Gwalior as city of music मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहर १ नोव्हेंबर २०२३ रोजी (UNESCO) युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये (UCCN) “संस्कृती आणि सर्जनशीलतेचा उपयोग करण्याच्या दृढ वचनबद्धतेसाठी” समाविष्ट करण्यात आले. या नेटवर्कमध्ये सामील झालेल्या ५५ ​​नवीन शहरांमध्ये केरळमधील कोझिकोडे या शहराचाही समावेश होता. भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा असा जागतिक स्तरावर होणारा गौरव ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगीतमय भूतकाळाची कहाणी

ग्वाल्हेर आणि तेथून निर्माण झालेल्या घराण्यांच्या उल्लेखाशिवाय भारतीय संगीताचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. शहराचा गौरवशाली भूतकाळ संगीत परंपरांनी नटलेला आहे. या शहराच्या इतिहासात होऊन गेलेले अनेक शासक स्वतः संगीतकार होते. तर त्यातील अनेक संगीताचे खंदे रसिक चाहते होते. ग्वाल्हेरमध्ये संगीतकारांना मानाचे स्थान होते, संगीत परंपरेचे यजमानपद या शहराने भूषविले होते. या शहराने आश्रय दिलेले अनेक संगीतकार खुद्द याच शहरात जन्मलेले तर होतेच, पण त्याचबरोबर इथे शिकण्यासाठी आलेलेही अधिक संख्येने होते. त्यांनाही या शहराने आपलेसे केले.

अधिक वाचा: इस्रायल- हमास युद्ध: इस्रायलच्या राष्ट्रध्वजावर ‘हे’ चिन्ह आले कुठून? 

सर्वात जुने संगीत घराणे

ग्वाल्हेर घराणे हे सर्वात जुने संगीत घराणे आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण अध्याय १५ व्या शतकात राजा मानसिंग तोमर यांच्या नेतृत्वाखाली बहरला. मानसिंग यांचे आजोबा डुंगरेंद्र सिंग तोमर, स्वत: संगीतकार होते, त्यांनी शैक्षणिक आवड आणि आश्रयाद्वारे भारतीय शास्त्रीय संगीताचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संस्कृतमधील दोन संगीत ग्रंथ संगीत शिरोमणि आणि संगीत शिरोसंगीत चुडामणि हे त्यांचे मित्र आणि काश्मीरचा सुलतान झैन-उल-अब्दिन यांना भेट म्हणून दिले होते. या ग्रंथांमध्ये संगीत आणि वाद्य यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
डुंगरेंद्र यांनी ‘विष्णुपद’ (विष्णूची स्तुती करणारे गाणे) हे गाण्याच्या एका अनोख्या शैलीसह रचले आणि मानसिंग यांना दिले, मानसिंग हे १४८६ साली सिंहासनावर विराजमान झाले होते. शास्त्रीय शैलीच्या अर्थाने मानसिंग यांनी धृपदाचा शोध लावला असे मानले जाते. त्यांचे होरिस आणि धमर देखील खूप लोकप्रिय झाले. राजा संगीतकार असलेल्या सुफी संतांचा सल्ला घेत असे. भारतीय संगीत लोकप्रिय करण्याच्या प्रयत्नात त्यांनी संस्कृत गाण्यांच्या जागी साध्या हिंदी गाण्यांचा समावेश केला. मानसिंग यांनी मनकुतुहला (शिक्षणासाठी शोध) हा ग्रंथ देखील लिहिला, जो हिंदी भाषेतील संगीताचा पहिला ग्रंथ मानला जातो, या ग्रंथाने मोठ्या संख्येने प्रेक्षकांना राज दरबारात सादर केलेली उच्च कला समजण्यास मदत केली. यामुळे धृपद अधिक सुलभ झाले, ज्यात आता रागांमध्ये गायल्या जाणाऱ्या विष्णुपदांचा समावेश आहे. राजाने आपल्या राजवाड्यात मोठे भव्य असे संगीतगृह बांधले आणि नियमित संगीत सत्रे आयोजित केली. त्यांचे संगीत सुफी तसेच मुस्लिम सुलतानांमध्येही लोकप्रिय होते.
ग्वाल्हेर घराण्याचे वैभव

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विविध घराण्यांमध्ये विभागले जाण्यापूर्वी, संगीत विचारधारा आणि प्रणाली संगीतकाराच्या वंशानुसार किंवा शैलीनुसार ओळखल्या जात होत्या. ग्वाल्हेर हे संगीताचे पहिले घराणे म्हणून उदयास आले आणि मुघल राजवटीत विकसित झाले. घराण्याच्या सुरुवातीच्या उस्तादांमध्ये नथ्थन खान, नथ्थन पीर बक्श आणि त्यांचे नातू हड्डू, हसू आणि नत्थू खान यांचा समावेश होता. ख्याल गायन, हे ज्या पद्धतीने आज आपल्याला माहीत आहे, ती ग्वाल्हेर घराण्याची देण आहे. हे ख्याल गायन कव्वालीच्या घटकांचा समावेश करताना ग्वाल्हेर घराण्याच्या आश्रयाने धृपदामधून उदयास आले. उस्ताद नथ्थन पीर बक्श हे ख्याल तयार करणार्‍या सुरुवातीच्या उस्तादांपैकी एक होते. ही राग सादर करण्याची सुव्यवस्थित प्रणाली १८ व्या आणि १९ व्या शतकात अत्यंत लोकप्रिय झाली आणि आजही लक्षणीय आहे.
ग्वाल्हेरबद्दल मनोरंजक गोष्ट म्हणजे ‘बंदिश की ठुमरी’च्या (ठुमरी किंवा प्रेमगीतांची अधिक संरचित शैली) तुकड्यांमध्ये आणि संकल्पनांमध्ये पर्शियन शब्दांचा समावेश करणे. विशेष म्हणजे ग्वाल्हेर घराण्यातून उदयास आलेला प्रत्येक कलाकार वेगळा वाटत होता आणि तरीही शैलीत एक विशिष्ट एकता होती.

