Hajj Yatra 2024 मुस्लीम धर्मीयांमध्ये हज आणि उमराह या यात्रांना अतिशय महत्त्व आहे. आयुष्यात एकदा तरी या पवित्र ठिकाणी भेट देण्याची इच्छा मुस्लीम बांधवांना असते. सौदी अरेबियातील मक्का येथे दरवर्षी ही यात्रा असते. या यात्रेची सुरुवात झाली असून हळूहळू मुस्लिम यात्रेकरू मक्का या पवित्र शहरात येत आहेत. हज यात्रेला इस्लाम धर्मातील प्रमुख पाच कर्तव्यांपैकी एक मानले जाते. सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार, १४ जूनपासून सुरू होणाऱ्या वार्षिक तीर्थयात्रेपूर्वी १.५ दशलक्षाहून अधिक परदेशी यात्रेकरू देशात दाखल झाले आहेत. या वर्षी यात्रेकरूंची संख्या २०२३ पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. २०२३ मध्ये या यात्रेसाठी १.८ दशलक्षाहून अधिक यात्रेकरू मक्का येथे आले होते. परंतु, इस्लाम धर्मात या यात्रेला इतके महत्त्व का आहे? हज यात्रा म्हणजे नक्की काय? या यात्रेत मुस्लीम कोणते विधी करतात? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

हज यात्रा म्हणजे काय?

सौदी अरेबियातील मक्कामध्ये दरवर्षी ही इस्लामिक तीर्थयात्रा असते. इस्लाममधील धार्मिक मान्यतेनुसार जे लोक आर्थिक आणि शरीरिकदृष्ट्या सक्षम असतात, त्यांना आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करणे बंधनकारक असते. काही मुस्लीम एकापेक्षा जास्त वेळाही हज यात्रेला जातात. इस्लाम धर्मात कलमा, रोजा, नमाज, जकात आणि हज अशी प्रमुख पाच कर्तव्ये (फर्ज) आहेत. धू-अल-हिज्जा या इस्लामिक दिनदर्शिकेच्या शेवटच्या महिन्यात हज यात्रेला प्रारंभ होतो. दरवर्षी यात्रेच्या तारखा वेगवेगळ्या असतात. यंदा हज यात्रा १४ जून पासून सुरू झाली आहे.

सौदी अरेबियातील मक्कामध्ये दरवर्षी ही इस्लामिक तीर्थयात्रा असते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : सरकार स्थापन होताच जगन्नाथ पुरी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याला भाजपाने दिले प्राधान्य; या दरवाजांचे महत्त्व काय?

मुस्लिमांसाठी हज यात्रेचे महत्त्व काय?

यात्रेकरूंसाठी, हज करणे हे एका धार्मिक दायित्वाप्रमाणे आहे. अनेकजण ही यात्रा करण्यासाठी आपल्या आयुष्यभराची कमाई साठवताता. केलेल्या पापांची क्षमा मागण्यासाठी आणि अल्लाहच्या आणखी जवळ जाण्यासाठी म्हणून या यात्रेकडे पहिले जाते. सांप्रदायिकदृष्ट्या, हज यात्रेमुळे जगभरातील विविध वंश, भाषा आणि आर्थिक वर्गाचे मुस्लीम एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी धार्मिक विधी आणि देवाची उपासना करण्यासाठी एकत्र येतात. यामुळे अनेकांमध्ये एकता, नम्रता आणि समानतेची भावना येते. अल्लाहने आदेश दिल्याप्रमाणे इब्राहिम यांनी मक्का येथे देवासाठी घर तयार केले. इब्राहिम यांनीच याठिकाणी तीर्थयात्रेची परंपरा सुरू केल्याचे मानले जाते. इस्लाममधील धार्मिक मान्यतेनुसार, अल्लाहने पैगंबर इब्राहीम यांना तीर्थस्थान तयार करून समर्पित करण्यास सांगितले होते. सध्या मक्का येथे असलेले काबा हे ते ठिकाण असल्याचे मानले जाते.

हळूहळू इथे वेगवेगळ्या देवांची पूजा विशेषतः मूर्तिपूजा सुरू झाली. इस्लामचे अखेरचे पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाल्यानंतर (इसवी सन ५७०) ही परंपरा मागे पडली. काबामध्ये अल्लाहची प्रार्थना व्हावी, असे पैगंबर मोहम्मद यांनी सांगितले. इसवी सन ६२८ मध्ये पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या अनुयायांबरोबर एक यात्रा सुरू केली. इसवी सन ६३२ मध्ये जेव्हा प्रेषित मोहम्मद यांचे देहावसान झाले, त्या वर्षी त्यांनी काबाची सर्वांत पहिली तीर्थयात्रा पूर्ण केली. याच यात्रेतील नियम मुस्लीम भाविकांकडून आजही पाळण्यात येतात.

