Heatwave in India यंदाच्या एप्रिलमध्ये पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट नोंदवली गेली, यास हवामान बदल करणीभूत आहे. एका नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की, वातावरणातील बदलामुळे तापमान असामान्यपणे ४५ पटीने वाढले आहे. जर हवामानात बदल झाला नसता, तर तापमानात इतकी वाढ कदाचितच झाली असती, असेही या अभ्यासात सांगण्यात आले. हे सर्वेक्षण संशोधकांचा आंतरराष्ट्रीय गट ‘वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन’ने केला आहे. हवामान बादलामुळे भारतात उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये उष्णतेची लाट नोंदवली गेल्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. याच संशोधकांनी यापूर्वी दर्शविले होते की, २०२२ च्या मार्च-एप्रिल आणि २०२३ च्या एप्रिलमध्ये अति उष्णतेचे कारणदेखील हवामान बदलच होते.
विज्ञानामुळे माणसाने आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. याच विज्ञानामुळे आज हवामान बदलाच्या परिणामांचे अचूक मोजमाप करता येते. हवामान बदल ही एक जागतिक घटना आहे. गेल्या दोन दशकांत विकसित करण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे आणि पद्धतींमुळे हे सांगणे शक्य झाले आहे की, एखादी विशिष्ट घटना हवामान बदलामुळे झाली आहे की नाही. हवामान बदलाचा तापमानावर काय परिणाम होतो? दिवसेंदिवस तापमानात वाढ होण्याचे कारण काय? याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो? याबद्दल जाणून घेऊया.
भारतातील उष्णतेच्या लाटा
उष्णतेच्या लाटा उच्च तापमानाद्वारे परिभाषित केल्या जात नाहीत. ते तापमानातील अचानक होणार्या बदलांद्वारे परिभाषित केले जाते. उदाहरणार्थ, ज्या ठिकाणी साधारणपणे उन्हाळ्यात ४० अंश सेल्सिअस तापमान असते, त्या ठिकाणी तापमान ४२ किंवा ४३ अंशांपर्यंत वाढले तरीही उष्णतेची लाट आहे, असे म्हटले जात नाही. जर एखाद्या ठिकाणी उन्हाळ्यात साधारण तापमान २७ किंवा २८ अंश असेल आणि त्या भागातील तापमान अचानक ३५ अंशांवर जाऊन पोहोचल्यास उष्णतेची लाट असल्याचे जाहीर केले जाते.
उन्हाळ्यात उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटा सामान्य असतात. परंतु, हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होतात आणि त्यांचा कलावधीही वाढतो, हे दर्शवणारे बरेच पुरावे आहेत. गेल्या वर्षी देशातील अनेक भागांनी फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेची लाट अनुभवली. तांत्रिकदृष्ट्या बघितल्यास भारतात या महिन्यात हिवाळा ऋतु असतो. मात्र, मागीलवर्षी हिवाळ्यात फेब्रुवारी महिन्यातील कमाल तापमान सामान्यपेक्षा पाच ते ११ अंशांनी जास्त होते. तेव्हा उष्णतेची लाट असल्याचे घोषित करण्यात आले होते. याने भारतीय हवामान विभागाला (आयएमडी) अडचणीत आणले. कारण उष्णतेच्या लाटा फक्त एप्रिल-जुलै कालावधीत घोषित केल्या जातात. संपूर्ण देशासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारीचे सरासरी तापमान सामान्यपेक्षा १.३६ अंश सेल्सिअसने जास्त होते, ज्यामुळे फेब्रुवारी भारतातील दुसरा सर्वात उष्ण महिना ठरला. २०२३ हे वर्ष भारतासाठी दुसरे सर्वात उष्ण वर्ष असल्याचेही घोषित करण्यात आले.
या वर्षी उष्णतेच्या लाटेचा अंदाज अधिक भीषण होता. उन्हाळ्याच्या सुरुवातीस उष्णतेच्या लाटा अधिक जास्त कलावधीसाठी राहण्याची शक्यता होती. काही ठिकाणी नेहमीच्या चार ते आठ दिवसांऐवजी १० ते २० दिवसांपर्यंत उष्णतेच्या लाटेची नोंद करण्यात आली. अंदाजानुसार, ओडिशामध्ये एप्रिलमध्ये १८ दिवसांची उष्णतेची लाट नोंदवण्यात आली होती, ही राज्यासाठी आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी उष्णतेची लाट होती, असे क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन हवामान संशोधन संस्थेने एका विश्लेषणात नमूद केले आहे. मंगळवारी (१४ मे) आयएमडीने सांगितले की, गुरुवारपासून उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेची लाट उसळणार आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम
उष्णतेच्या लाटांचा कालावधी वाढल्यामुळे निर्जलीकरणाची मोठी समस्या उद्भवू शकते. मानवी शरीरावरदेखील याचे फार वाईट परिणाम होतात. उष्णतेच्या लाटेमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आणि श्वसनासंबंधीचे रोग होऊ शकतात. शरीरात कमकुवतपणाही वाढतो आणि अगदी अचानक मृत्यूदेखील होऊ शकतो. अति उष्णतेमुळे होणार्या आजारांची आणि मृत्यूच्या आकडेवारीची भारतात व्यवस्थितरित्या नोंद केली जात नाही. ही आकडेवारी संकलित करण्याचे प्रयत्न सुमारे एक दशकापूर्वीच सुरू झाले. परंतु, योग्य आकडे अद्यापही उपलब्ध नाहीत. भारतीय हवामान विभाग (आयएमडी), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) यांसारख्या विविध यंत्रणांनी नोंदवलेल्या आकड्यांमध्ये बराच फरक पाहायला मिळतो.
उदाहरणार्थ, आरोग्य मंत्रालयाने गेल्या वर्षी संसदेच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, २०२२ मध्ये केवळ ३३ जणांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. परंतु, एनसीआरबीने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये उष्णतेमुळे ७३० जणांचा मृत्यू झाला, तर आरोग्य मंत्रालयाने २०२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत २६४ जणांचा मृत्यू उष्णतेमुळे झाल्याचे सांगितले. राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनांनी उष्मा कृती योजना लागू केल्यापासून आयएमडीच्या आकडेवारीत उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती. मात्र, आता ही आकडेवारी वाढताना दिसत आहे. उष्णतेच्या लाटेच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे ही आकडेवारी वाढत असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : केजरीवालांचा आप पक्ष मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी; राजकीय पक्षाला आरोपी ठरवलं जाऊ शकतं का?
वाढत्या तापमानावर उपाय काय?
उष्णतेची तीव्र लाट नोंदवण्यात येणार्या सर्व २३ राज्यांमध्ये आता प्रतिकूल परिणामांचे व्यवस्थापन करण्यासाठी उष्णता कृती योजना आहे. सार्वजनिक ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन्सचे मोफत वाटप, गर्दीच्या वेळेत शाळा आणि महाविद्यालये बंद करणे आणि उद्यान व इतर छायांकित ठिकाणी प्रवेश देणे यांसारख्या सोप्या उपाययोजनांमुळे मोठ्या संख्येने लोकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, यासाठी अजून बर्याच गोष्टी आवश्यक आहेत. विशेषत: उष्णतेच्या लाटा अधिक प्रदीर्घ आणि तीव्र होत असल्याने स्थानिक प्रशासनाने बांधकामासारख्या क्षेत्रातही या उपाययोजना करायला हव्यात. शाळा आणि महाविद्यालयांप्रमाणेच कार्यालयाच्या वेळेतही बदल केला जाऊ शकतो.