Harappan Civilization ‘Sindhu-Sarasvati’ in new textbooks: मिशेल डॅनिनो हे आयआयटी गांधीनगर येथे सोशल सायन्सेस विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम संकल्पनेवर आधारित नवीन सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकांचा मसुदा तयार करण्यासाठी NCERT च्या समितीचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी अलीकडेच इयत्ता सहावीच्या ‘एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियाँड’ या शीर्षकाच्या पाठ्यपुस्तकाच्या प्रकाशनाचे नेतृत्त्व केले. या पाठ्यपुस्तकाच्या प्रकाशनाला उशीर झाला. या पाठ्यपुस्तकाचा मसुदा तयार करण्यासाठी समितीकडे पाचच महिने होते. या वर्षी प्रकाशित झालेलं पाठ्यपुस्तक हे चांगलं पाऊल असल्याचा उल्लेख त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’कडे केला. पुढील वर्षी अधिक सविस्तर धड्यांचा या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात येईल, असे सांगतानाच डॅनिनो यांनी पाठ्यपुस्तकात हडप्पा संस्कृतीसाठी ‘सिंधू-सरस्वती’ आणि ‘इंडस-सरस्वती’ सारख्या पर्यायी संज्ञांचा वापर का केला याचे स्पष्टीकरण दिले आहे. या संज्ञा प्रस्थापित पुरातत्त्व संशोधनावर आधारित आहेत आणि कोणत्याही राजकीय अजेंड्याने प्रभावित नाहीत, यावर त्यांनी भर दिला. ‘ही हिंदुत्वाची गोष्ट नाही,’ असे त्यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या विशेष प्रतिनिधी रितिका चोप्रा यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

सविस्तर मुलाखत:

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल

प्र. १- राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २०२३ नुसार समाजशास्त्राची क्रमिक पुस्तके तयार करण्याचे आव्हान नवीन क्रमिक पुस्तके तयार करताना होते का?

होय, आम्ही चिंतित होतो कारण अशा नवीन प्रयत्नांना अधिक वेळ लागतो. नॅशनल सिलॅबस अँड टीचिंग अँड लर्निंग मटेरियल कमिटी (NSTC), ज्याचा मी एक भाग आहे, त्या कमिटीची नियुक्ती उशिरा करण्यात आली (एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने जुलै २०२३ साली NSTC ची नियुक्ती केली होती). त्यामुळे आमच्या कामाला उशिरा सुरुवात झाली आणि आमचे पहिले काम पाठ्यपुस्तक नव्हे तर अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करणे हेच होते. बऱ्याच सभासदांनी सुरुवातीला कसे शिकवायचे यापेक्षा काय शिकवायचे यावर लक्ष केंद्रित केले होते. त्याचा पुनर्विचार करा, असे मी त्यांना सुचवले. वेळेचे बंधन असूनही, आम्ही संतुलित अभ्यासक्रमाचे ध्येय ठेवले. त्यात आम्ही प्रगतीपथावर आहोत, त्यात पूर्ण यशस्वी झालोय, असे मला वाटत नाही.

प्र.२ तुम्हाला असे का वाटते की, तुम्ही पूर्णपणे यशस्वी झाला नाहीत!

कारण हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. तो परिपूर्ण नाही, परंतु यात काहीतरी चांगलंही निश्चितच आहे. खरा अभिप्राय मिळावा यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे योग्य सर्वेक्षण करण्याची आमची योजना आहे. पण सुरुवातीचा अभिप्राय उत्साहवर्धक आहे.

अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

प्र.३ अशा प्रकारच्या नवीन प्रयोगासाठी साधारण किती वेळ लागतो?

