इस्रायल-इराण संघर्षाचे स्वरूप आता भीषण झाले आहे. इस्रायलचे सातत्याने हल्ले सुरू आहेत. इस्रायलचे मुख्य लक्ष हिजबुल आहे. इस्रायली सैन्याने २७ सप्टेंबर रोजी एका लक्ष्यित हल्ल्यात हिजबुल या दहशतवादी गटाचा प्रमुख हसन नसराल्लाह याची हत्या केली. त्या हल्ल्यात इतर अनेक हिजबुल कमांडरही मारले गेले. आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला आहे की, नसराल्लाहचा उत्तराधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्या हाशेम सफीद्दीन याला ठार मारण्यातही इस्रायलला यश आले आहे. मंगळवारी लेबनीज लोकांना संबोधित केलेल्या एका व्हिडीओ संदेशात ते म्हणाले की, इस्रायलने हिजबुलची क्षमता कमी केली आहे. आम्ही हजारो दहशतवाद्यांना ठार केले आहे, ज्यात दीर्घकाळापासून आमच्या लक्ष्यावर असणारा हिजबुलप्रमुख हसन नसराल्लाहचादेखील समावेश आहे.
त्यांनी हिजबुलच्या उत्तराधिकार्यालाही ठार केल्याचा दावा केला. इस्रायलच्या पंतप्रधानांनी ठार झालेल्या कमांडरचे नाव घेतले नसले तरी नसराल्लाहच्या मृत्यूनंतर हाशेम सफीद्दीन हिजबुलचे नेतृत्व करणार असल्याचा अंदाज होता. आठवड्यात बेरूतमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात त्याला लक्ष्य करण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही, असे तीन लेबनीज सुरक्षा सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले. मात्र, हिजबुलने त्याच्या मृत्यूबाबत जाहीरपणे भाष्य केलेले नाही. इस्त्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानेही सफीद्दीन मारला गेला होता की नाही याची पुष्टी केली नाही. “आम्ही बेरूतमधील हिजबुलच्या गुप्तचर मुख्यालयावर हल्ला केला. हे गुप्तचर विभागाचे प्रमुख अबु अब्दुल्ला मोर्तदा यांचे मुख्यालय आहे,” असे आयडीएफचे प्रवक्ते रिअर एडम डॅनियल हगारी यांनी माध्यमांना सांगितले. ते म्हणाले की, हाशेम सफीद्दीन मुख्यालयात होता. हाशेम सफीद्दीन कोण आहे? इस्रायलच्या नेतृत्वावर होत असलेल्या हल्ल्यांमुळे हिजबुल कमकुवत झाले आहे का? एकूणच या संघटनेची परिस्थिती काय? त्यावर एक नजर टाकू.
कोण आहे हाशेम सफीद्दीन?
नसरल्लाह याचा चुलतभाऊ आणि ‘हिजबुल’च्या कार्यकारी परिषदेचा प्रमुख हाशेम सफीद्दीन हे नाव सध्या सर्वांत जास्त चर्चेत आहे. ‘हिजबुल’च्या राजकीय आणि आर्थिक कारवायांमध्ये सफीद्दीनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुख्य म्हणजे नसरल्लाह याचा वारसदार म्हणून त्याच्याकडे फार पूर्वीपासून पाहिले जात आहे. १९६४ मध्ये जन्मलेल्या सफीद्दीनचे हिजबुल आणि इराण या दोन्हींशी घनिष्ठ संबंध आहेत. इराणच्या सत्ताधारी मौलवींशी असलेल्या त्याच्या संबंधांसाठीही तो ओळखला जातो. त्याने कोममध्ये अनेक वर्षे शिक्षण घेतले. त्याचा मुलगा रिदा याचा विवाह इराणच्या कुड्स फोर्सचा माजी कमांडर कासिम सुलेमानी यांची मुलगी झैनाब सुलेमानीशी झाला आहे. त्याने इराणी शहर कोममध्ये शिक्षण घेतल्यानंतर शेती करण्यास सुरुवात केली. २०२० मध्ये बगदादमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मरण पावलेल्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या कुड्स फोर्सचे कमांडर मेजर जनरल कासेम सुलेमानी यांच्याशीही त्याचे जवळचे संबंध होते.
हिजबुलचे नेतृत्व खरंच कमकुवत झाले का?
इस्त्रायलने सफीद्दीनला लक्ष्य केले आणि हसन नसराल्लाह, इब्राहिम अकील, अली कराकी यांसारख्या इतर हिजबूल्लाच्या दिग्गज नेत्यांनाही लक्ष्य केले. या हत्यांमुळे लेबनॉनआधारित अतिरेकी गटाला मोठा धक्का बसल्याचे अनेक तज्ज्ञांनी नमूद केले आहे. मात्र, आता त्यांच्याकडे दिशा किंवा नेतृत्वाचा अभाव आहे, असे म्हणता येणार नाही. १९९१ पासून हिजबुलचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल असलेले ७१ वर्षीय नईम कासेम अजूनही जिवंत आहेत. १९९२ मध्ये इस्रायली हेलिकॉप्टर हल्ल्यात मारले गेलेले हिजबुलचे दिवंगत सरचिटणीस अब्बास अल-मुसावी यांच्या नेतृत्वाखाली कासेमची उप महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शिया राजकीय कार्यात त्यांची महत्त्वाची उपस्थिती राहिली. गटामध्ये त्यांनी कोणती भूमिका निभावली हे स्पष्ट नसले तरी असे म्हटले जाते की, त्याचा गटाच्या संसदीय क्रियाकलापांवर देखरेख करण्यातही सहभाग आहे.
