पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सभेत गुरुवारी गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात इम्रान खान जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी लागली असून सहा कार्यकर्त्यांनाही गंभीर इजा झाली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेमुळे पाकिस्तानातील वातावरण ढवळून निघाले आहे. पाकिस्तानच्या सत्तेवरुन विद्यमान शाहबाज शरीफ सरकार आणि पाकच्या लष्कर प्रमुखांशी सुरू असलेला इम्रान खान यांचा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.
Video : रॅलीवरील गोळीबारानंतर इम्रान खान जखमी, हल्लेखोरास अटक; पाहा हल्ल्यानंतरचे दृश्य
इम्रान खान यांचे गंभीर आरोप
जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर खान यांनी पाकिस्तानातील राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या हल्ल्यामागे पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाऊल्लाह आणि मेजर जनरल फैजल यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फैजल हे ‘आयएसआय’च्या ‘काऊंटर-इंटेलिजन्स’चे प्रमुख आहेत. बलुचिस्तानातील एका विशेष मोहिमेमध्ये सहभागी असलेले फैजल यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. दरम्यान, कथित हल्लेखोराला घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्लेखोराच्या पोलीस चौकशीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरुनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पत्रकार अर्शद शरीफ यांची हत्या
केनियामध्ये पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची हत्या करण्यात आली. ते इम्रान खान यांचे खंदे समर्थक होते. त्यांच्या हत्येनंतर खान समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या हत्येनंतर आणखी काही जणांचा जीव जाईल, अशी शक्यता ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. शरीफ यांच्या हत्येनंतर दोन पत्रकारांनी देश सोडला आहे.
PHOTOS : इम्रान खान यांच्या रॅलीत AK-४७ ने गोळीबार, पाकिस्तानमध्ये तणाव; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
खान यांच्यावरील हल्ल्याचे संकेत आधीच मिळाले होते का?
खान यांच्या ‘लाँग मार्च’च्या आधीपासून हिंसाचाराची शक्यता ‘तेहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाच्या एका माजी नेत्याने व्यक्त केली होती. खान यांच्या पदयात्रेत सहभाग घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी मोठा हिंसाचार घडवला जाईल, असा दावा ‘पीटीआय’च्या नेत्याने केला होता. “सगळीकडे मृतदेह दिसतील, रक्त सांडलेले दिसेल”, असे वक्तव्य या नेत्याने केले होते. या नेत्याची खान यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
बेनझीर भुट्टोंच्या सभेची चर्चा का होत आहे?
इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दिवंगत ज्येष्ठ नेत्या बेनझीर भुट्टो यांच्या एका सभेतील क्रुर आठवणी ताज्या झाल्या आहेत. १८ ऑक्टोबर २००७ मध्ये कराची विमानतळावरुन निघालेल्या भुट्टो यांच्या पक्षाच्या पदयात्रेत मोठा बॉम्बस्फोट झाला होता. या हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता. बेनझीर भुट्टो आणि तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्यात एक राजकीय करार झाला होता. पाकिस्तानात परतल्यानंतर बेनझीर निवडणूक लढवून पंतप्रधान होतील, तर मुशर्रफ राष्ट्रपती राहतील, असा हा दोन नेत्यांमधील करार होता. मात्र, या करारावर स्वाक्षरी करण्याआधी मुशर्रफ यांनी लष्करप्रमुखपद सोडावे, अशी भुट्टो यांची इच्छा होती. कराराच्या अटी मान्य केल्याशिवाय भुट्टो यांनी देशात परतू नये, असे मुशर्रफ यांना वाटत होते. भुट्टो यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप काढून टाकणाऱ्या अध्यादेशावर मुशर्रफ यांनी स्वाक्षरी करताच त्या मायदेशी परतल्या. कराची विमानतळावरून बाहेर पडताच भुट्टो यांनी मोठी सभा घेतली. या सभेत झालेल्या बॉम्बस्फोटातून भुट्टो थोडक्यात बचावल्या होत्या. मात्र, तब्बल २०० लोकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या सभेनंतर दोन महिन्यांनी भुट्टो यांची हत्या करण्यात आली.
विश्लेषण: विराट कोहली अपयशाच्या गर्तेतून कसा बाहेर पडला? त्याच्या सध्याच्या भरारीचे रहस्य काय?
इम्रान खान यांच्या ‘लाँग मार्च’चा उद्देश काय होता?
देशात तत्काळ निवडणुका व्हाव्यात, यासाठी सरकार आणि लष्करावर दबाव वाढवण्यासाठी इम्रान खान यांनी हा लाँग मार्च काढला होता. पाकिस्तानात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. पण त्या याच वर्षी झाल्यास निवडणूक जिंकण्याचा विश्वास असल्याने, खान यांच्याकडून ही मागणी केली जात आहे. लष्करातील सत्ताबदल होण्याची खान वाट पाहत असल्यानेच या यात्रेचा वेग कमी असल्याची चर्चा पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात आहे. लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने पाकिस्तानची सत्ता पुन्हा हस्तगत करण्याचा खान यांचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या पाकिस्तानात आहे.