आम्ही एक वर्षाचा कालावधी घेतला होता. परंतु प्रत्यक्षात, नवीन पाठ्यपुस्तकांचा केवळ मसुदा तयार करण्यासाठी फक्त पाच महिने हातात होते. आम्ही जानेवारी महिन्याच्या मध्यात (या वर्षी) सुरुवात केली कारण त्याआधी आम्ही इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांसाठी अभ्यासक्रम तयार करत होतो. विद्यमान अभ्यासक्रमात सुधारणा न करता कमीत कमी वेळेत आम्ही नवीन अभ्यासक्रम तयार करत असल्याने ही प्रक्रिया आव्हानात्मक होती. आम्ही जूनच्या अखेरीस पहिला मसुदा पूर्ण केला, परंतु जुलै महिना उजाडला तरी फीडबॅक गोळा करण तसेच सुधारणा करणं सुरूच होत, त्यानंतर अंतिम मसुदा सादर करण्यात आला.

प्र.३ उशीर लक्षात घेता, नवीन पाठ्यपुस्तके या वर्षीच्या मध्य सत्रात प्रकाशित करण्याऐवजी पुढल्या वर्षीच्या सत्रात प्रकाशित होऊ शकली असती का?

आम्हाला वाटलं हे तीन महिन्यात पूर्ण होईल; परंतु आम्ही भोळसट विचार केला होतो (आणि ते हसले), आम्ही पाठ्यपुस्तक निर्मितीच्या क्लिष्टतेकडे दुर्लक्ष केले. होय, विलंब झाला होता, परंतु जुन्या अभ्यासक्रमात आणखी एक वर्ष वाया घालवण्यापेक्षा या वर्षीच कृती करणे चांगले आहे, असे आम्हाला वाटले. आणखी वाट पाहात बसलो असतो तर NEP (जुलै २०२० साली प्रसिद्ध झालेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण) आणि त्याची अंमलबजावणी यामध्ये खूप अंतर निर्माण होईल, त्यामुळे विश्वास गमावण्याचा धोका आहे, हे लक्षात आलं. सध्या उचललेले पाऊल चांगले आहे. आणि आम्ही दरवर्षी त्यात सुधारणा आणि विस्तार करत राहू.

प्र.४- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २०२३ नावीन्यपूर्णतेसाठी ओळखला जातो. त्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तुम्ही कोणता नवीन दृष्टिकोन किंवा नवकल्पना लागू केली आहे?

घोकंपट्टी शिक्षण प्रणालीला परावृत्त करण्याच्या NEP च्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आम्ही पाठ्यपुस्तकात भरमसाट विदा देणं टाळण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही मजकूर कमी केला आणि अध्यापनशास्त्रीय साधने म्हणून ग्राफिक्सचा वापर केला आहे. आम्ही सेमी कॅज्युअल स्टाईल स्वीकारली आहे, जी थेट विद्यार्थ्यांना संबोधित करते. भाषा सोपी ठेवण्यात आली आहे. कठीण शब्दांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे इंग्रजीसह विद्यार्थ्यांना भाषा सहज समजेल याची काळजी घेण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आम्ही विद्यार्थ्यांना चिंतन करण्यास, गंभीर विषयांवर प्रश्न विचारण्यास प्रोत्साहीत करतो. निश्चित उत्तरे देण्याऐवजी, आम्ही अनिश्चितता अधोरेखित करतो. विशेषत: इतिहास आणि पुरातत्त्व यांसारख्या विषयांमध्ये स्त्रोत अनेकदा अपूर्ण असतात. या दृष्टिकोनाचा उद्देश विद्यार्थ्यांची विचारशक्ती जागृत करणे हा आहे, परंतु ही क्षमता पूर्णपणे साकार करण्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. या प्रयत्नांना आणखी पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिक्षकांसाठीच्या हॅण्डबुकवर देखील काम करत आहोत.

अधिक वाचा: प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का?

प्र.५ परंतु एनएफसी, २००५ अंतर्गत जुनी पाठ्यपुस्तके देखील समान उद्देशाने लिहिली गेली होती…

त्यातील काही पाठ्यपुस्तके वाईट नव्हती आणि आम्ही त्यांचीही मदत घेतली आहे, परंतु आम्ही त्यांना कॉपी केलेलं नाही. त्यात तेव्हा काय शिकवायचे या जुन्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होते, त्यात केवळ माहितीची खोगीरभरतीच झाल्याने २००५ च्या आराखड्याची उद्दिष्टे पूर्ण होत नव्हती.

