Hantavirus Pulmonary Syndrome : अमेरिकेतील ज्येष्ठ अभिनेते, ऑस्कर विजेते जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी अराकावा यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूमुळे हॉलीवूड इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. या जोडप्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर यासंदर्भात मोठा खुलासा झाला असून दोघांच्याही मृत्यूची कारणं समोर आली आहेत. जीन हॅकमनचा मृत्यू हृदयरोगानं तर त्याच्या पत्नीचा मृत्यू हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोममुळे झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान, हा आजार नेमका आहे तरी काय? तो नेमका कशामुळे पसरतो? याबाबत जाणून घेऊ.
न्यू मेक्सिकोमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीन हॅकमन यांच्या पत्नीला हंता व्हायरसची लागण झाली होती. या आजारामुळे बेट्सी अराकावा आणि त्यांच्या पाळीव श्वानाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास आठवडाभराने जीन हॅकमन यांचाही हृदयरोगाने मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांनुसार, ९५ वर्षीय जीन हॅकमन यांच्या मृत्यूचं कारण केवळ हृदयरोग नव्हतं, तर अल्झायमरदेखील होतं. म्हणूनच कदाचित त्यांना पत्नी बेट्सी आणि पाळीव श्वानाच्या मृत्यूची माहिती नव्हती. मरण्यापूर्वी हॅकमन हे त्यांच्या पत्नीच्या मृतदेहाबरोबर एक आठवडा जगले.
आणखी वाचा : Haircut in Space : अंतराळात कसे कापतात केस? सुनीता विल्यम्सच्या केसांची का होतेय चर्चा?
हंता व्हायरस म्हणजे काय, त्याची लागण कशी होते?
हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम (HPS) हा एक दुर्मीळ आजार मानला जातो. या आजाराचे संक्रमण उंदरांमुळे होते. हंता व्हायरस हा उंदरांच्या संपर्कातून किंवा त्यांच्या मूत्र, विष्ठा किंवा लाळेद्वारे मानवांना संक्रमित करू शकतो. हृदय, फुफ्फुस आणि शरीरातील इतर अवयवांना नुकसान पोहोचवणारा हा विषाणू एका माणसापासून दुसऱ्या माणसात पसरत नाही. सिएटलमधील निवृत्त सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. जेफ डचिन यांनी एनबीसी न्यूजला सांगितले, “हंता व्हायरस एक महाभयंकर आजार आहे, तो प्राणघातक नसला तरीही नेहमीच गंभीर मानला जातो. हंता व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूदराचे प्रमाण अजूनही ४० टक्क्यांपर्यंत आहे. हा चिंतेचा विषय असून त्यावर लवकरात लवकर उपचार होणे आवश्यक आहे.”
हंता व्हायरस कोणकोणत्या उंदरांमध्ये आढळतो?
अमेरिकन रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) माहितीनुसार, हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोममुळे मानवी फुफ्फुसांना गंभीर संसर्ग होऊ शकतो, जे कधीकधी प्राणघातक ठरू शकते. अभिनेते जीन हॅकमन आणि त्यांच्या पत्नी बेट्सी अराकावा हे न्यू मॅक्सिको शहरात राहत होते, जिथे उंदरांचे प्रमाण जास्त असून हंता व्हायरसचे अनेक रुग्ण आढळून आले आहे. हा व्हायरस उंदरांच्या विविध प्रजातींमध्ये आढळून येतो.
हंता व्हायरसची लक्षणे काय आहेत?
हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम उंदरांपासून वेगाने पसरणारा आजार असला तरी त्याची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. डॅलसमधील यूटी साउथवेस्टर्न मेडिकल सेंटरच्या डॉ. सोन्जा बार्टोलोम यांनी द गार्डियनला सांगितले की, हंता व्हायरस हा तीन वेगवेगळ्या टप्प्यात मानवाला संक्रमित करू शकतो. पहिल्या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला एक ते दोन आठवड्यानंतर एखादा फ्लूसारखा आजार झाल्याचं वाटू लागतं. संसर्गानंतर हा विषाणू मानवी शरीरात तब्बल आठ आठवड्यापर्यंत राहू शकतो. विशेष म्हणजे, हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोमची कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नाही, त्यामुळे ताप आला किंवा अंगात कणकण जाणवू लागल्यानंतर संबंधित व्यक्तीला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, दुसऱ्या टप्प्यातील लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, थकवा, पोटदुखी, पुरळ, मळमळ आणि उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, तसेच स्नायू दुखणे अशा समस्या जाणवू लागतात. विशेषत: विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या मांड्या दुखतात किंवा कंबर आणि पाठीभोवती कळा निघू लागतात. ही सुरुवातीची लक्षणे दिसू लागल्यानंतर सुमारे चार ते १० दिवसांनी तिसरा आणि सर्वात गंभीर टप्पा सुरू होतो. यामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव, फुफ्फुसांमध्ये आणि आजूबाजूला द्रव साठणे, श्वास लागणे, जलद हृदयाचे ठोके आणि छातीत घट्टपणा यांचा समावेश आहे. ही लक्षणं जीवघेणी असू शकतात, त्यामुळे त्वरित वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.
