट्र तसेच दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाने दाखवून दिले. त्यातच गुजरातमध्ये भाजपचे संघटनात्मक बळ विरोधकांपेक्षा कितीतरी अधिक आहे. आता तर मुस्लिम समाजातही भाजपची स्वीकारार्हता वाढल्याचे स्थानिक निवडणुकीतून दिसून आले. गुजरातमध्ये अजून दोन वर्षांनी होणारी निवडणूक काँग्रेससाठी सोपी नसेल हे मात्र नक्की.