प्र.६ तुम्ही काही चांगल्या पुस्तकांची नावं सांगाल का?

मी हे करू इच्छित नाही, कारण त्यातील काहींवर सध्या सार्वजनिकरित्या वाद सुरू आहे. पण एकंदरीत ती यशस्वी झाली नाहीत.

प्र.७ तुम्ही असं का म्हणताय?

त्यांचे हेतू आणि शैली वेगळी होते. त्यांचा दृष्टिकोन वरून खाली जाणारा होता तर आमचा पाया पक्का करून नंतर वरच्या दिशेने जाणारा आहे. हा अधिक विद्यार्थीकेंद्री आहे.

प्र.८ हे सर्व करता असताना शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे; आपण हे चुकीच्या क्रमाने हाताळत आहोत का? कारण नवीन पाठ्यपुस्तकांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक आवश्यक आहेतच.

खेदजनक असले तरी मी तुमच्याशी सहमत आहे; लाखो शिक्षक आहेत, आव्हान संख्येचे आहे. शासकीय यंत्रणेलाही परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे. शिक्षण ही राष्ट्राची बाब आहे आणि राजकारणामुळे सहकार्य गुंतागुंतीचे होऊ शकते. जरी पायाभरणी करण्यात आलेली असली तरी, संपूर्ण परिवर्तनाला किमान पाच वर्षे लागू शकतात. नवीन पाठ्यपुस्तके सादर करण्यापूर्वी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी आम्ही इतका वेळ थांबू शकत नाही; हे एक परिवर्तन आहे ज्यात काहीप्रमाणात तडजोडी स्वीकाराव्या लागणार आहेत.

प्र.९ मी इयत्ता सहावीचे समाजशास्त्र या विषयाचे पुस्तक पहिले; जुन्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थी राजवंशाचा अभ्यास करत होते ज्याचा नवीन अभ्यासक्रमात समावेश नाही…

आशय अधिक हलकाफुलका ठेवण्यासाठी या वर्षी प्रारंभिक राजवंशांवरील धडा वगळण्यात आला आहे, परंतु तो इयत्ता सहावीच्या पुढील आवृत्तीसाठी नियोजित आहे. धडा जवळजवळ पूर्ण झाला होता, परंतु आम्ही एका विशिष्ट टप्प्यावर थांबण्याचा निर्णय घेतला. तर, तुमचा मुद्दा वैध आहे. परंतु या टप्प्यावरच्या मुलांवर फारसा फरक पडत नाही, कारण ते साम्राज्यासारख्या संकल्पना समजून घेत नाहीत. आम्ही त्याऐवजी वेळ, कालगणना आणि तारखा यांसारख्या मूलभूत संकल्पना मांडण्यावर लक्ष केंद्रित केले, ज्या समजून घेण्यासाठी अनेक विद्यार्थी वरच्या इयत्तेत गेले तरी संघर्ष करतात. विद्यार्थ्यांना या मूलभूत गोष्टी समजून घेण्यास मदत करण्यासाठी आम्ही सगळ्या धड्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम आणि टाइमलाइन दिल्या आहेत.

प्र.१० पुढील वर्षी इयत्ता सहावीची समाजशास्त्राची पाठ्यपुस्तक कशी बदलतील?

पुढील वर्षात पाठ्यपुस्तकात आणखी चार ते सहा प्रकरणे जोडण्याची योजना आहे. कारण आमच्याकडे अतिरिक्त वेळ असेल आणि शिक्षक अधिक तयार होतील. या वर्षीचा आशय मुद्दाम हलका ठेवण्यात आला होता. नवीन धड्यांमध्ये भारत आणि शेजारी देश, साम्राज्यांचे संक्रमण, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास आणि विविध समुदायांच्या एकत्रिकरणातून नटलेला भारताचा सांस्कृतिक इतिहास यासारख्या विषयांचा समावेश असू शकतो. आम्ही अर्थशास्त्राच्या एका धड्याचा देखील विचार करत आहोत जो जवळपास तयार आहे.

