सुनील कांबळी

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत होरपळत असताना आठवड्याभरापासून हरियाणाही धुमसत आहे. तिथल्या दंगलींमध्ये आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे. तेथील हिंसाचार आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले असले तरी धार्मिक सलोख्यास तडा जात असल्याचे चित्र ठसठशीतपणे दिसते.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

हिंसाचाराची ठिणगी कुठे पडली?

हरियाणाच्या नूह जिल्ह्यात ब्रिजमंडल जलाभिषेक यात्रेत दगडफेक झाली आणि हिंसाचाराची ठिणगी पडली. मात्र, समाजमाध्यमांवरील चिथावणीखोर पोस्टमुळे दंगल उसळण्याचा अलिकडचा कल हरियाणातही दिसतो. दोन मुस्लीम तरुणांच्या हत्याप्रकरणातील फरार आरोपी मोहित यादव उर्फ मोनू मनेसर याने ३० जुलै रोजी फेसबुकवर एक चित्रफित प्रसारित केली होती. नूहमध्ये ब्रिजमंडल जलाभिषेक यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्याने या चित्रफितीत केले होते. फरार असूनही आपण स्वतः यात्रेत सहभागी होणार असल्याचे त्याने जाहीर केले होते. दुसरा एक गोरक्षक बिट्टू बजरंगीने अशीच चित्रफित प्रसारित करून यात्रेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी, ३१ जुलै रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ब्रिजमंडल जलाभिषेक यात्रा काढली. त्याच दिवशी सकाळी विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी मेवात येथील महादेव मंदिरात चिथावणीखोर भाषण केले. त्यानंतर नूहमध्ये मिरवणुकीवर स्थानिक मुस्लिमांनी दगडफेक केली आणि नूह आणि गुरूग्राममध्ये हिंसाचार सुरू झाल्याचे तपासात पुढे आले आहे.

हरियाणामध्येही बुलडोझर कारवाई?

उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाईच्या धर्तीवर हरियाणात कथित दंगलखोरांवर बुलडोझर कारवाई सुरू आहे. हिंसाचारग्रस्त नूहपासून २० किलोमीटरवरील तौरू येथील झोपडपट्टीवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. जवळपास २५० झोपड्यांवर बुलडोझर चालविण्यात आला. नूहमधील दंगलीत बाहेरील नागरिकांचा हात असल्याचा आरोप असून, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या आदेशानुसार ही बुलडोझर कारवाई करण्यात आली. नूहमधीलही बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू असून, तीन मजली हाॅटेलसह अनेक दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. त्यात बहुतांश औषध दुकाने आहेत. मिरवणुकीदरम्यान या हाॅटेलच्या तीन मजली इमारतीवरून दगडफेक, गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे.

हिंदू राजांनी प्राचीन भारतातील बौद्ध वास्तू नष्ट केल्या होत्या का?

जीवितहानी, वित्तहानी किती?

हरियाणातील हिंसाचारात दोन्ही गटातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यात सुमारे २० पोलिसांचा समावेश आहे. नूह येथील सायबर पोलीस ठाण्यावरही हल्ला करण्यात आला. पुरावे नष्ट करण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दंगलीमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले असून, गुरूग्रामधील आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. त्यामुळे वित्तहानीचा अधिकृत आकडा स्पष्ट झालेला नसला तरी नूह आणि गुरूग्रामची आर्थिक घडी विस्कटल्याचे दिसते.

आतापर्यंत कारवाई काय?

हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी १०२ गुन्हे दाखल केले असून, आतापर्यंत २०२ जणांना अटक केली आहे. तसेच ८० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी म्हटले आहे. मात्र, याबाबत गुप्तचर विभागाकडून पूर्वसूचना मिळाली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. हिंसाचाराला चिथावणी देणारा मजकूर, चित्रफिती असलेल्या २०० पोस्ट समाजमाध्यमावरून हटविण्यात आल्या आहेत. तसेच चार खाती बंद करण्यात आली असून, आणखी १६ खात्यांवर कारवाईची विनंती संबंधित समाजमाध्यम मंचांना करण्यात आली आहे. नूह जिल्ह्यात रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. जिल्ह्यातील इंटरनेटबंदीला मात्र ८ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

खाप पंचायतींची भूमिका काय?

हरियाणात खाप पंचायती प्रबळ आहेत. धार्मिक ध्रुवीकरणासाठी आपल्या भूमीचा वापर करू देणार नाही, असा इशारा देत या खाप पंचायतींनी हिंसाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. राज्यात शांतता आणि ऐक्य अबाधित राखण्यासाठी खाप पंचायतींनी शनिवारी जिंद येथे सर्वधर्मीय संमेलन आयोजित केले होते. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेवर बंदीची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. मोनू मनेसरला सरकारने आधीच अटक केली असती तर हिंसाचार घडलाच नसता. त्याला सरकार वाचवत असल्याचा आरोप काही खाप पंचायतींनी केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभाजनवादी राजकारण फोफावत असल्याने राज्यभर जनजागृती करण्याचे खाप पंचायतींचे नियोजन आहे. हिंसाचाराविरोधात पुढील दिशा ठरविण्यासाठी ९ ऑगस्टला महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. हिंसाचारावर अंकुश ठेवण्यात तूर्त पोलिसांना यश आल्याचे चित्र दिसत असले तरी आगामी निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरूच राहतील, असा एकूण रागरंग दिसतो.