God Hanuman Marriage Story : भारताला लाखो वर्षांचा इतिहास आहे. भारताचा इतर देशांशी व्यापाराच्या निमित्ताने आलेला संबंध आदिम काळापासून आहे. या व्यापारी संबंधातून अनेक वेळा सांस्कृतिक देवाणघेवाण झाली होती. म्हणूनच अनेक आशियाई देशांमध्ये रामायण, महाभारतासारख्या भारतीय महाकाव्यांचा लीलया झालेला स्वीकार हा अद्भुत मानला जातो. या देशांनी भारतीय महाकाव्यांचा स्वीकार केला, तरी या कथा-काव्य पूर्णतः आहेत तशा स्वरूपात स्वीकारल्या नाहीत. आपल्या स्थानिक परंपरांचा समावेश या देशांनी भारतीय महाकाव्यांमध्ये करून त्यांना आपलेसे केले. यामध्ये आग्नेय आशियाई देश अग्रेसर होते. केवळ कथा-काव्यच नाही तर त्या निमित्ताने त्यांचा आलेला भारतीय देवतासमूहाशी संबंध व या संबंधातून नव्याने जन्मास आलेला सांस्कृतिक अनुबंध हा अधोरेखित करण्यासारखा आहे. म्हणूनच हनुमान जयंतीच्या निमित्ताने कंबोडिया येथील हनुमानकथेविषयी या लेखात जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : विश्लेषण : रामानं नाही, लक्ष्मणानं केला रावणाचा वध – जैन रामायण

कंबोडियातील रेमकर रामायण आहे तरी काय?

कंबोडिया हा एक आग्नेय आशियाई देश आहे. भारतीय वाल्मीकी रामायण कथेचा मूलाधार घेऊन कंबोडियात रेमकर (रामकथा) या नावाने रामायण लिहिले गेले. या रामयणाचा मूळ कथासंबंध हा वाल्मीकी रामायणाशी असला तरी, कंबोडियातील या रामायणावर बौद्ध कथांचा प्रभाव आहे. इसवी सनपूर्व काळापासून भारत व कंबोडिया यांच्यात व्यापाराच्या निमित्ताने संबंध आले आहेत. मौर्य काळात या भागात बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे या देशात आजही जवळपास ९७ टक्के लोक हे बौद्धधर्मीय आहेत. रेमकर हे भारतीयांप्रमाणे कंबोडियातील संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या कला, संस्कृती माध्यमातून विविध प्रकारे जनमानसावर असलेला राम-हनुमानकथांचा प्रभाव दृश्य स्वरूपात प्रकट होतो.

हनुमान व मत्स्यकन्येची भेट

रोबम सोवन माचा हा कंबोडियातील एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे. या नृत्यप्रकारातून कंबोडिया येथील राम-हनुमानकथांच्या प्रभावाची प्रचीती येते. रोबम हनुमान व सोवन माचा यांच्यातील प्रथम भेट व त्यांच्यात घडून आलेला संवाद हा या नृत्याद्वारे दर्शविला जातो. हनुमान व सोवन माचा म्हणजेच सुवर्ण मत्स्यकन्या किंवा जलपरी (मरमेड) यांची भेट रामसेतू बांधत असताना झाली होती. हा प्रसंग कंबोडियात विशेष प्रसिद्ध आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रसंग मूळ वाल्मीकी रामायणात येत नाही.

आणखी वाचा : विश्लेषण: अंकुशपुराण : अस्सल महाराष्ट्रीय रामायण आहे तरी काय?

अंगकोर व हनुमान

रोबम हा कंबोडियातील एक प्राचीन नृत्यप्रकार आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकापासून हा नृत्यप्रकार या देशात अस्तित्वात असल्याचे अभ्यासक मानतात. किंबहुना भारतीय रामकथा ही त्याच काळात या देशात अधिक प्रसिद्ध पावली असे मानले जाते. इसवी सनाचे सातवे शतक हे कंबोडियाच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व मानले जाते. या काळात या भागात अंगकोर हे हिंदू साम्राज्य होते व याच काळात हनुमानाच्या कथेसह हा नृत्यप्रकार मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला. प्राथमिक काळात हे नृत्य अंत्यविधीच्या वेळेस केले जात असे. कालांतराने अंगकोर या साम्राज्याच्या काळात हा नृत्यप्रकार मंदिरातील विधींचा भाग बनला. या नृत्यप्रकारात समाविष्ट करण्यात आलेली कथा ही रेमकर या रामकथेतून घेण्यात आली आहे.

