खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप ऊर्फ अर्श डल्ला याला रविवारी कॅनडामध्ये अटक करण्यात आली, असे वृत्त पीटीआय सूत्राने दिले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अर्श डल्ला हा निज्जरचा अत्यंत निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. त्याला कॅनडा पोलिसांनी २७ व २८ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे. कोण आहे अर्श डल्ला? त्याचा कॅनडातील गोळीबार प्रकरणाशी संबंध काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
पीटीआयच्या वृत्तानुसार, हॅल्टन रीजनल पोलिस सर्व्हिस (एचआरपीएस) ने २९ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, बंदूक लपविण्याच्या आरोपाखाली दोन पुरुषांना अटक करण्यात आली, त्यापैकी अर्श डल्ला हा एक होता. दोघेही उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आले होते. त्यापैकी एकाला गोळी लागली होती. सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, अटक करण्यात आलेल्यांपैकी एक अर्श डल्ला असल्याची माहिती मिळाली आहे.
कोण आहे अर्श डल्ला?
लुधियाना येथे जन्मलेल्या अर्शदीप सिंग गिल ऊर्फ अर्श डल्लाला २०२३ मध्ये भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते. गृह मंत्रालयाच्या (एमएचए) राजपत्रातील अधिसूचनेनुसार, डल्ला प्रतिबंधित दहशतवादी संघटना खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित आहे. डल्ला याच्यावर हत्या, खंडणी आणि लक्ष्यित हत्यांसारख्या जघन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. त्याच्यावर दहशतवादी वित्तपुरवठा, सीमापार ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केल्याचेही गंभीर आरोप आहेत.
‘एमएचए’च्या अधिसूचनेनुसार, अर्श डल्ला राष्ट्रीय तपास संस्थेने नोंदवलेल्या आणि तपासलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे, ज्यात लक्ष्यित हत्या, दहशतवादी निधीसाठी पैसे घेणे, हत्येचा प्रयत्न, जातीय सलोखा बिघडवणे आणि पंजाब राज्यातील लोकांमध्ये दहशत निर्माण करणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अलीकडेच पंजाब पोलिसांनी रविवारी अर्श डल्लाच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांना गेल्या महिन्यात फरीदकोट जिल्ह्यात शीख कार्यकर्ते गुरप्रीत सिंग हरी नऊ यांच्या हत्येप्रकरणी अटक केली. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात जसवंतसिंग गिल (४५) नावाच्या व्यक्तीचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
डल्ला आपल्या पत्नीसह कॅनडात वास्तव्यास होता, असे सांगितले जाते. कॅनडात त्याला अटक झाल्यानंतर भारतीय अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून असल्याची आणि कॅनडाच्या अधिकार्यांबरोबर समन्वय साधत असल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर तोच दहशवादी कारवाया घडवत असल्याची आणि कॅनडामधून पंजाबमध्ये गुन्हेगारी कारवाया घडवत असल्याची माहिती होती.
हेही वाचा : वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
भारत-कॅनडातील राजनैतिक तणाव
गेल्या वर्षी १८ जून रोजी सरे येथे हरदीपसिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यापासून भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जर याच्या हत्येसाठी भारत सरकारच्या अधिकार्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी निज्जरच्या हत्येच्या चौकशीत केलेल्या सततच्या आरोपामुळे भारताने गेल्या महिन्यात आपले राजदूत संजय वर्मा यांना परत बोलावले. तसेच कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांचीही हकालपट्टी केली, त्यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक तणाव आणखीनच वाढला.