पंजाब विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दरम्यान, २०१७ मध्ये मोगा येथील गुरिंदर सिंग नावाच्या व्यक्तीच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांनी मुक्काम केला होता. यावरून काँग्रेस त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत आहे. गुरुवारी एका निवडणूक रॅलीत राहुल गांधींनी आम आदमी पक्षावर निशाणा साधला आणि म्हटले की, ‘आप’चे नेते दहशतवाद्यांच्या घरी दिसतात. त्याचवेळी भाजपा आणि अमरिंदर सिंग हे देखील फुटीरतावादी घटकांना आम आदमी पार्टीचा विजय पाहायचा आहे, अशी टीका करत आहेत. दरम्यान, अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही आपवर कट्टरवाद्यांशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे गुरिंदर सिंग ज्यांच्या घरी अरविंद केजरीवाल राहिले होते?
गुरिंदर सिंग हे इंग्लंडचे नागरिक असून ते इंग्लंडमध्येच राहतात. पण त्यांचे मोगा जिल्ह्यातील घळ कलान या मूळ गावीही एक घर आहे, जे ते भाड्याने देतात. २०१७ मध्ये जेव्हा केजरीवाल त्यांच्या घरी थांबले होते, तेव्हा गुरिंदर तिथे उपस्थित नव्हते. गुरिंदर यांचे नाव १९९७ मध्ये मोगा जिल्ह्यातील बाघापुराना येथील मंदिराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात समोर आले होते. गुरिंदरवर हा स्फोट घडवणाऱ्या खलिस्तान कमांडो फोर्सच्या मॉड्यूलचा भाग असल्याचाही आरोप आहे. मात्र, न्यायालयाने गुरिंदरची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. २००८ मध्येही गुरिंदरवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु न्यायालयाने त्यांची या प्रकरणांतून निर्दोष मुक्तता केली होती.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी याबाबत राज्यभर दौरा केला होता. यादरम्यान ते त्यांच्या समर्थकांच्या घरी किंवा पक्षाने ज्याठिकाणी मुक्कामाची सोय केली होती, तिथे थांबले होते. २०१७ च्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल २९ जानेवारीला गुरिंदरच्या घरी थांबले होते. त्याच्या दोन दिवसांनंतर भटिंडा जिल्ह्यातील मौर मंडी येथे दोन बॉम्बस्फोट होऊन सात जण ठार झाले. सुरुवातीला, पोलिसांनी या हल्ल्यात खलिस्तानी गटाचा हात असल्याचे सांगताच, काँग्रेस आणि अकाली दलाने लगेचच केजरीवाल यांची गुरिंदरच्या घरी भेट आणि त्यांच्यावरील दहशतवादी कारवायांचा आरोप यांचा संबंध जोडला.
विश्लेषकांचे मत आहे की या वादामुळे आपला ४ फेब्रुवारीच्या मतदानात धक्का बसला आणि काँग्रेसला फायदा ला. मौर बॉम्बस्फोटातील दोषींना अटक करण्याच्या मागणीवर ‘आप’ कधीच आवाज उठवत नाही, यालाही ‘आप’च्या विरोधकांनी चांगली प्रसिद्धी दिली. ‘आप’च्या भूमिकेवरून झालेल्या गोंधळाचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाला. मात्र, नंतर पोलिस तपासात खलिस्तानींचा मौर स्फोटाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकरणात डेरा सच्चा सौदाच्या भूमिकेबाबत तपास सुरू आहे.
मात्र, राहुल गांधींच्या आरोपावर आम आदमी पक्षाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण २०१७ मध्ये आपचे पंजाबचे प्रभारी संजय सिंह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. ते म्हणाले होते की, प्रोटोकॉलचे पालन करून, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या रात्रीच्या मुक्कामासह सर्व कार्यक्रम आधीच पंजाब पोलीस आणि गुप्तचर विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्यामुळे काही आक्षेपार्ह असल्यास आम्हाला कळविणे पोलिसांचे कर्तव्य आहे. संजय सिंह यांनी असा दावाही केला होता की, स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि सहआयुक्त दर्जाचे अधिकारीही भाड्याने घरात राहत होते, मग तेही दहशतवादी आहेत का?, असा सवाल त्यांनी केली होता. मात्र, नंतर न्यायालयाने गुरिंदरची निर्दोष मुक्तता केली होती.