लोकसत्ता टीम
जवळपास १५ महिन्यांच्या घनघोर संघर्षानंतर इस्रायल आणि हमास या पॅलेस्टिनी संघटनेदरम्यान तात्पुरत्या युद्धविरामावर मतैक्य झाले आहे. १९ जानेवारीपासून ४२ दिवसांचा युद्धविराम असेल आणि यात प्रामुख्याने इस्रायली ओलिसांच्या सुटकेवर भर दिला जाईल. पण हा युद्धविराम म्हणजे युद्धबंदी नाही आणि ‘संपूर्ण विजया’चे उद्दिष्ट कायम असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. त्यामुळे किती काळ युद्धविराम राहील याविषयी संदिग्धता कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युद्धविरामाची घोषणा काय?

हमास, इस्रायल, कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींनी युद्धविरामाच्या वाटाघाटींमध्ये भाग घेतला होता. त्यांना यश आल्याचे १५ जानेवारी रोजी कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी जाहीर केले. अजून तांत्रिक बाबींची पूर्तता होत आहे. पण १९ जानेवारीपासून ४२ दिवसांच्या युद्धविरामास सुरुवात होईल, असे अल थानी यांनी स्पष्ट केले. यासंबंधी प्रस्तावास इस्रायलचा मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. काही बाबींवर अजूनही स्पष्टता नसल्याचे इस्रायलच्या प्रतिनिधींनी सांगितले.

आणखी वाचा-Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?

युद्धविरामातील तरतुदी कोणत्या?

इस्रायली फौजा गाझातील नागरी वस्त्यांतून निघून पूर्वेकडे इस्रायल-गाझा सीमेकडे सरकतील. त्यावेळी इस्रायली ओलिसांची हमासच्या ताब्यातून टप्प्याटप्प्याने सुटका केली जाईल. गाझातून विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनींना त्यांच्या घराकडे परतण्याची मुभा देण्यात येईल. त्यांना अत्यावश्यक वस्तूंचा – उदा. औषधे व अन्नपदार्थ – पुरवठाही केला जाईल. या काळात दररोज सुमारे ६०० ट्रक भरून मदतसामग्री गाझात येणे अपेक्षित आहे. यांतील ५० ट्रक इंधनाचे असतील. हमासच्या ताब्यातून ४२ दिवसांमध्ये ३३ इस्रायली ओलिसांची सुटका होणे अपेक्षित आहे. यात सर्व महिला, मुले आणि ५० वर्षांवरील पुरुषांचा समावेश असेल. हमासच्या ताब्यात सध्या १०० ओलीस असल्याचे समजते. पण यांतील जवळपास ३५ मृत्युमुखी पडल्याचा इस्रायलचा दावा आहे. इस्रायल त्यांच्या प्रत्येक ओलिसामागे ३० पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता करेल. पहिल्या टप्प्याअखेर सर्व पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची मुक्तता इस्रायलकडून होणे अपेक्षित आहे. या युद्धविरामाच्या अंमलबजावणीसाठी कतार, इजिप्त आणि अमेरिका यांच्याकडून हमी मिळेल. पहिल्या टप्प्याच्या १६व्या दिवशी दुसऱ्या टप्प्याबाबत वाटाघाटींना सुरुवात होईल.

युद्धविराम कसा घडून आला?

हमासच्या आधी इस्रायलने गेल्या नोव्हेंबरमध्ये हेझबोलाबरोबर युद्धविराम घडवून आणला. हेझबोलाने हमासला समर्थन देण्यासाठी इस्रायलवर रॉकेटवर्षाव केला होता. पण हमासशी लढत असताना इस्रायलने हेझबोलाविरुद्ध स्वतंत्र मोहीम उघडली. हसन नसरल्लासारखे त्या संघटनेचे म्होरके वेचून वेचून मारले. तिकडे इराणवरही दूर पल्ल्याचे हल्ले करून इस्रायलने वचक बसवला. दरम्यानच्या काळात सीरियात उठाव झाला. त्यामुळे इस्रायलला कोंडीत पकडू शकतील अशा ताकदीच या टापूत शिल्लक राहिल्या नाहीत. अशा परिस्थितीत हमासला युद्धविरामाशिवाय गत्यंतर नव्हते. इजिप्त आणि कतार या अरब देशांनी हमासच्या नेतृत्वावर दबाव आणला. तर दुसरीकडे, हमासच्या ताब्यातील उरलेसुरले इस्रायली ओलीस तरी सुखरूप मायदेशी परतावेत यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहूंवर दबाव वाढत होता. या दोन घटकांमुळे युद्धविरामाच्या वाटाघाटींना यश येत गेले.

