आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अष्टपैलू हार्दिक पंड्यावरील विश्वास कायम ठेवण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १७व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना हार्दिकने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याला कर्णधार आणि अष्टपैलू म्हणून फारसे यश मिळालेले नाही. त्यातच त्याच्या तंदुरुस्तीबाबतही कायम प्रश्न उपस्थित होत असतात. असे असले तरी त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात उपकर्णधारपदी नेमण्यात आले. त्याची निवड भारतीय संघासाठी घातक ठरू शकेल का, याचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिकच्या निवडीवरून इतकी चर्चा का?

जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी (३० एप्रिल) करण्यात आली. मात्र, त्यापूर्वीच्या एक-दोन आठवड्यांपासूनच हार्दिकबाबत काय निर्णय घेतला जाऊ शकतो, त्याची निवड होणार की नाही, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. यामागील मुख्य कारण म्हणजे, सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’मध्ये हार्दिकला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. विशेषत: त्याच्या गोलंदाजीबाबत सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात होती. यंदा ‘आयपीएल’मध्ये मुंबईच्या सलामीच्या लढतीत हार्दिकने अगदी पहिले षटक टाकण्याचे धाडस दाखवले. दुसऱ्या सामन्यातही त्याने नवा चेंडू हाताळला. मात्र, त्याच्या वाट्याला फारसे यश आले नाही. त्याने बऱ्याच धावा खर्ची केल्या. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर त्याने नव्या चेंडूने गोलंदाजी करणेच बंद केले. इतकेच काय तर काही सामन्यांत त्याने गोलंदाजी करणे पूर्णपणे टाळले. त्याने आतापर्यंतच्या नऊ सामन्यांत मिळून केवळ १९ षटके टाकली आहेत. यात त्याला चार बळीच मिळवता आले आहेत. त्यामुळे हार्दिकवरील विश्वास भारतीय संघ कायम ठेवणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

हेही वाचा… एटीएमचा नवा कार्ड ट्रॅप घोटाळा; कफल्लक व्हायचं नसेल तर हे वाचाच

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये कामगिरी कशी?

‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहित शर्माला हटवून हार्दिककडे नेतृत्वाची धुरा सोपवली ही बाब या संघाच्या चाहत्यांना अजिबातच आवडली नाही. त्यामुळे समाजमाध्यमे आणि प्रत्यक्ष सामन्यावेळी स्टेडियममध्ये मुंबईच्या चाहत्यांकडून हार्दिकविरोधात शेरेबाजी करण्यात आली. याचा हार्दिकच्या मानसिकतेवर आणि खेळावर निश्चित परिणाम झाला आहे. तो आता पूर्वीइतका आत्मविश्वास असलेला हार्दिक दिसून येत नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्व या तीनही विभागांत तो अपयशी ठरत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांत फलंदाज म्हणून त्याला २४.६२च्या सरासरीने आणि १५१.५३च्या स्ट्राईक रेटने १९७ धावाच करता आल्या आहेत. त्याच्या नावे अद्याप अर्धशतक नाही. गोलंदाजीत तो केवळ चार बळी मिळवू शकला आहे. तसेच कर्णधार म्हणून त्याच्याकडून बऱ्याच चुका होत आहेत.

हेही वाचा… खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट ‘RAW’ अधिकार्‍याने रचल्याचा आरोप, कोण आहेत विक्रम यादव?

तरीही हार्दिकवरील विश्वास कायम का?

पूर्णपणे तंदुरुस्त आणि लयीत असल्यास हार्दिक अष्टपैलू म्हणून एक ‘मॅचविनर’ आहे. त्याने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याच्या गाठीशी ९२ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. त्यातच वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचे फारसे पर्याय भारताकडे उपलब्ध नाहीत. या सगळ्याचा विचार करून हार्दिकवरील विश्वास कायम ठेवण्याचा भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. तसेच यंदाच्या स्पर्धेत त्याला कर्णधार म्हणून फारसे यश मिळाले नसले, तरी गेल्या दोन हंगामांत गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने या संघाला अनुक्रमे जेतेपद आणि उपविजेतेपद मिळवून दिले होते. याच कारणास्तव त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदीही कायम ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा… काँग्रेसची शकलं, चिन्हासाठी धडपड; इंदिरा गांधींनी कशी मिळवली सत्ता?

हार्दिकबाबत कोणती काळजी आवश्यक?

हार्दिक अष्टपैलू म्हणून चांगली कामगिरी करत असल्यास भारतीय संघ अधिक संतुलित होते यात दुमत नाही. मात्र, प्रत्येक सामन्यात हार्दिकवर अष्टपैलू म्हणून अवलंबून राहता येऊ शकते का, याबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागेल. हार्दिकच्या तंदुरुस्तीबाबत कायम प्रश्न उपस्थित केले जातात. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात हार्दिकच्या पायाला दुखापत झाली आणि याचा भारताला मोठा फटका बसला. त्यानंतर भारताला केवळ पाच गोलंदाजांनी खेळावे लागले. तसेच फलंदाजीत तो पूर्वीइतक्या सहजतेने आता फटकेबाजी करताना दिसत नाही. त्यामुळे आता हार्दिकवर अति-अवलंबून न राहण्याची भारताला काळजी घ्यावी लागेल. तसेच अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील संथ खेळपट्ट्यांवर हार्दिकची गोलंदाजी कितपत यशस्वी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya vice captain for twenty20 world cup loksatta explained article print exp asj
Show comments