प्र.११ पुढील वर्षी इयत्ता सहावीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात तुम्ही ज्या धड्यांचा समावेश करण्याची योजना आखत आहात त्याचा अभ्यास केल्याशिवाय सध्याचे इयत्ता ६ वीचे विद्यार्थी इयत्ता ७ वी मध्ये त्याचा अभ्यास कसा करतील?

आपल्याला काळजी वाटणे साहजिक आहे. आम्ही एक ब्रिज कोर्स ऑफर करण्याची योजना आखत आहोत. जो राहिलेल्या अध्यायांचा आढावा घेण्यास मदत करेल, त्यामुळे विद्यार्थ्यांना राहिलेला अभ्यासक्रम समजून घेण्यास मदत होईल. यास सुमारे दोन ते तीन आठवडे लागू शकतात. त्यांची इच्छा असल्यास ते स्वतः पाठ्यपुस्तकही वाचू शकतात.

अधिक वाचा: NCERT च्या नवीन पाठ्यपुस्तकात ‘हडप्पा ’ नाही तर आता ‘सिंधू-सरस्वती संस्कृती’!

प्र.१२ विषयाचे वादग्रस्त स्वरूप लक्षात घेता, इयत्ता ६ वीच्या समाजशास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात हडप्पा संस्कृतीसाठी ‘सिंधू-सरस्वती’ आणि ‘इंडस-सरस्वती’ ही पर्यायी नावं समाविष्ट करण्यामागे समितीचा तर्क काय होता?

हडप्पा संस्कृतीसाठी ‘सिंधू-सरस्वती’ आणि ‘इंडस-सरस्वती’ यांसारख्या पर्यायी नावांचा समावेश करण्याचा निर्णय नवीन नाही किंवा कोणत्याही राजकीय अजेंड्यावर आधारित नाही. विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जोनाथन मार्क केनॉयर, ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञ जेन मॅकिंटॉश आणि भारतीय उपखंडातील अग्रगण्य अधिकाऱ्यांपैकी एक दिवंगत रेमंड ऑलचिन यांसारख्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात या संज्ञा वापरल्या आहेत. फ्रेंच पुरातत्त्वशास्त्रज्ञ जीन-मेरी कॅसल यांनीही हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात सरस्वती नदीबद्दल सांगितले आहे. दिवंगत अमेरिकन पुरातत्त्वशास्त्रज्ञ ग्रेगरी पोसेल यांनी त्यांच्या ‘द इंडस एज’ या पुस्तकात सरस्वती नदीला अनेक प्रकरणे समर्पित केली आहेत. ही संज्ञा प्रस्थापित पुरातत्त्व संशोधनावर आधारित आहे. अलीकडील कोणत्याही राजकीय प्रभावावर नाही. त्यामुळे ही हिंदुत्वाची गोष्ट नाही. शिवाय, आम्ही सर्व पर्यायी नावे समाविष्ट केली आहेत. माझ्या दृष्टीने हीच वस्तुस्थिती आहे.

प्र.१३ हडप्पा संस्कृतीचा सिंधू-सरस्वती संस्कृती असा उल्लेख करून ग्राम्य वैदिक संस्कृती हीच हडप्पा संस्कृती आहे असे दाखवण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली जाते…

