हरियाणातील नूह जिल्ह्यात ३१ जुलै रोजी मोठा हिंसाचार उफाळला. या घटनेचे पडसाद शेजारच्या अन्य राज्यांतही उमटले. हरियाणातील काही समुदायाने ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रेला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही हिंसाचाराची घटना घडली. या हिंसाचारामुळे नूह जिल्ह्यासह अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती. दरम्यान, स्वयंघोषित गोरक्षक राज कुमार ऊर्फ बिट्टू बजरंगी हाच या हिंसाचारास जबाबदार आहे, असा आरोप केला जात होता. त्यामुळे बिट्टू बजरंगी याला अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बिट्टू बजरंगी कोण आहे? हरियाणातील हिंसाचारास त्याला का जबाबदार धरले जात आहे? हे जाणून घेऊ या …

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिट्टू बजरंगीला अटक

नूह हिंसाचारप्रकरणी सादार नूह पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी (एएसपी) उषा कुंडू यांनी तक्रार दाखल केली होती. कर्तव्यावर असलेल्या शासकीय अधिकाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय अधिकाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, असा आरोप बजरंगीविरोधात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५ अंतर्गतही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बिट्टू बजरंगीविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी एक विशेष तपास पथक तैनात करण्यात आले होते.

बिट्टू बजरंगी कोण आहे?

बिट्टू बजरंगी याचा फरिदाबाद येथील डाबुआ आणि गाझीपूर येथील फळे आणि भाज्या विकण्याचा व्यापार आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने गोरक्षणासाठी एका गटाची स्थापना केली होती. या गटाला त्याने ‘गोरक्षा बजरंग फोर्स’ असे नाव दिले होते. तो स्वयंघोषित गोरक्षक मोनू मानेसर याचा सहकारी असल्याचेही म्हटले जाते. मोनू मानेसर हादेखील नूह येथील हिंसाचारास जबाबदार आहे, असा आरोप केला जातो.

बजरंगीविरोधात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल

मिळालेल्या माहितीनुसार बिट्टू बजरंगी याने याआधी ‘लव्ह जिहाद’ला विरोध करणाऱ्या अनेक रॅलींचे नेतृत्व केलेले आहे. तसेच समाजमाध्यमांवर त्याने मुस्लीम समुदायाकडून चालवल्या जाणाऱ्या दुकानांवर बहिष्कार घाला, असे आवाहन करणारे व्हिडीओ टाकले होते. बजरंगीला १५ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. मात्र, त्याआधीदेखील त्याच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषण, लोकांच्या धार्मिक भावना दुखावणे अशा आरोपांखाली वेगवेगळे पाच गुन्हे दाखल आहेत.

बिट्टू बजरंगीचा नूह हिंसाचाराशी संबंध काय?

बिट्टू बजरंगीला १५ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. हरियाणातील नूह येथील हिंसाचाराशी बजरंगीचा संबंध असल्याचा दावा केला जातोय. समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी धमकीचे व्हिडीओ पोस्ट करणे, तसेच धार्मिक उन्माद पसरवल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या व्हिडीओंत बजरंगीने भगव्या रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. तसेच बॅकराऊंडला धमकी देणारे गाणे वाजत आहे. बजरंगीच्या या व्हिडीओनंतर संबंधित गाणे चांगलेच व्हायरल झाले. या व्हिडीओमुळे लोक भडकले, असा दावा केला जात आहे. ‘गोली पे गोली चलेगी, बाप तो बाप होता है’, असे शब्द या गाण्यात आहेत. या व्हिडीओबद्दल विचारल्यानंतर “ज्यांनी मला धमकावण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी या व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिले,” असे बजरंगी म्हणाला होता. दरम्यान, मी रॅलीत सहभागी होणार होतो; मात्र त्याच्या दोन दिवसांआधीच मला धमकी मिळाली होती, असा दावाही बजरंगी याने केला आहे.