हज यात्रेदरम्यान केल्या जाणार्‍या विधिंमध्ये अहराम बांधणे, काबा, सफा आणि मरवा, अराफत, सैतानाला दगड मारणे, कुर्बानी, मुंडन तवफ या मुख्य विधी आहेत. (छायाचित्र-पीटीआय)

२०१९ मध्ये, कोरोना महामारीमुळे जगभरातील धार्मिक स्थान नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. परंतु, लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीच २०१९ मध्ये २.५ दशलक्ष लोकांनी हजला भेट दिली. हज यात्रेसाठी जायचे असल्यास शरीरासाठी आवश्यक असलेल्या विविध गोष्टी पॅक करणे, ज्यांनी याआधी तीर्थयात्रा केली आहे त्यांच्याकडून काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे, व्याख्यानांना उपस्थित राहणे किंवा हज विधींची मालिका पाहणे आवश्यक असते. हज यात्रेला जाणार्‍यांनी स्वतःला शरीरिकदृष्ट्या तयार करणेही तितकेच महत्त्वाचे असते. कारण- अनेकदा यात्रेदरम्यान यात्रेकरूंना तीव्र उष्णता किंवा इतर आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो.

हज यात्रेदरम्यान मुस्लीम कोणते विधी करतात?

यात्रा सुरू झाल्यानंतर यात्रेकरू अहराम स्थितीत प्रवेश करतात. अहराममध्ये असताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, पुरुषांनी या कलावधीत एक विशिष्ट पोशाख परिधान करणे आवश्यक असते, ज्याला अहराम पोशाख म्हणून संबोधले जाते. हा पांढर्‍या रंगाचा कापड असतो. मुस्लीम महिलांना अहराम परिधान करण्याची सक्ती नाही. अराफातच्या मैदानावर उभे राहून यात्रेकरू अल्लाहचे स्मरण करतात, स्तुती करतात, क्षमा मागतात आणि विनवणी करतात. इतर विधींमध्ये तवफ ही विधीदेखील महत्त्वपूर्ण आहे. या विधीमध्ये यात्रेकरू मक्कामधील काबा वास्तूला घड्याळाच्या काट्यानुसार सात वेळा प्रदक्षिणा घालतात.

यात्रा सुरू झाल्यानंतर यात्रेकरू अहराम स्थितीत प्रवेश करतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

त्यानंतर इस्लामिक परंपरेनुसार प्रेषित इब्राहिम यांची पत्नी हागरने ज्या ठिकाणी तिचा मुलगा इस्लाईलसाठी पाण्याचा शोध घेतला, त्या दोन टेकड्यांवर यात्रेकरू चढतात. या दोन टेकड्यांचे नाव सफा आणि मरवा असे आहे. या पहाडांच्या मध्ये सात चकरा मारल्या जातात. ही कथा इस्लाम, ख्रिश्चन व ज्यू परंपरेमध्ये विविध प्रकारे सांगण्यात आलेली आहे. जमारात नामक विधित यात्रेकरू प्रतिकात्मक स्वरुपात सैतानाला दगड मारतात. सैतानाला मारल्यानंतर बकर्‍याची कुर्बानी दिली जाते. यात पुरुष आणि महिला आपले केसही अर्पण करतात.

हेही वाचा : न्यूझीलंडच्या नागरिकांचे ऑस्ट्रेलियात स्थलांतर; कारण काय?

ईद-उल-अजहा म्हणजे काय?

जगभरातील मुस्लिम नागरिक इब्राहिमच्या अल्लाहवरील विश्वासाचे प्रतीक म्हणून ईद-उल-अजहा हा सण साजरा करतात. जिल-हिजच्या १० तारखेला हा साण साजरा केला जातो. ईद-उल-अजहाला ईद – ए – कुर्बानी असेही म्हटले जाते. सणासुदीच्या काळात मुस्लीम मेंढ्या किंवा गुरे कापतात आणि त्यांचे मांस गरिबांना वाटतात. हज यात्रेदरम्यान केल्या जाणार्‍या विधिंमध्ये अहराम बांधणे, काबा, सफा आणि मरवा, अराफत, सैतानाला दगड मारणे, कुर्बानी, मुंडन तवफ या मुख्य विधी आहेत.