-हृषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरयाणामध्ये २०१४मध्ये स्वबळावर भाजप सत्तेत आला. माजी संघप्रचारक असलेले मनोहरलाल खट्टर अनपेक्षितपणे मुख्यमंत्री  झाले. भाजप श्रेष्ठींची ही निवड बुचकळ्यात टाकणारी होती. राज्यात बिगर-जाट व्यक्तीकडे मुख्यमंत्रीपद आले. हा एक नवा सामाजिक प्रयोग मानला गेला. हरयाणाच्या राजकारणात जाट समुदाय प्रभावी आहे. पुन्हा २०१९मध्ये आघाडी सरकारमध्ये खट्टर हेच मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार आघाडीचे आहे. आता दीड वर्षांनंतर भाजप पुन्हा निवडणुकीला सामोरा जात आहे. निवडणुकीपूर्वी भाजप  हा उत्तराखंड किंवा गुजरातप्रमाणे हरयाणात नेतृत्वबदलाचा प्रयोग करणार काय, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. 

राजकीय महत्त्व…

राजधानी दिल्ली तसेच पंजाब सीमेलगतच्या हरयाणाचे राजकीय महत्त्व मोठे आहे. हे राज्य आकाराने लहान असले तरी, तेथून बाहेर येणारा राजकीय संदेश महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच हरयाणावर सत्ता कायम राखण्यासाठी भाजप ताकद लावणार हे निश्चित. गेली आठ वर्षे राज्यात भाजपची सत्ता आहे. इथेही काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपबरोबर सत्तेत असलेला दुष्यंत चौताला यांचा जननायक जनता पक्ष किंवा ओमप्रकाश चौताला यांचा लोकदल हे प्रभावी प्रादेशिक पक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने अस्तित्व दाखवून दिले आहे. राज्यात सत्ता राखणे भाजपला तितके सोपे नाही हे या निकालाने दाखवून दिले आहे. अशा वेळी नेतृत्वबदल करून सत्ताविरोधी लाट सौम्य करण्याचा प्रयत्न पक्ष करणार का? उत्तराखंडमध्ये तसेच गुजरातमध्ये भाजपने हा यशस्वी प्रयोग केला. अर्थात गुजरातची राजकीय स्थिती वेगळी आहे. खट्टर यांचे काय होणार, हा मुद्दा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व बदलाचे वृत्त फेटाळले आहे. समाजमाध्यमातून मुख्यमंत्री बदलत नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे. ज्यांना काही काम नाही अशी मंडळी समाजमाध्यमांवर दिवस-रात्र अफवा पसरवतात, अशा शब्दांत खट्टर यांनी टोलेबाजी केली आहे.

भाजप खासदाराची मागणी…

हरयाणाचा पुढचा मुख्यमंत्री ब्राह्मण हवा अशी मागणी भाजप खासदार अरविंद शर्मा यांनी केली. अर्थात खट्टर यांना हटवा अशी त्यांची सूचना नाही. खट्टर हे अजुन दहा वर्षेही पदावर राहू शकतील. त्यानंतर ब्राह्मण व्यक्तीला संधी द्या असे त्यांचे म्हणणे आहे. झज्जर जिल्ह्यात परशुराम संमेलनाला खट्टर यांनी हजेरी लावत राज्यातील ब्राह्मण समुदायाला साद घालण्याचा प्रयत्न केला. खट्टर यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या वेळीच नेतृत्व परिवर्तनाची अटकळ बांधली गेली. त्याला जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीची किनार होतीच. देवीलाल, बन्सीलाल, भजनलाल अशा दिग्गज जाट नेत्यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्या तुलनेत अनपेक्षितरीत्या बिगरजाट अशा खट्टर यांनी सलग आठ वर्षे राज्याची धुरा वाहणे हा एक विक्रमच म्हणावा लागेल. मात्र नेतृत्वबदल केल्यास दीड वर्षात नवा मुख्यमंत्री काय करणार, हा मुद्दा आहेच, त्यामुळे खट्टर यांना बदलले जाईल अशी चिन्हे नाहीत.

काँग्रेसमध्ये गटबाजी…

भुपिंदर हुडा, शैलजा असे काँग्रेसचे दिग्गज नेते हरयाणातून येतात. मात्र पक्षात तीव्र गटबाजी आहे. जून महिन्यात राज्यसभा निवडणुकीत अजय माकन या पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या उमेदवाराला पराभवाचा धक्का बसला. पाठोपाठ प्रदेश प्रभारी विवेक बन्सल यांच्या जागी शक्तीसिंह गोहील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचलचा धडा घेऊन काँग्रेसने पावले उचलून नवा नेता पुढे आणला तर राज्यात भाजपला लढत देता येईल. दोन्ही चौतालांच्या पक्षांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. हिमाचलमध्ये बंडखोरांनी भाजपचा पराभव केल्याने पक्ष सावध आहे. हरयाणात अंतर्गत वाद उफाळू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळेच खट्टर यांच्याबाबत नुसती समाजमाध्यमांतच चर्चा सुरू आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana chief minister manohar lal khattar speculation of being replaced by bjp print exp scsg
Show comments