गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाने अखेर ताफ्यात दाखल करुन घेतलं. गेले आठवडाभर यासंदर्भात संदिग्धता होती. रविवारी गुजरातने रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत हार्दिकचं नाव होतं. पण काही तासातच हार्दिक मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याचं स्पष्ट झालं. हार्दिकसाठी मुंबई इंडियन्स संघाने १५ कोटी रुपये खर्चले आहेत. हार्दिकला समाविष्ट करण्यासाठी मुंबईने कॅमेरुन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुबरोबर ट्रेडऑफ केलं आहे. १३ वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात अष्टपैलू रवींद्र जडेजावर नियमभंगाची कारवाई होऊन एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. काय होतं ते प्रकरण, समजून घेऊया
रवींद्र जडेजाने २००८ मध्ये झालेल्या U19वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने त्याला संघात समाविष्ट केलं. २००८ हंगामानंतर जडेजाने राजस्थान संघव्यवस्थापनाकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली. राजस्थान संघाने याला नकार दिला. याचा परिणाम म्हणून जडेजाने राजस्थानशी करारबद्ध असतानाच वैयक्तिक पातळीवर मुंबई इंडियन्स संघाशी बोलणी सुरू केली. २०१० हंगामापूर्वी जडेजाने राजस्थान रॉयल्सबरोबर कराराचं नूतनीकरण करायलाही नकार दिला. ही कृती म्हणजे खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेचं उल्लंघन होतं. आयपीएल प्रशासनाने यासंदर्भात पत्रक जारी केलं. त्यात म्हटल्याप्रमाणे, रवींद्र जडेजाने राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाबरोबर कराराच्या नूतनीकरणास नकार दिला. मानधन वाढीच्या उद्देशाने जडेजाने अन्य फ्रँचाइजीबरोबर वैयक्तिक पातळीवर बोलणी सुरू केली. खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जडेजावर एक वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात येत आहे.
जडेजाच्या आयपीएल कारकीर्दीवर परिणाम झाला का?
नाही. एका वर्षाच्या बंदीनंतर जडेजा पुन्हा आयपीएलमध्ये परतला. २०११ मध्ये जडेजा कोची टस्कर्स केरळा संघासाठी खेळला. २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला ताफ्यात घेतलं. अल्पावधीतच जडेजा धोनीचा विश्वासू शिलेदार झाला. २०१५ पर्यंत जडेजा चेन्नईसाठी खेळला. त्यानंतर चेन्नई संघावर बंदीची कारवाई झाली. त्यामुळे २०१६-२०१७ अशा दोन वर्षांसाठी जडेजा गुजरात लायन्स संघाचा भाग होता. २०१८ पासून पुढे जडेजा चेन्नई सुपर किंग्सकडूनच खेळतो आहे. चेन्नईने जडेजासाठी तब्बल १६ कोटी रुपये खर्चले होते. कर्णधार धोनीपेक्षाही जडेजाचं मानधन जास्त आहे. स्पर्धेतील यशस्वी गोलंदाजांमध्ये तसंच अष्टपैलू खेळाडूंमध्ये जडेजाचं नाव अग्रणी आहे.
हार्दिक पंड्याचा ट्रेडऑफ वेगळा कसा?
हार्दिक पंड्यासंदर्भात झालेला व्यवहार हा दोन फ्रँचाइजी अर्थात दोन संघांमध्ये झाला. मुंबई इंडियन्स संघाने ऑल कॅश डिल मध्ये गुजरात टायटन्स संघाला १५ कोटी रुपये देत हार्दिक पंड्याला ताफ्यात समाविष्ट केलं. हार्दिकने वैयक्तिक पातळीवर मुंबई इंडियन्सशी बोलणी करुन करार केला नाही. हा व्यवहार गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यान झाला. या व्यवहाराला आयपीएल प्रशासनाने मंजुरी दिली. त्यानंतरच यासंदर्भात माहिती देणारं पत्रक आयपीएल प्रशासन, मुंबई इंडियन्स तसंच गुजरात टायटन्स संघाने जारी केलं. दोन्ही संघांच्या सोशल मीडिया हँडल्सवरुनही याबाबत नंतरच माहिती देण्यात आली.
हार्दिकला संघात घेण्यासाठी मुंबईला काय करावं लागलं?
आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक संघाला संघ उभारणीसाठी विशिष्ट रक्कम मिळते. शेवटच्या लिलावानंतर मुंबईकडे अतिशय तुटपुंजी रक्कम शिल्लक होती. हार्दिक पंड्यासाठी गुजरात टायटन्सने १५ कोटी रुपये मोजले होते. साहजिक तेवढे पैसे असल्याशिवाय मुंबईला हा व्यवहार करता येणार नव्हता. मुंबईने ट्रेडऑफ पद्धतीने कॅमेरुन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला दिलं. कॅमेरुन ग्रीनसाठी मुंबईने लिलावात १७.५ कोटी रुपये मोजले होते. बंगळुरूने ग्रीनसाठी होकार दिल्याने हार्दिकच्या घरवापसीचा मार्ग सुकर झाला.
ट्रेडऑफची पद्धत कायदेशीर?
आयपीएल प्रशासनानेच ट्रेडऑफ पद्धत राबवली आहे. दोन संघ परस्पर सामंजस्याने खेळाडूंची अदलाबदल करु शकतात. हार्दिक पंड्याप्रमाणे रवीचंद्रन अश्विन (किंग्ज इलेव्हन पंजाब ते दिल्ली कॅपिटल्स) आणि अजिंक्य रहाणे (राजस्थान रॉयल्स ते दिल्ली कॅपिटल्स) हे कर्णधार ट्रेडऑफ झाले आहेत. ट्रेडऑफसाठी फ्रँचाइजींचा निर्णय अंतिम असतो पण संबंधित खेळाडूलाही विचारलं जातं. खेळाडू परस्पर यासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. एक संघ दुसऱ्या संघाला ट्रान्सफर फी देतो. याबाबत जाहीर घोषणा होत नाही. ट्रान्सफर फी मधील काही वाटा खेळाडूलाही मिळतो. ट्रान्सफर फी आणि लिलावासाठी उपलब्ध रक्कम यांचा संबंध नसतो.