आणखी वाचा-तालिबानचं भारताशी सख्य का वाढतंय?

युद्धविराम टिकेल का?

हमासचे नेते जे प्रमुख नेते वाटाघाटींमध्ये सहभागी आहेत ते गाझाबाहेरील आहेत. गाझामधील हमासचे नेतृत्व मोहम्मद शिनवारकडे आहे. हमासच्या ७ ऑक्टोबर हल्ल्याचा सूत्रधार याह्या शिनवार याचा हा धाकटा भाऊ. इस्रायली ओलीस त्याच्याच ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेचे श्रेय घ्यायचे असल्यामुळे आणि सर्व ओलिसांची सुटका झाल्यास आपल्या जिवालाही धोका निर्माण होईल अशी भीती वाटल्यामुळे मोहम्मद शिनवारकडून युद्धविरामाच्या अंमलबजावणीबाबत चालढकल होऊ शकते. तिकडे इस्रायली मंत्रिमंडळ आणि सरकारमध्येही काही कडवे उजवे पक्ष आहेत, ज्यांना हमासचा पूर्ण निःपात झाल्याशिवाय इस्रायलने शस्त्रेच खाली ठेवू नयेत असे वाटते. दोन्हीकजील कडव्यांच्या कात्रीत युद्धविरामाची प्रगती सापडण्याची शक्यता नाकारण्यासारखी नाही.

ट्रम्प यांच्यामुळे युद्धविराम?

अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचे श्रेय स्वतःकडे घेतले आहे. आपण सत्तेत आल्यानंतर सर्वच युद्धांचा शेवट घडवून आणणार असे ते प्रचारात सांगत होते. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांच्यापेक्षा इस्रायलच्या पंतप्रधानांना ट्रम्प यांच्याविषयी अधिक आत्मीयता आहे हे खरे. पण ट्रम्प यांनी युद्धविरामाचे श्रेय घेणे अयोग्य आहे. कारण गेल्या वर्षी मे महिन्यात बायडेन प्रशासनाने बनवलेल्या प्रस्तावालाच सुधारित स्वरूपात सादर करून नवीन प्रस्ताव बनवण्यात आला. शिवाय इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात करार घडवून आणण्याचाही त्यांचा प्रयत्न होता.

आणखी वाचा-नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन… इस्कॉनचा इतिहास काय? ही संस्था कशी चालविली जाते?

इस्रायल-सौदी अरेबिया करार?

इस्रायल आणि सौदी अरेबिया हे दोन्ही इराणचे कट्टर शत्रू आहेत. या दोन्ही देशांदरम्यान अधिकृत राजनैतिक संबंध मात्र नाहीत. अरब-इस्रायली युद्धकाळातील कडवटपणा कमी झाला असला, तरी पॅलेस्टिनींच्या गळचेपीच्या मुद्द्यावर आजही सौदी शासक इस्रायलवर टीका करत असतात. पण सौदीबरोबर कराराविषयी नेतान्याहू अनुकूल आहेत. भविष्यात यानिमित्त पॅलेस्टिनींना त्यांच्या हक्काचे राष्ट्र मिळत असेल तर इस्रायलबरोबर असा करार करण्याची सौदी अरेबियाचीही तयारी आहे. याविषयी वाटाघाटींना बायडेन प्रशासनाच्या काळात सुरुवात झाली. पण त्यांची यशस्वी परिणती ट्रम्प अमदानीत होऊ शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamas israel armistice in gaza after 15 months of intense war print exp mrj