बजरंगी म्हणतो, “तुम्हारा जिजा आ रहा है”

३१ जुलै रोजी बजरंगीने समाजमाध्यमावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत “फुलमाला तयार रखो, तुम्हारा जिजा आ रहा है,” असे बजरंगी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या ब्रिज मंडळ यात्रेत मोनू मानेसर सहभागी होणार होता. याच कारणामुळे बजरंगीने हा व्हिडीओ शेअर केला होता.

बजरंगीवर नेमका आरोप काय?

समाजमाध्यमांवर भडकावू व्हिडीओ पोस्ट करण्याव्यतिरिक्त विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीत बजरंगीने अवैध शस्त्र बाळगले होते. तसेच ही शस्त्रे जप्त केल्यानंतर बजरंगीने ती पोलिसांकडून जबरदस्तीने हिसकवून घेतली, असादेखील दावा पोलिसांनी केला आहे. उषा कुंडून यांनी दाखल केलेल्या तक्रारीत “३१ जुलै रोजी जलाभिषेक यात्रेदरम्यान माझ्यावर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, दुपारचे १२.३० ते ३ वाजण्यादरम्यान नलहार मंदिरापासून साधारण ३०० मीटरच्या अंतरावर १५ ते २० जण मंदिराकडे जात होते. मंदिराकडे शस्त्र घेऊन जाऊ नये, असे म्हणत मी त्यांना अडवले. त्यातील काहींच्या हातांत तलवारी होत्या; तर काहींच्या हातांत त्रिशुळासारखे शस्त्र होते. मी माझ्यासोबतच्या काही लोकांची मदत घेऊन त्यांना शस्त्र बाळगण्यास विरोध केला. त्यातील बिट्टू बजरंगी नावाच्या व्यक्तीची समाजमाध्यमांद्वारे ओळख पटलेली आहे. त्याने आपल्या साथीरांसह जप्त केलेली शस्त्रे माझ्यासह अन्य पोलिसांकडून हिसकावून घेतली,” असे म्हटले आहे.

याबाबत विचारले असता, आम्ही फक्त पूजेसाठी तलवारी आणल्या होत्या. यात्रेतील काही लोकांकडे शस्त्रे होती. मात्र, या सर्व शस्त्रांचा परवाना होता. तलवारीचा उपयोग हा पूजा, लग्न समारंभादरम्यानही होतो. तलवार खून करण्यासाठी वापरली जात नाही, असे उत्तर बजरंगी याने दिले होते.

हरियाणामध्ये नेमके काय घडले होते?

३१ जुलै रोजी हरियणातील नूह जिल्ह्यात दोन जमावांत हिंसाचार झाला. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेली ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा रोखण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ही हिंसाचाराची घटना घडली. या घटनेदरम्यान दगडफेक करण्यात आली. अनेक कारना आग लावून देण्यात आली. या घटनेचे पडसाद गुरुग्राम, तसेच अन्य भागांतही उमटले. या हिंसाचारात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये गुरुग्राममधील मुस्लीम धर्मगुरूचाही समावेश आहे. सार्वजनिक, तसेच खासगी मालमत्तेचीही नासधूस झाली. विशेष म्हणजे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यसाठी केंद्रीय सैन्याला पाचारण करावे लागले.

९३ एफआरआय, १७६ जणांना अटक

सोमवारी परिस्थिती निवळल्यानंतर नूह जिल्ह्यातील इंटरनेट पूर्ववत करण्यात आले. तसेच कर्फ्युदेखील सोमवार व मंगळवार या दोन दिवशी सकाळी ६ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत शिथिल करण्यात आला. ११ ऑगस्ट रोजी शाळा आणि शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या. या हिंसाचारामुळे बसेसदेखील बंद करण्यात आल्या होत्या. त्या आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १७६ लोकांना अटक करण्यात आली आहे; तर ९० जणांना ताब्यात घेण्यात आले. ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana nuh district communal riots know who is bittu bajrangi arrested on 15 august prd