भारतीय अभियंता अमित गुप्ता यांना कतारमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. ते गेल्या तीन महिन्यांपासून कतार सरकारच्या ताब्यात आहेत. त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती कतारमधील भारतीय दूतावासालादेखील देण्यात आली आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेनुसार, कतारमधील भारतीय दूतावास गुप्ता यांचे कुटुंब, त्यांचे वकील आणि कतारी अधिकाऱ्यांशी नियमित संपर्कात आहे. गुप्ता यांना १ जानेवारी रोजी कतारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांना ताब्यात का घेण्यात आले? कोण आहेत अमित गुप्ता? याबाबत जाणून घेऊ.

अमित गुप्ता कोण आहेत?

अमित गुप्ता हे भारतातील सर्वांत मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टेक महिंद्रा या कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी आहेत आणि त्यांना कतारमध्ये तीन महिन्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आले आहे. अमित गुप्ता हे मूळचे गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी आहेत. ते २०१३ साली कतारची राजधानी दोहा येथे स्थलांतरित झाले. ‘मिंट’च्या वृत्तानुसार, तीन वर्षांपासून अमित गुप्ता ‘टेक महिंद्रा’मध्ये कतार आणि कुवेतकरिता क्षेत्र प्रमुख म्हणून काम करीत आहेत.

गुप्ता यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी कंपनीत वरिष्ठ सेल्स मॅनेजर आणि क्लायंट पार्टनर म्हणून काम केले आहे. त्यांना आयटी कंपनीमध्ये जवळजवळ १२ वर्षांचा अनुभव आहे. अमित गुप्ता यांनी ‘टेक महिंद्रा’पूर्वी ‘न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स’मध्ये तीन वर्षे काम केले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ‘इन्फोसिस’मध्ये सहायक व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. अमित गुप्ता यांनी जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था येथून कॉम्प्युटर सायन्स विषयात बी.टेक. ही पदवी मिळवली आहे.

त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, गुप्ता यांनी नवी दिल्लीतील इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (आयएमआय) येथून मार्केटिंग आणि सिस्टीम्समध्ये मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची (एमबीए) पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांच्या पालकांच्या मते, १ जानेवारी रोजी ते जेवण्यासाठी बाहेर गेले असता, अनोळखी व्यक्तींनी त्यांना पकडून नेले. त्यांच्या अटकेमागील कारण त्यांच्या कुटुंबीयांनाही स्पष्टपणे माहीत नाही. त्यांच्या कुटुंबाने पंतप्रधान कार्यालय आणि इतर अधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

अमित गुप्ता यांना का ताब्यात घेण्यात आले?

अद्याप अमित गुप्ता यांच्यावरील आरोपांचा खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु, अनेक अहवालांवरून असे दिसून येते की, त्यांना डेटाचोरीच्या आरोपाखाली कतारमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबाचा असा दावा आहे की, ते निर्दोष आहेत आणि त्यांच्यावर चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. अमित गुप्ता यांच्या वडिलांनी सांगितले की, कतारच्या राज्य सुरक्षेने ‘टेक महिंद्रा’च्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. अमित गुप्ता यांची पत्नी आणि पालक त्यांची सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत.

पत्रकारांशी संवाद साधताना, गुप्ता यांच्या आईने सांगितले की, त्यांच्या मुलावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी असाही दावा केला आहे की, त्याला सुमारे ४८ तास अन्नाशिवाय बसवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला एका खोलीत नेण्यात आले आणि जवळजवळ तीन महिने त्याच खोलीत ठेवण्यात आले आहे,” अशी माहिती अमित गुप्ता यांची आई पुष्पा गुप्ता यांनी वृत्तसंस्था ‘आयएएनएस’ला दिली आहे. त्यांना का ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत त्यांना माहीत आहे का, असा प्रश्न केला असता, त्या म्हणाल्या “कंपनीतील कोणीतरी काहीतरी केले असेल, त्याला (अमित गुप्ता) क्षेत्र प्रमुख असल्याने अटक करण्यात आली आहे.”

त्यांच्या आई पुढे म्हणाल्या की, त्याचा कुटुंबाला दर बुधवारी त्याचा पाच मिनिटांचा फोन येतो. हे त्याच्याशी संपर्काचे एकमेव साधन आहे. या कॉलदरम्यान तो फक्त मला लवकरात लवकर येथून बाहेर काढा, असे म्हणत आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. “आम्ही सर्व अलीकडेच दोहा येथे गेलो होतो आणि तिथे एक महिना राहिलो होतो. भारतीय राजदूतांच्या हस्तक्षेपानंतर आम्हाला अर्धा तास त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. त्याने आम्हाला त्याच्या समस्यांबद्दल सांगितले,” असे अमित गुप्ता यांच्या आईने सांगितले.

अमित गुप्ता यांच्या आई-वडिलांनी अलीकडेच वडोदराचे खासदार हेमांग जोशी यांची मदत मागितली. हेमंग जोशी यांनी त्यांना आश्वासन दिले की, ते सरकारसमोर हा मुद्दा उपस्थित करतील. या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ माहिती दिली की, गुप्ता यांना भारतीय अधिकारी सर्वतोपरी मदत करीत आहेत.

टेक महिंद्रा कंपनीने काय प्रतिसाद दिला?

‘टेक महिंद्रा’च्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी गुप्ता यांच्या कुटुंबाला पाठिंबा देत आहे आणि त्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. “आम्ही दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहोत. तसेच योग्य आणि कायदेशीर प्रक्रियांचे पालन करीत आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांचे कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे टेक महिंद्रा कंपनीच्या प्रवक्त्याने ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.