-अन्वय सावंत
भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करताना तब्बल २३ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकण्याची किमया साधली. भारतीय संघाने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका होती. त्यामुळे या मालिकेदरम्यान झुलनच्या कामगिरीवर भारतीय क्रिकेटरसिकांच्या नजरा होत्या. झुलनने अपेक्षेनुसार टिच्चून मारा करताना भारताच्या मालिका विजयात मोलाची भूमिका बजावली. मात्र, भारताच्या या ऐतिहासिक यशात कर्णधार हरमनप्रीत कौरचे योगदान सर्वांत महत्त्वाचे ठरले. हरमनप्रीतने तीन सामन्यांत एका शतकासह २२१ धावा करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. तिच्या या कामगिरीचा घेतलेला आढावा.
हरमनप्रीतची कामगिरी निर्णायक का ठरली?
भारतीय महिला संघाच्या फलंदाजीची भिस्त हरमनप्रीत आणि स्मृती मानधना या कर्णधार आणि उपकर्णधारांच्या जोडीवर असते. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानांवर पराभूत करण्यासाठी या दोघींनीही दमदार कामगिरी करणे गरजेचे होते. हरमनप्रीत (२२१ धावा) आणि स्मृती (१८१ धावा) यांनी या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहात आपापल्या भूमिका चोख बजावल्या. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना हरमनप्रीतने केलेले झंझावाती शतक सर्वात निर्णायक ठरले.
हरमनप्रीतचे शतक खास का होते?
भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय नोंदवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही सरशी साधत मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याची भारताला संधी होती. या सामन्यात इंग्लंडने प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताची ३ बाद ९९ अशी स्थिती झाली होती. पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया यासुद्धा माघारी परतल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला कर्णधार हरमनप्रीतकडून मोठ्या खेळीची आवश्यकता होती. हरमनप्रीतनेही आपला खेळ उंचावताना १११ चेंडूंत १८ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद १४३ धावांची खेळी केली. एकदिवसीय कारकीर्दीतील ही तिची दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. तिच्या या खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ५ बाद ३३३ अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर इंग्लंडला २४५ धावांत गारद करत भारतीय संघाने मालिका विजय साकारला.
२०१७च्या विश्वचषकातील खेळीची आठवण का झाली?
हरमनप्रीतने २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११५ चेंडूंत २० चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने नाबाद १७१ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ त्यावेळी सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, हरमनप्रीतच्या झंझावाती खेळीने या सामन्याचे चित्र पालटले आणि भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. तिच्या याच खेळीची आठवण इंग्लंडविरुद्धच्या शतकादरम्यान झाली. दोन्ही सामन्यांमध्ये हरमनप्रीतने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर प्रतिहल्ला करत भारताला केवळ अडचणीतून बाहेर काढले नाही, तर विजयही मिळवून दिला.
हरमनप्रीतला सूर गवसणे भारतासाठी का महत्त्वाचे?
हरमनप्रीतने चांगली कामगिरी केल्यास भारतीय संघाला यश मिळण्याची शक्यता वाढते, हे वारंवार पाहायला मिळाले आहे. २००९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी हरमनप्रीत २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकातील कामगिरीमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिच्याकडून भारतीय संघाच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या. मात्र, पुढील तीन वर्षांत हरमनप्रीतला केवळ एक (२०१८च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध १०३ धावा) शतक झळकावता आले. त्यामुळे भारतीय संघातील तिच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आपल्या सर्वात अनुभव खेळाडूंपैकी एक असलेल्या हरमनप्रीतवर भारतीय संघाने विश्वास दाखवला आणि मग तिनेही हा विश्वास सार्थ ठरवला. या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये हरमनप्रीतने १७ सामन्यांत ५८च्या सरासरीने ७५४ धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचाही समावेश आहे. तिच्या या कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने श्रीलंका आणि इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकांमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवले. तसेच तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने राष्ट्रकुल स्पर्धेतील ट्वेन्टी-२० क्रिकेटची अंतिम फेरीही गाठली. हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ६५ धावांची खेळी केली, पण तिला इतरांची साथ न लाभल्याने भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. परंतु तिने फलंदाज आणि कर्णधार म्हणून सर्वांनाच पुन्हा प्रभावित केले.