सोमवारी नसराल्लाहच्या हत्येनंतर, त्याने एक सार्वजनिक भाषणही केले आणि असे म्हटले की, हिजबुल जमिनी लष्करी कारवाईत इस्रायलला रोखण्यासाठी तयार आहेत. हिजबुलचे बाह्य ऑपरेशन्सचे प्रभारी असलेले तलाल हमीह आणि हिजबुलच्या सुरक्षा युनिटचे प्रमुख असलेले खोडोर नादेरदेखील आहेत. शिवाय, बद्र प्रादेशिक विभागाचा कमांडर अबू अली रिदादेखील जिवंत आहे. मात्र, त्याचे सध्याचे स्थान कोणालाच माहीत नाही. हिजबुलच्या राजकीय शाखेतून इब्राहिम अमीन अल-सय्यद गटाच्या राजकीय परिषदेचा प्रमुख म्हणून काम करतो. तसेच लेबनीज संसदेत हिजबुलच्या गटाचा प्रमुख मोहम्मद राददेखील जिवंत आहे.
हिजबुलचे कोणते नेते मारले गेले?
इस्रायलने हिजबुलच्या नेतृत्वांवर हल्ले केल्याने हा गट काही प्रमाणात कमकुवत झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलने हिजबुलच्या अनेक प्रमुख कमांडरांचा पाठलाग केला आहे. हसन नसराल्लाहच्या हत्येने हिजबुलला सर्वात मोठा धक्का बसला आहे. २७ सप्टेंबर रोजी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हसन नसराल्लाह मारला गेला होता, पण तो एकटाच नव्हता. इस्रायलने हिजबुलच्या सेंट्रल कौन्सिलचा उपप्रमुख नाबिल कौक यालाही ठार मारले. अनेकांनी त्याला नसराल्लाहचा संभाव्य उत्तराधिकारी मानले होते.
शीर्ष कमांडर आणि हिजबुलच्या एलिट रडवान फोर्सेसचा नेता इब्राहिम अकील याचादेखील मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, अकील हा त्या गटाचा भाग होता, ज्याने १९८३ मध्ये बेरूतमधील अमेरिकेच्या दूतावासावर बॉम्बस्फोट घडवून आणला आणि जर्मन व अमेरिकन लोकांना ओलिस ठेवण्याची योजना आखली. अकिल ठार झालेल्या हवाई हल्ल्यात रडवान फोर्सेसचा कमांडर अहमद वेहबे याचाही मृत्यू झाला. हिजबुलच्या ड्रोन युनिटचा प्रमुख मोहम्मद सुरूर आणि हिजबुलच्या क्षेपणास्त्र युनिटमधील इब्राहिम कोबेसी यांनाही इस्रायलने ठार केले. तसेच जुलै १९८३ मध्ये अमेरिका, फ्रेंच आणि इस्रायली लक्ष्यांवर सुरू करण्यात आलेल्या मोठ्या आत्मघाती बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या फुआद शुक्रलाही इस्रायलने ठार केले.
हेही वाचा : दहशतवाद्यांकडून वडिलांची हत्या; मुस्लीमबहुल मतदारसंघात विजयी झालेल्या भाजपाच्या शगुन परिहार कोण?
हा हिजबुलचा अंत आहे का?
लंडनमधील चथम हाऊस या पॉलिसी इन्स्टिट्यूटमधील सहयोगी सहकारी लीना खतिब यांनी ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ला सांगितले होते, “नसरल्लाह मारला गेला तर हिजबुल कोसळणार नाही, परंतु हा गटाच्या मनोबलाला मोठा धक्का असेल.” इतर तज्ज्ञांनी हे देखील नोंदवले आहे की, या हत्यांमुळे हिजबुलला नुकसान होईल की नाही हे सांगणे शक्य नाही. ज्येष्ठ पत्रकार जॅक खौरी यांनीही हारेट्झने प्रकाशित केलेल्या लेखात असेच मत मांडले. त्यांनी लिहिले, “इस्त्रायलद्वारे करण्यात आलेली हिजबुलच्या नेत्याची ही पहिली लक्ष्यित हत्या नाही, त्यामुळे या हत्या म्हणजे हिजबुलचा अंत असे म्हणता येणे कठीण आहे. अनेक विश्लेषकांनी हिजबुलचा माजी प्रमुख अब्बास अल-मुसावी याच्या हत्येकडे लक्ष वेधले आहे. काही जणांचा असा विश्वास आहे की, नेतृत्वाच्या मृत्यूमुळे हिजबुलच्या संकल्पाला बळकटी मिळेल. यामध्ये येमेनमधील हौथी आणि इराकमधील कताइब आणि या प्रदेशातील इतर हिजबुल-संरेखित गटांचाही अधिक सहभाग दिसेल.