पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्यानंतर इस्रायलनेही हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीत शेकडो क्षेपणास्त्र डागले आहेत. सध्या हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाले असून आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलकडून गाझा शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. परिणामी येथे महिला, लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू होत आहे. जखमींवर उपाचार करण्यासाठी रुग्णालये कमी पडू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर गाझा परिसरात युद्धात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आईसक्रीच्या ट्रकमधून टाकून नेले जात असल्याचे काही फोटो समोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर गाझा, पॅलेस्टाईनमध्ये सध्या काय स्थिती आहे? हे जाणून घेऊ या…
रुग्णवाहिका पडतायत अपुऱ्या
गाझा पट्टीवर हमास या दहशतवादी संघटनेचे नियंत्रण आहे. या भागात इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. म्हणूनच येथे अनेक पॅलेस्टिनींचा रोज मृत्यू होत आहे. सामान्य नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण एवढे आहे की, मृतदेहांना अंत्यसंस्काराला नेण्यासाठी रुग्णवाहिकांची कमतरता भासत आहे. याच कारणामुळे मृतदेहांना आईसक्रीच्या ट्रकमधून नेले जात आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीदेखील कमी पडू लागली आहे.
…म्हणून आईसक्रीमच्या फ्रीझरमध्ये मृतदेह ठेवले जातायत
पॅलेस्टाईनमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल अल-बालाह येथील शुहादा अल-अक्सा रुग्णालयाचे डॉ. यासर अली यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “आमच्या रुग्णालयात फक्त १०० मृतदेह ठेवण्यासाठी जागा आहे. सध्या मृतांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आईसक्रीमच्या कारखान्यातून आम्ही आईसक्रीम फ्रीझर आणले आहेत. या फ्रीझरमध्ये मृतदेह ठेवले जात आहेत,” असे डॉ. यासर अली यांनी सांगितले. ज्या आईसक्रीम ट्रकमधून वेगवेगळ्या ठिकाणी आईसक्रीम पाठवले जायचे. आता त्याच ट्रकमधून पॅलेस्टिनींचे मृतदेह शवागृह आणि स्मशानभूमीपर्यंत नेले जात आहेत.
इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये २३०० लोकांचा मृत्यू
इस्रायली लष्कराने हमासवरील हल्ल्यासंदर्भात रविवारी प्रतिक्रिया दिली. आठ दिवसांपूर्वी हमासने हल्ला केल्यामुळे इस्रायलमध्ये १३०० लोकांचा मृत्यू झाला होता. याच हल्ल्याचा सूड म्हणून इस्रायल गाझा पट्टीमध्ये क्षेपणास्त्र डागत आहे. त्याआधी गाझा प्रदेशात असलेल्या नागरिकांना जीव वाचवण्यासाठी दक्षिणेकडे स्थलांतरित होण्यास आमची हरकत नाही, अशी भूमिका इस्रायली लष्कराने घेतली आहे. तर इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये आतापर्यंत २३०० लोकांचा मृत्यू झाल्याचे गाझाच्या प्रशासनाने सांगितले आहे. यामध्ये छोट्या मुलांचादेखील समावेश आहे. या हल्यांमध्ये साधारण १० हजार लोक जखमी झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांवर उपचार करण्यासाठी सध्या रुग्णालये अपुरी पडत आहेत. तसेच भविष्यातही जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे गाझातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे, असेही गाझातील प्रशासनाने सांगितले.
भविष्यात पॅलेस्टाईनमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हल्ला केल्यानंतर इस्रायल देशाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गाझातून हमास या संघटनेचा नायनाट करायचा निश्चय इस्रायलने केलेला आहे. मृतांची संख्या वाढू नये म्हणून पॅलेस्टिनींनी गाझा प्रदेश लवकरात लवकर सोडावा, असे आवाहन इस्रायलकडून करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीमुळे म्हणूनच भविष्यात पॅलेस्टाईनमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतदेहांना आईसक्रीमच्या ट्रकमध्ये टाकणाऱ्या अली या पॅलेस्टिनी नागरिकाने तेथील परिस्थितीबद्दल सांगितले आहे. “फ्रीझर तसेच रुग्णालयातील शवागृहे मृतदेहांनी भरले आहेत. सध्या जागा नसल्यामुळे टेन्टमध्येही २० ते ३० मतदेह ठेवलेले आहेत. सध्या गाझा पट्टी संकटात आहे. अशाच प्रकारे युद्ध सुरू राहिले तर तर मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करणेही अशक्य होईल. स्मशानभूमीमध्ये जागा नाहीये. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी आम्हाला नवी ठिकाणं शोधावी लागत आहेत,” असे अली यांनी सांगितले.
भविष्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्यामुळे गाझा शहरात मतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. सध्या गाझा प्रदेशाची परिस्थिती बिकट आहे. हे युद्ध सुरूच राहिले तर भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.