हंता व्हायरसमुळे मृत्यूचा धोका किती?
एखाद्या व्यक्तीने उपचारास टाळाटाळ केल्यास त्याचा २४ ते ४८ तासांत मृत्यू होऊ शकतो, असे न्यू मेक्सिको ऑफिस ऑफ द मेडिकल इन्व्हेस्टिगेटरचे मुख्य वैद्यकीय अन्वेषक डॉ. हीथर जॅरेल यांनी शुक्रवारी सीएनएन न्यूजला सांगितले. निवृत्त सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. जेफ डचिन यांनी एनबीसी न्यूजला सांगितले की, साधारणत: हंता व्हायरसची लक्षणे करोना आणि इन्फ्लूएंझा या आजारांसारखी आहेत, ज्यामुळे संबंधित व्यक्तीला त्याची लागण झाली आहे की नाही हे सांगणं डॉक्टरांनाही कठीण जातं. श्वसनाचा त्रास असलेल्या सुमारे एक तृतीयांश लोकांसाठी हा विषाणू खूपच घातक ठरू शकतो. शेवटच्या टप्प्यात या आजारामुळे रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे इतर गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका वाढतो, असंही ते म्हणाले.
हंता व्हायरसवर उपचार करता येतात का?
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सध्या हंता व्हायरसवर मात करणारी कोणतीही लस किंवा औषधं उपलब्ध नाहीत. मात्र, या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यास संबंधित व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, हंता व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन थेरपी, रक्तदाब स्थिर करण्यासाठी औषधे, रिबाविरिनसारखी अँटीव्हायरल औषधे आणि इतर उपचारांची आवश्यकता असते. वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण या आजारातून काही आठवड्यातच बरा होऊ शकतो.
हेही वाचा : व्हीलचेअरबाबत विमान कंपन्यांचे नियम काय आहेत? वृद्ध महिला कशामुळे पडली? एअर इंडियाचा दावा काय?
अमेरिकेत हंता व्हायरसमुळे किती मृत्यू?
१९९३ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेतील फोर कॉर्नर्स प्रदेशातील – अॅरिझोना, कोलोरॅडो, न्यू मेक्सिको आणि युटा येथे हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोमची रुग्ण आढळून आली होती. हळूहळू रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली आणि २०२२ पर्यंत अमेरिकेत ८६४ प्रकरणे नोंदवण्यात आली, ज्यामध्ये न्यू मॅक्सिकोमध्ये १२२ आणि कोलोरॅडोमध्ये ११९ रुग्णांचा समावेश आहे. वेळेवर उपचार न घेतल्याने यातील जवळपास ५२ लोकांचा मृत्यू झाला. न्यू मेक्सिको आरोग्य विभागाचा हवाला देत एपीने वृत्त दिले की, २०२३ आणि २०२४ मध्ये अमेरिकेत हंता व्हायरसचे सात रुग्ण आढळून आले. यावर्षी न्यू मॅक्सिकोमध्ये अभिनेते जीन हॅकमन यांच्या पत्नी बेट्सी यांना हंता व्हायरसची लागण झालेल्या त्या पहिल्या रुग्ण होत्या.
हंता व्हायरसपासून सुरक्षित कसे राहायचे?
न्यू मेक्सिको आरोग्य विभागातील पशुवैद्य एरिन फिप्स म्हणाले, “हंता व्हायरसपासून सावध राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे उंदरांपासून दूर राहा. त्यांच्या विष्ठा असलेले घरातील कोपरे साफ करताना हातमोजे घाला आणि तोंडाला रुमाल बांधा. घरात उंदराने बीळ केले असेल तर ते त्वरित बुजवून टाका. साफसफाई करत असताना जंतुनाशकाचा वापर करा. हंता व्हायरसची लागण एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. वेळेवर उपचार घेतल्यास या आजारावर मात करता येते. मात्र, त्यासाठी काळजी घेणे आणि सावध राहणे गरजेचे आहे.”