दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात फळे आणि भाजीपाल्यांमधील रसायनांचा अंश धोकादायक पातळीवर पोहोचला असून, तो तातडीने कमी करण्यासाठी उपाययोजना करा, असे आदेश केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने काढले आहेत. त्यानंतर फळे आणि भाजीपाल्यांमधील रसायनांचा अंश चर्चेत आला आहे. त्याबाबत…

फळे, भाजीपाल्यांतील रसायनांचा अंश म्हणजे काय?

अनुकूल हवामानामुळे देशात बारमाही फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन होते. हवामानातील बदलांमुळे रोगांचा, किडींचा, बुरशींचा प्रार्दुभाव वाढत आहे. हा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून आणि झाला तर पिकाचे नुकसान लवकरात लवकर कमी व्हावे, विविध प्रकारच्या रसायनांची, कीडनाशकांची, बुरशीनाशकांची फवारणी करावी लागते. अनेकदा फळे, भाजीपाल्यांची वाढ वेगाने व्हावी. फळांचा आकार वेगाने वाढावा, एक सारखा आकार यावा, आकर्षक रंग यावा, यासाठीही रसायनांची फवारणी केली जाते. यातील अनेक रसायनांचा अंश दीर्घ काळ भाजीपाला किंवा फळांत राहतो. हाच रसायनांचा अंश मानवाच्या आरोग्याला धोकादायक ठरतो आहे.

स्पर्शजन्य, आंतरप्रवाही औषधे म्हणजे काय?

फळे आणि भाजीपाल्यांवर कीडनाशक, बुरशीनाशकांसह विविध रसायनांची फवारणी केली जाते. त्यातील काही औषधे स्पर्शजन्य तर काही आंतरप्रवाही असतात. फळे, भाजीपाला किंवा फळ झाडांच्या पानांवर स्पर्शजन्य औषध फवारणी केली जाते. संबंधित रोग, कीड, बुरशींवर थेट औषधी फवारणी होते. त्या औषधांचा स्पर्श झाल्यानंतर किंवा औषधाशी संपर्क आल्यानंतर संबंधित प्रादुर्भाव कमी होतो. काही औषधे आंतरप्रवाही असतात. त्यांची फवारणी केल्यानंतर संबंधित रसायनांचे पानांच्या वाटे किंवा फळांच्या सालीवर असणाऱ्या लहान छिद्रातून शोषण होते. संबंधित रसायन फळझाडाच्या रसामध्ये मिसळते. असा रस किडीने किंवा बुरशी शोषल्यानंतर किडीचा, बुरशीचा प्रार्दुभाव कमी होतो. म्हणजे संबंधित रसायन संपूर्ण फळ झाडांत मिसळून जाते. परंतु अशी रसायने मानवी आरोग्याला अत्यंत धोकादायक असतात.

विश्लेषण: चेंबूर ते नरिमन पॉइंट ३० मिनिटांत…! ईस्टर्न फ्री-वे ते नरिमन पॉइंट भुयारी मार्ग कसा असेल?

केंद्राच्या कृषी खात्याच्या आदेशात नेमके काय?

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने राज्यांच्या कृषी मंत्रालयांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. देशातील फळे आणि भाजीपाल्यांमधील रसायनांचा अंश कमाल मर्यादेच्या पुढे गेल्याचे दिसून आले आहे. हे रसायनांचे अंश किमान मर्यादेपर्यंत आणावेत. त्यासाठी शेतकरी, संबंधित फळे, भाजीपाल्यांचे उत्पादकांमध्ये जागृती करण्यासाठी तातडीने योजना राबवणे आवश्यक आहे. संबंधित धोकादायक रसायने न वापरता उत्पादन घेण्याबाबतचे प्रशिक्षण देण्याची गरज असून, राज्य सरकारने याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, त्याचा सविस्तर कार्यपालन अहवाल केंद्राच्या कृषी विभागाला सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

राज्याचे कृषी खाते नेमके काय करणार?

केंद्राच्या कृषी खात्याचे आदेश मिळताच राज्याच्या कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाच्या वतीने तातडीने आदेश देऊन कीडनाशकांच्या वापरांबाबत जागृती करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात शेतकऱ्यांमध्ये जागृती करा. त्यांना धोकादायक कीडनाशकांच्या वापरा बाबतचे प्रशिक्षण द्या, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रसायनांच्या अंशामुळे निर्यातीवर परिणाम?

युरोप आणि अमेरिकेमध्ये कोणताही शेतीमाल, फळे, भाजीपाला पाठवायचा झाल्यास संबंधित शेतीमालाला अत्यंत कठोर चाचण्यांतून जावे लागते. तरच भारतीय शेतीमालाला युरोप, अमेरिकेत प्रवेश मिळतो. सर्वच प्रगत देशांचे निकष असेच कठोर आहेत. आखाती, अरबी, आफ्रिकी देशांचे निकष बऱ्याच प्रमाणात शिथिल आहेत. त्यामुळेच आपल्या शेतीमालाला युरोप व अमेरिकेच्या बाजारपेठेत फारसे स्थान मिळत नाही. तुलनेने निकष कमी असल्यामुळे आशियाई, आखाती आणि आफ्रिकी देशांना आपला शेतीमाल, फळे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणावर जातो.

विश्लेषण: नोव्हेंबर महिन्यात केस कापायचे नाहीत? काय आहे ‘नो शेव नोव्हेंबर’ मोहीम? कधीपासून झाली सुरुवात?

युरोपीय महासंघाचे नवे नियम काय सांगतात?

युरोपीय महासंघाने आयात शेतीमालांबाबतचे आपले निकष आणखी कडक केले आहेत. आता नव्या नियमांनुसार फळे, भाजीपाला आणि शेतीमालातील कीडनाशकांचे अवशेष ०.०१ पीपीएम पेक्षा जास्त असता कामा नयेत, असे जाहीर केले आहे. या नव्या नियमांमुळे युरोपीय महासंघातील विशेषकरून द्राक्ष, डाळिंब, केळींच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जागतिक व्यापार संघटनेचे आयात- निर्यातीबाबत काही नियम आहेत. शेतीमाल आरोग्य स्वच्छतेविषयीचे (सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी) निकष व त्या संबंधीचे करार निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, विविध प्रकारचे मांस आदी पदार्थांचा समावेश आहे. या निकषांची अंमलबजावणी करूनच शेतीमालांची निर्यात करावी लागते.

तातडीने काय उपाययोजना करता येतील?

राज्य केळी, द्राक्षे, डाळिंब, चिक्कू आदी फळांसह विविध प्रकारच्या पालेभाज्यांच्या उत्पादनात आणि निर्यातीत आघाडीवर आहे. पण, या शेतीमालाचे उत्पादन करताना कीड, रोग, बुरशी तात्काळ आटोक्यात यावी, यासाठी अत्यंत जहाल (रसायनांचे प्रमाण जास्त असणे) कीड, बुरशीनाशकांचा वापर केला जातो. शेतकऱ्यांमध्ये जागृती करून कोणते रसायन, बुरशीनाशक मानवी शरीरास अपायकारक आहे. या बाबत माहिती देऊन. संबंधित औषधांच्या फवारण्या टाळता येतील. शिवाय औषधांच्या वेष्टनावर संबंधित औषधांमधील रसायनांचा अंश फळे, भाजीपाल्यांमध्ये किती दिवस टिकून राहतो, या बाबतचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असले पाहिजे. ज्या घातक रसायनांचा, औषधांचा वापर टाळणे शक्य आहे, अशा औषधांचा वापर टाळला पाहिजे. किंवा शेतकऱ्यांना हव्या असणाऱ्या पर्यायी औषधांची बाजारपेठेतील उपलब्धता वाढवली पाहिजे.

ग्राहकांनी काय करावे, काय करू नये?

निसर्गात वैविध्य आहे. ते आपण स्वीकारले पाहिजे. त्यामुळे द्राक्ष विकत घेताना शहरी ग्राहकांचा द्राक्षाच्या घडातील सर्व मणी एक सारखेच असावेत. रंग एक सारखाच असावा, असा आग्रह असतो, तो चुकीचा आहे. टोमॅटो खरेदी करताना सर्व टोमॅटो एकाच आकाराचे, एकाच आकर्षक रंगाचे खरेदी करण्याला शहरी ग्राहक प्राधान्य देतात. परंतु, हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. तरीही शहरी सुशिक्षित ग्राहकांकडून अशीच मागणी होते. नेमके हेच करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रसायने, औषधांचा वापर करतात. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या सवयीत बदल केल्यास शेतकरी आपोआप रसायनांचा वापर कमी करतील. शेतकऱ्यांनाही महागड्या औषधांवर खर्च करावा लागणार नाही, मानवी आरोग्यालाही अपाय होणार नाही.

dattatray.jadhav@expressindia.com