अधिक वाचा: इस्रायल-हमास युद्ध: आजच्या जगण्यासाठी बॉम्ब शेल्टर्स का महत्त्वाचे ठरत आहेत?

तानसेन, ग्वाल्हेरचा प्रसिद्ध संगीतकार

मियां तानसेन हे कवी आणि संगीतकार यांच्यासाठी ‘रामतनू’ म्हणून जन्मलेले ग्वाल्हेरच्या सुरुवातीच्या शिष्यांपैकी एक होते. १६ व्या शतकाच्या सुरूवातीस, त्यांनी स्वामी हरिदास यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले, ज्यांनी धृपदाचा अभ्यास केला परंतु त्यांची कविता विष्णूऐवजी कृष्णाला समर्पित होती. प्रसिद्ध सुफी संत मोहम्मद घोस यांचाही तानसेन यांच्यावर मोठा प्रभाव होता. घोस यांच्याकडून शिकत असताना, तानसेन यांनी ग्वाल्हेर घराण्याची शैली समजून घेतली आणि त्याचा आदर केला, त्यानंतर अनेक वर्षे मध्य प्रदेशातील रेवा येथील राजा रामचंद्र सिंह यांच्या दरबारी संगीतकार होते.
त्याच्या संगीताच्या तेजाची आणि ज्ञानाची कीर्ती चहूबाजुंना पसरली, त्यामुळेच अकबराने तानसेन यांना मुघल दरबारात आपल्या दरबारातील संगीतकारांचा एक भाग होण्यासाठी आमंत्रित केले. तानसेन एक वैष्णव संगीतकार होते, त्यामुळे त्यांनी प्रथम या आमंत्रणाला नकार दिला, परंतु राजा रामचंद्रांनी जाण्याचा आग्रह केल्यावर, वयाच्या ६० व्या वर्षी ते अकबराच्या दरबारात सामील झाले. अबुल फजलच्या ऐन-इ-अकबरीमध्ये ३६ शाही संगीतकारांचा उल्लेख आहे, त्यापैकी १५ ग्वाल्हेरचे होते. तानसेन यांच्याबद्दल अकबराच्या कौतुकाला लोकप्रिय संस्कृतीत बरेच स्थान मिळाले आहे आणि त्यातील बरेचसे संगीतकाराच्या लिखाणातून प्रसिद्ध झाले आहे.

बंगश घराणे आणि उस्ताद हाफीज अली खान

उस्ताद हाफिज अली खान हे सरोद वादक नन्नेह खान यांचा मुलगा, आणि ग्वाल्हेरमध्ये अनेक वर्षे वास्तव्य करणारे सर्वात लक्षणीय आणि लोकप्रिय संगीतकारांपैकी एक. मियां तानसेन यांचे वंशज मानल्या जाणार्‍या रामपूरच्या उस्ताद वजीर खान यांच्याकडे ते संगीत शिकले. त्यांचा जन्म १८८८ साली झाला, ते ग्वाल्हेरमधील दरबारी संगीतकार होते. २० व्या शतकाच्या सुरुवातीस, ज्या वेळेस संगीत परिषदा लोकप्रिय झाल्या, त्या वेळेस ते या बैठकांमध्ये संगीत सादर करणारे सर्वात लोकप्रिय कलाकार होते आणि ते अतिशय उत्तम संगीतकार म्हणून ओळखले जात होते. त्यांचा मुलगा आणि प्रमुख शिष्य उस्ताद अमजद अली खान आणि पं भीमसेन जोशी यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण संगीतकारांना त्यांनी काही महिने प्रशिक्षण दिले. उस्ताद अमजद अली यांनी ग्वाल्हेरमध्ये सरोद घराण्याचीही स्थापना केली, एका संग्रहालयात त्यांच्या पुरातन आणि समकालीन वाद्यांचा संग्रह आहे. याशिवाय भरपूर संग्रहित साहित्य, छायाचित्रे, पुस्तके आणि दृकश्राव्य रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत.

अधिक वाचा: चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?

ग्वाल्हेर घराण्यातील काही उल्लेखनीय नावे

या सुप्रसिद्ध नावांमध्ये हद्दू खान यांचा मुलगा बडे इनायत हुसेन खान (१८५२-१९२२), वासुदेव बुवा जोशी, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर (१८४९-१९२६) विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे गुरु, विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी नंतर गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली, जे आजपर्यंत सुरू आहे तसेच पाकिस्तानी गायिका फरीदा खानम आणि इतर अनेक प्रसिद्ध संगीतकारांचा समावेश होतो.
त्यानंतर आलेल्या पिढीमध्ये पं कुमार गंधर्व, मालिनी राजूरकर, वीणा सहस्रबुद्धे आणि धारवाडस्थित पं व्यंकटेश कुमार यांचा समावेश होता, त्यांच्या संगीताला किराणा गायकीचाही वेगळा स्पर्श आहे. आजही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकणारा कुठलाही विद्यार्थी ग्वाल्हेर घराण्याने शोधून काढलेल्या आणि शिकवलेल्या तंत्रांचा आणि बारकाव्यांचा अभ्यास करतो एवढे हे घराणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच युनेस्कोचा हा सन्मान केवळ ग्वाल्हेर शहरासाठी नाही तर समस्त भारतीयांसाठी अभिमानबिंदू ठरावा!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gwalior city of music world recognition for the city that made even akbar fall in love with music what are the musical traditions associated with this city svs
Show comments