Hanuman Garhi अयोध्येत एक ऐतिहासिक घटना घडणार आहे. अयोध्येच्या हनुमान गढी मंदिराचे मुख्य पुजारी एक छोटी यात्रा करणार आहेत. त्यांच्या १.६ किलोमीटरच्या या यात्रेची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे. याचे कारण म्हणजे या यात्रेसाठी त्यांच्याकडून शतकानुशतके जुनी परंपरा मोडण्यात येणार आहे. नेमके हे प्रकरण काय? जुनी परंपरा मोडण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊयात.
प्रकरण काय?
हनुमान गढीच्या नियमांमध्ये असे नमूद आहे की, ‘गद्दी नशीन’ म्हणजेच मंदिरातील मुख्य पुजारी गढीच्या परिसरातून बाहेर पडू नये असे म्हटले जाते. मात्र, तरीही ‘गद्दी नशीन महंत प्रेम दास राम मंदिराला भेट देणार आहेत. आतापर्यंत हा नियम काटेकोरपणे पाळला गेला आहे. केवळ एकदाच रुग्णालयात दाखल होण्यासाठी म्हणून गद्दी नशीन मंदिराबाहेर पडले होते. परंतु, त्यांना मंदिराबाहेर जाण्याची परवानगी का नाही आणि हा नियम महंत प्रेम दास यांच्याकडून का मोडण्यात येत आहे, हा प्रश्न अनेकांच्या समोर आहे.

हनुमान गढी आणि तेथील नियम
१० व्या शतकात हनुमान गढी बांधली गेली असे मानले जाते. अशीही मान्यता आहे की, श्री रामजन्मभूमीचे दर्शन हनुमान गढीला भेट दिल्यानंतरच पूर्ण होते. हनुमान गढीच्या घटनेमध्ये असे म्हटले आहे की, मुख्य पुजारी केवळ मंदिराच्या ताब्यातील जमिनीवर राहू शकतात, ही जमीन ५२ बिघा म्हणजेच ०.१३ चौरस किलोमीटरमध्ये व्यापलेली आहे. अयोध्येतील अशी मान्यता आहे की, जेव्हा भगवान राम पृथ्वीवरून निघून गेले तेव्हा त्यांनी त्यांचे राज्य हनुमानाला स्वाधीन केले आणि त्यांनी याच हनुमान गढीवरून रामाच्या जन्मस्थळाची देखरेख केली. त्यामुळेच अयोध्येतील लोक अनेकदा हनुमानाला त्यांचा राजा आणि मंदिराचा ‘गद्दी नशीन’ म्हणूनदेखील संबोधतात. ‘गद्दी नशीन’ म्हणजेच त्यांचे प्रतिनिधी, जे पद सोडू शकत नाही.
“हनुमान गढीचे संविधान (घटना) बाबा अभय दासजी महाराजांच्या काळापासून म्हणजेच २०० वर्षांहून अधिक जुने आहेत. जेव्हा तीन मुख्य साधू आखाडे तयार झाले, तेव्हा हनुमान गढी निर्वाणी आखाड्याचे मुख्य केंद्र ठरले,” असे हनुमंत संस्कृत विद्यालयाचे प्राचार्य आणि महंत प्रेम दास यांचे प्राथमिक शिष्य डॉ. महेश दास यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे नमूद केले की, नियमांनुसार मंदिरातील हनुमान मूर्तीसमोर ज्याची जागा आहे ते ‘गद्दी नशीन’ ५२ बिघा परिसराबाहेर जाऊ शकत नाही; कारण ते हनुमानाचे प्रतिनिधी आणि सेवकदेखील आहेत.
त्यांनी म्हटले की, हनुमानाला कोणत्याही मोठ्या धार्मिक कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा ते स्वतः किंवा गद्दी नशीन जात नाही, तर त्या जागी योग्य विधींनुसार त्यांचे प्रतीक किंवा चिन्नाह म्हणजेच चांदी आणि सोनेरी धाग्यांनी कोरलेला हनुमानाचा फोटो जातो. अवधच्या नवाबाने १८ व्या शतकात हनुमान गढीसाठी जमीन दिली होती असे मानले जाते. जेव्हा मंदिराच्या पुजाऱ्याने त्याच्या आजारी मुलाला बरे केले होते, त्याबदल्यात ही जमीन देण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिर एका किल्ल्याच्या आकारात आहे. मंदिराव्यतिरिक्त त्याच्या आजूबाजूला शेकडो दुकाने, घरे, श्रीराम रुग्णालय आणि हनुमंत संस्कृत महाविद्यालय आहे.
परंपरा मोडण्याचे कारण काय?
हनुमान गढी येथील शिष्यांनी असे सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून महंत प्रेम दास यांच्या स्वप्नात भगवान हनुमान त्यांना दर्शन देत आहेत आणि त्यांना राम मंदिरात जाण्याची आज्ञा देत आहेत. मंदिरातील एका पुजाऱ्याने सांगितले, “महंतांनी मंदिरात जाण्याची विनंती केल्यानंतर २१ एप्रिल रोजी सुमारे ४०० सदस्य असलेल्या निर्वाणी आखाडा पंचायतीची बैठक बोलावण्यात आली. पंचांनी अनेक तास चर्चा केल्यानंतर भगवान हनुमानाची आज्ञा असल्याने भेटीची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.”
तांत्रिक अडचणी काय?
हनुमान गढीच्या पुजार्यांनी सांगितले की, नियमानुसार जर ‘गद्दी नशीन’ बाहेर पडतील तर या मिरवणुकीत हनुमान चिन्नाहबरोबर रथावर हत्ती, घोडे, उंट, चांदीच्या काठ्या आणि हजारो अनुयायी असावे. पंचायतीने ३० एप्रिल रोजी येणाऱ्या अक्षय्य तृतीयेला या ऐतिहासिक यात्रेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायतीने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार महंत प्रेम दास हनुमान गढीच्या मागील दरवाज्यातून म्हणजेच व्हीआयपी गेटमधून त्यांच्या शाही मिरवणुकीसाठी रथात बसतील. परंतु, या रथाने त्यांना मंदिरापर्यंत जाणे शक्य नाही, कारण राम मंदिराचेदेखील स्वतःचे काही सुरक्षा नियम आहेत; त्यामुळे त्यांना त्यांचा रथ काही अंतरावर सोडून गेट क्रमांक ३ पासून चारचाकी गाडीने मंदिरापर्यंत जावे लागेल. महंत प्रेम दास भगवान श्री रामासाठी ५६ प्रकारचे भोग आणि इतर नैवेद्य घेऊन जातील, अशी माहिती आहे.
या यात्रेला राजकीय महत्त्व कसे?
राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक वाद रंगले. परंतु, या वादांपासून हनुमान गढी वेगळी राहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काही इतर नेत्यांनी राज्यातील राजकीय दौऱ्यांवर असताना रामजन्मभूमी स्थळाला भेट देणे टाळले आणि हनुमान गढीला जाणे निवडले, त्यामुळे महंत प्रेम दास यांची यात्रा राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय असून त्याकडे बारकाईने लक्ष ठेवले जाईल.