सौर ऊर्जेला चालना देण्याच्या दिशेने भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा हे गाव भारतातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून घोषित केलं जाणार आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ही घोषणा करणार आहेत. गुजरात सरकारच्या मते, या प्रकल्पाचा एक भाग म्हणून मोढेरा गावातील एक हजारहून अधिक घरांवर सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत. यामुळे मोढेरा गावातील रहिवाशांना चोवीस तास वीज मिळणार आहे, असा दावा गुजरात सरकारने केला आहे.
या सौर पॅनेलच्या माध्यमातून रात्रीच्या वेळीही घरांना वीज पुरवठा केला जाणार आहे. कारण संबंधित सौर पॅनेल ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम’शी (BESS) जोडण्यात आलं आहे. यामुळे दिवसभरातील अतिरिक्त वीज या बॅटऱ्यांमध्ये साठवली जाणार आहे. मोढेरा हे भारतातील पहिले ग्रिड-कनेक्टेड आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसह सुसज्ज असणारं गाव बनलं आहे. यामुळे सूर्यास्तानंतरही गावात वीज पुरवठा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
BESS म्हणजे काय?
बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (BESS) हे एक इलेक्ट्रोकेमिकल उपकरण आहे. जे ग्रिड किंवा पॉवर प्लांटमधून मिळणारी ऊर्जा साठवून ठेवते आणि आवश्यकतेनुसार वीज पुरवण्याचं काम करते. कालांतराने या बॅटरीतील ऊर्जा संपते, या बॅटरीला पुन्हा चार्ज करावं लागतं.
ग्रिड-स्केल बॅटरी स्टोरेज म्हणजे काय?
बॅटरी स्टोरेज हे एक असं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये आपल्याला भविष्यात वापरण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा साठवून ठेवता येते. नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅबोरेटरी (NREL) नुसार, ऊर्जा व्यवस्थेची लवचिकता वाढवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी बॅटरी स्टोरेज हा एक उत्तम पर्याय आहे. ही परस्पर जोडलेली ऊर्जा प्रणाली कोणत्याही बाह्य संसाधनांशिवाय अक्षय ऊर्जा साठवून ठेवू शकते.
BESS ला प्राधान्य का दिले जाते?
BESS ही एक प्रदूषण विरहीत बॅटरी स्टोरेज प्रणाली आहे. त्यामुळे अनेक बड्या उद्योगांनी कार्बनचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या उद्योगांजवळ BESS ची निर्मिती केली आहे. BESS ही सध्याच्या घडीला उपलब्ध असलेली सर्वात आधुनिक ऊर्जा-कार्यक्षम आणि बॅटरी ऊर्जा संचयन प्रणाली आहे. याची निर्मिती व्यावसायिक तत्वावर करण्यात आली असून शिपिंग कंटेनरमध्ये बसण्यासाठी या बॅटरीचं डिझाइन करण्यात आलं आहे.
मोढेरा गावात BESS प्रणालीद्वारे कसं काम केलं जातं?
गुजरातमधील मोढेरा हे गाव सौर ऊर्जा प्रकल्पाने सुसज्ज आहे. या गावात १३०० हून अधिक घरांवर सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. या प्रत्येक सौर पॅनेलची क्षमता एक किलोवॅट इतकी आहे. हे सर्व पॅनेल मेहसाणा जिल्ह्यातील सुज्जनपुरा येथे निर्माण केलेल्या BESS शी जोडले आहेत. दिवसा छतावरील पॅनेलच्या माध्यामातून घरांना वीज पुरवठा केला जातो. तर रात्री किंवा सूर्य मावळल्यानंतर BESS च्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो.