– पावलस मुगुटमल / भक्ती बिसुरे
उन्हाळ्यात भारताचा उत्तर-दक्षिण भाग तापू लागला की उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होते. उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने वारे वाहू लागल्यानंतर ते उष्णता घेऊन येतात. त्यावेळी महाराष्ट्र किंवा गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांत कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती असल्यास या राज्यांतही उष्णतेची लाट निर्माण होते. यंदाच्या हंगामात मार्चमध्येच दोन टप्प्यांत उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या, ही यंदाच्या उन्हाळ्यातील वेगळी बाब समजली जाते. मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीलाही उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता आहे. बर्फाळ आणि थंडगार प्रदेश असलेल्या जम्मू आणि हिमाचल प्रदेशातही उष्णतेच्या लाटा आहेत. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या उन्हाच्या चटक्यांची चर्चा आहे. पण, ही चर्चा गेल्या काही वर्षांत वैश्विक झाली आहे. अगदी पृथ्वीच्या उत्तर, दक्षिण ध्रुवापासून आपले राज्य, शहर आणि गावापर्यंत उष्णतेच्या लाटेचा धोका जाणवतो आहे.
आयपीसीसीचा अहवाल काय सांगतो?
‘इंटरगव्हर्नमेंट पॅनल ऑफ क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) या जागतिक संघटनेने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यानुसार वाढत्या उष्णतेबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर असलेली उष्णतेची लाट ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. उष्णतेची ही लाट तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या जगात अत्यंत टोकाच्या घटनांची नांदी ठरण्याची शक्यताही नोंदवण्यात येत आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी अंटार्क्टिकामध्ये विक्रमी ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक तापमानाची नोंद झाली. त्याच वेळी उत्तर ध्रुवाजवळील हवामान विभागांनी बर्फ वितळण्याच्या घटना नोंदवल्या. सर्वसाधारणपणे या मोसमात अंटार्क्टिकातील उन्हाळा संपल्यानंतर तिथे थंड हवामान अपेक्षित आहे. आर्क्टिकमध्ये हळूहळू थंडी कमी होत आहे. दोन्ही ध्रुवांवर एकाच वेळी वाढत असलेली उष्णता ही चिंतेची गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर मोरोक्कोच्या काही भागांत लागत असलेले वणवे ही सर्वांत भीषण घटना असल्याचेही आयपीसीसीने म्हटले आहे.
मानवी हस्तक्षेपाचा परिणाम?
दोन्ही ध्रुवांवर दिसणारी तापमानवाढ पृथ्वीच्या हवामानावर झालेले गंभीर दुष्परिणाम दर्शवते. लवकरच हे दुष्परिणाम दुरुस्त न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याचा इशाराही आयपीसीसीने दिला आहे. मानव जातीकडून पर्यावरणावर होणाऱ्या अतिरेकी हस्तक्षेपाचा हा परिणाम असल्याचे, तसेच ध्रुवीय प्रदेशात बर्फ वितळणे भविष्यात गंभीर परिणामांना निमंत्रण देणार असल्याचे आयपीसीसीने आपल्या अहवालात म्हटले आहे. आर्क्टिकमध्ये बर्फ वितळल्याने समुद्र उष्णता शोषून घेतो, त्यातून तापमान वाढ गंभीर होण्याची शक्यता आहे. अंटार्क्टिकचे बर्फ वितळल्याने समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा धोका आहे. या घटना ऐतिहासिक, अभूतपूर्व आणि नाट्यमय असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
शहरांची रचनाही कारणीभूत?
गेल्या ३० ते ४० वर्षांमध्ये भारतातही सिमेंटचे जंगल मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. काँक्रिटच्या मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. वातावरणात हवेचा दाब निर्माण झाल्यानंतर उन्हाळ्यात गरम हवा जमिनीलगत राहते. त्यामुळे तापमानात वाढ होते. काँक्रिटच्या इमारतींमुळे या तापमानवाढीत भरच पडते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये इमारतीचा दर्शनी भाग पूर्णपणे काचेचा करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे इमारतीचे सौंदर्य खुलत असले, तरी उष्णता वाढण्यासाठी ही बाब कारणीभूत ठरत असल्याचे अनेकांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे. सिमेंटच्या रस्त्यांमुळेही हाच परिणाम जाणवतो. म्हणून शहरापासून थोडे दूर हिरवळीच्या प्रदेशात गेल्यावर तेथे तापमान कमी असल्याचे जाणवते.
सर्वाधिक धोका कुणाला?
जगातील कोणताही भाग हवामान बदल आणि तापमान वाढीपासून सुरक्षित नाही. आयपीसीसीच्या म्हणण्यानुसार सध्याची तापमान वाढ अन्न आणि पाण्याच्या तुटवड्यालाही कारणीभूत ठरत आहे. झाडांपासून प्रवाळांपर्यंत अनेक गोष्टींच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. समुद्राच्या लगतचे भाग, लहान बेटे तापमान वाढीचा सामना करत आहेत. काही ‘इकोसिस्टिम्स’ची कर्बवायू शोषून घेण्याची क्षमता नष्ट होत आहे. भारतातही उष्णतेच्या तीव्र लाटांचे परिणाम दिसून येत आहेत. पाण्याचे साठे झपाट्याने कमी होत आहेत. महाराष्ट्रात यंदा आंब्याच्या पिकालाही या लाटेचा धोका आहे.
भारतातील स्थिती कशी राहणार?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मार्चची अखेर आणि एप्रिल महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासह उत्तर-पश्चिम भारतासाठी दाहक ठरण्याची चिन्हे आहेत. अनेक शहरांत तापमान ४० अंश किंवा त्यापुढेही जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश म्हटले, की बर्फ आणि थंडाव्याची अनुभूती आपोआपच येते. पण, उष्ण वाऱ्यांमुळे सध्या याही विभागांमध्ये उष्णतेची लाट आहे. त्याखालोखाल राजस्थानमध्ये उष्णतेची लाट असून, ती १ एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतही मार्चअखेरपर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट निर्माण होणार आहे.