हडप्पा संस्कृती हीच वैदिक आहे असे मानण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. ग्रीक विद्वान निकोलस कझानाससह काही विद्वानांचा असा युक्तिवाद आहे की, वैदिक कालखंड हा शहरीकरणाच्या मधल्या ( पूर्णांशाने शहरीकरण झालेल्या) टप्प्याऐवजी हडप्पाच्या सुरुवातीच्या (अप्रगत) टप्प्याशी संबंधित आहे. या कल्पनेला पाकिस्तानी पुरातत्त्वशास्त्रज्ञ मोहम्मद रफिक मुघल यांनी हडप्पा संस्कृतीचा प्रारंभिक कालखंड हा सिंधू संस्कृतीशी संबंधित असल्याचे पुरावे सादर करून समर्थन दिले आहे. दुसरा मुद्दा म्हणजे वैदिक ही ग्राम्य संस्कृती आहे, तर एच एच विल्सन यांनी ऋग्वेदाचे भाषांतर केले आहे, त्यांनी म्युलर यांच्याशी असहमती दर्शवत वैदिक संस्कृती ही प्रगत नागरी आणि सागरी असल्याचे म्हटले आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ.आर. एस. बिश्त यांनी बनवली आणि धोलावीरा येथे केलेल्या उत्तखननाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचा संबंध वैदीक संस्कृतीशी असल्याचे म्हटले आहे आणि आदिम समाजाच्या कल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विद्वानांच्या मतांच्या विचार करणे आवश्यक आहे, कारण ऋग्वेदात प्रगत व्यापार आणि सागरी व्यापाराचे संदर्भ आहेत, त्यामुळे त्यांना पूर्णतः खेडूत म्हणणे हे चुकीचे ठरेल. मॅक्सम्युलरने, चांगल्या हेतूने हे ग्रंथ उपलब्ध करून महत्त्वपूर्ण योगदान दिले. परंतु त्याच्या विवेचनाने ऋग्वेदाला आदिम ठरवले. अनेक विद्वान त्याच्याशी असहमत असले तरी त्याच्या मताचा प्रचंड प्रभाव आहे.

प्र.१४ परंतु या विषयावरील भिन्न दृष्टीकोन पाहता पाठ्यपुस्तकात या वादग्रस्त दृष्टिकोनाचा समावेश नसावा का?

होय, परंतु इयत्ता सहावीसाठी नाही. त्या स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अशा वादविवादांची गुंतागुंत पूर्णपणे समजून घेणे अडचणीचे असेल. मी जे वर्णन केले आहे ते पदव्युत्तर अभ्यासासाठी अधिक योग्य आहे. जर आपण अकरावीच्या मुलांसाठी हडप्पा सभ्यतेवर अभ्यासक्रम सुरू केला, तर मी अशा चर्चेच्या मूलभूत गोष्टींचा समावेश तिथे करेन. मी कोणतेही निष्कर्ष लादणार नाही परंतु भिन्न सिद्धांत, त्यांचे गुण-दोष सादर करेन आणि विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची मते तयार करण्यास प्रोत्साहीत करेन. हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन असेल.

प्र.१५ पण वादाला संदर्भ न देता आणि भिन्न दृष्टीकोन न देता सिंधू-सरस्वती सारख्या पर्यायी नावांचा समावेश करून, विद्यार्थ्यांवर विशिष्ट निष्कर्ष लादला जातोय, असे वाटत नाही का?

आम्ही काहीही लादत नाही; आम्ही फक्त वापरल्या जाणाऱ्या संज्ञा सादर करत आहोत. ही नावे वापरात आहेत ही वस्तुस्थिती आहे. काहीजण याला विरोध करत असले तरी, पारिभाषिक शब्द वापरले जायला हवेत. शिक्षकांच्या हँडबुकमध्ये, वर्गात या वादविवादांना कसे हाताळावे याबद्दल अधिक मार्गदर्शन करण्याची आमची योजना आहे.

प्र.१६ तुम्ही इयत्ता सहावीच्या समाजशास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात संस्कृत शब्दांच्या उच्चारासाठी मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहे. तुमच्याकडे अशीच मार्गदर्शक पुस्तिका मुघल काळातील धड्यांसाठी अरबी, पर्शियन शब्दांसाठी असेल का?

होय, आम्हाला माहिती आहे की इतर भाषांमधील शब्दांसाठी तत्सम उच्चार मार्गदर्शकांची आवश्यकता असेल…आम्ही आधीच तमिळ सारख्या भाषांसंबंधित येणाऱ्या आव्हानांना तोंड देत आहोत, जिथे विद्वत्तापूर्ण डायक्रिटिकल प्रणाली संस्कृतपेक्षा जटिल आहे. प्रत्येक भाषेची स्वतःची अशी आव्हानं आहेत, त्याचे आम्हाला टप्या टप्प्याने निराकरण करावे लागणार आहे.