सातव्या शतकातील वेल काँटेल

वेल काँटेल (स्टुएंग ट्रेंग) येथील दगडी शिलालेखानुसार रेमकर महाकाव्याचा कंबोडियातील सर्वात जुना उल्लेख सातव्या शतकातील आहे. या शिलालेखात रेमकर महाकाव्याचे हस्तलिखित एका मंदिराला दान केल्याचा उल्लेख आहे. अंगकोर वाट येथील मंदिराच्या भिंतींवर असलेले रामायणातील दृश्य या महाकाव्याची कंबोडियातील प्राचीनता विशद करण्यास पुरेसे आहे.

आणखी वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

रोबम या नृत्यप्रकारात सादर करण्यात येणाऱ्या प्रसंगात रेम (राम) हनुमानाला लंकेपर्यंत समुद्रात एक सेतू बांधण्याची आज्ञा देतात. प्रभू रामचंद्रांची आज्ञा शिरसावंद्य मानून वानरसेना समुद्रात खडक टाकून सेतू बांधण्यास सुरुवात करते, परंतु काही काळाने खडक लुप्त होण्यास सुरुवात होते. असे का घडत आहे याचा शोध घेण्यास खुद्द हनुमान सुरुवात करतो. खडक लुप्त होण्याचे कारण न समजल्यामुळे हनुमान कारण शोधण्यासाठी समुद्रात उडी घेतो. त्या वेळी सोनेरी जलपरी सोवन माचा या व्यत्ययाला जबाबदार असल्याचे लक्षात येते. सोवन माचा ही माशांच्या झुंडीचे नेतृत्व करणारी सोन्याची जलपरी होती. खुद्द रावणाने तिला रामसेतूच्या कार्यात अडथळा निर्माण करण्यासाठी नेमले होते. किंबहुना कंबोडियातील कथेनुसार ती रावणाची कन्या होती. हनुमानास सेतूबांधकामातील व्यत्ययाचे कारण समजताच सोवन माचा व हनुमान यांच्यात युद्ध सुरू होते. एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करत असताना, ते दोघे या कथेनुसार एकमेकांच्या प्रेमात पडतात व विवाह करतात. इतकेच नाही तर या विवाहतून त्यांना पुत्रप्राप्ती होते. माचानब हे त्या पुत्राचे नाव होते. हा पुत्र माशाची शेपटी असलेला वानर होता. सोवन माचा हिला हनुमानाच्या सीतेला सोडविण्याच्या प्रयत्नाविषयी समजताच ती त्याच्या मार्गातून बाजूला होते. ही कथा कंबोडिया येथील रामकथेत येत असली तरी भारतात रचलेल्या अनेक स्थानिक रामायणांमध्येही हनुमानाचा विवाह झाल्याचे संदर्भ आहेत.

हनुमान व रामकथांचे ऐतिहासिक महत्त्व

भारतातील हनुमानाचा विवाह झाल्याचे उल्लेख असणाऱ्या रामकथांची रचना ही बहुतांश पश्चिम व दक्षिण भारतात केली गेली होती. विशेष म्हणजे काही कथा हनुमानास १०० पत्नी असल्याचा संदर्भ देतात. या खेरीज पश्चिम व दक्षिण भारताचे इसवी सनपूर्व काळापासून आग्नेय आशियाशी समुद्रमार्गे व्यापारी संबंध होते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळेच या कथांच्या माध्यमातून दिसणारा हा सांस्कृतिक संबंध भारताच्या ऐतिहासिक समृद्धीचीच ख्याती अधिक स्पष्ट करतो. म्हणून या संबंधास व या कथांना अनन्यसाधारण असे ऐतिहासिक महत्त्व आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hanumans cambodian marriage story that tells the prosperity of india svs