-इंद्रायणी नार्वेकर

चहूबाजूंनी समुद्र आणि खोलगट बशीसारखा आकार अशा विशिष्ट भौगोलिक स्थितीमुळे मध्यम प्रमाणात पाऊस पडला आणि त्याचवेळी भरती असेल तर मुंबईच्या रस्त्यांवर पाणी तुंबते. मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असला की काही वेळा साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा भरतीच्या वेळी उसळतात. त्याचवेळी मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्यामुळे सखल भागात पाणी साचते. मुंबईतील नाल्यांमधून पावसाचे पाणी समुद्रात सोडले जाते. त्यासाठी असलेल्या १८६ पातमुखांपैकी (समुद्रात पाणी सोडण्यासाठीचे मार्ग) ४५ पातमुखे ही समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत, तर १३५ पातमुखे ही भरती पातळीच्या तुलनेत खाली आहेत. केवळ सहा पातमुखे उंचावर आहेत. त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात शिरते. त्यातच पाऊस पडत असला की पाणी वाढते. हिंदमाता, ग्रँटरोड, अंधेरी मिलन सबवे, गांधी मार्केट, शीव परिसर ही ठिकाणे हमखास पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या अन्य भागांतही लहान-मोठ्या परिसरात पाणी साचते. पण या ठिकाणी मोठा परिसर जलमय होतो व बराच वेळ साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. ताशी ६० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला तर मुंबईत हमखास पाणी साचते.

Chandrapur marathi news
चंद्रपूर : सफाई कामगार, शिल्पनिदेशक पदांसाठी ३५ हजारांची लाच, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
capacity of 200 e-bus charging stations in the ST fleet will also increase in one year
एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार
445 Anganwadis in Shahapur taluka in darkness due to lack of electricity connection
शहापूर तालुक्यातील ४४५ अंगणवाड्या वीज जोडणी अभावी अंधारात
diva vasai trains cancelled
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दिवा – कोपरदरम्यान वाहतूक ब्लॉक, दिवा – वसई रोड रेल्वेगाड्या रद्द करणार
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
underground Ulhasnagars old electricity system is fulfilled with 16 84 crore funding approved
उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती

उपाय योजना काय?

मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे हे ब्रिटिशकालीन आहे. त्याची क्षमता ताशी २५ मिमी पाणी वाहून नेण्याची आहे. पालिकेने २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीनंतर आणलेल्या ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत हाजीअली, ब्रिटानिया, क्लीव्हलॅण्ड, इर्ला, लव्हग्रोव्ह, गझदरबंध, मोगरा, माहूल या सहा उदंचन केंद्रात प्रचंड क्षमतेचे पंप बसवले आहेत. प्रतिसेकंदाला सहा लाख लीटर पाणी समुद्रात फेकण्याची या पंपांची क्षमता आहे. तसेच १० ठिकाणी असलेली छोटी उदंचन केंद्रे उभारली आहेत. पर्जन्यजल वाहिन्यांची क्षमता ताशी ५० मिमी पावसाचे पाणी वाहून नेण्यापर्यंत वाढवण्याचे काम अद्याप सुरू आहे. परंतु, मुंबईत तीन-चार तासात अडीचशे, तीनशे मिमी पाऊस पडत असल्यामुळे ही यंत्रणाही तोकडी पडते. हिंदमाता, मिलन सबवेसाठी अनेक खर्चिक उपाययोजना केल्यानंतर या वर्षी भूमिगत साठवण टाक्यांचा कोट्यवधी रुपयांचा प्रयोगही करण्यात आला. त्याची या पावसात कसोटी आहे. 

पाहा व्हिडीओ –

भरती-ओहोटीचा घटक का महत्त्वाचा?

भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून मागे येते व शहरात घुसते. त्यामुळे भरती असताना पर्जन्य जलवाहिन्यांचे दरवाजे (फ्लडगेट) बंद ठेवावे लागतात. अशा वेळी सहा उदंचन केंद्रातील पंपाद्वारे पाणी समुद्रात फेकले जाते. तसेच मुंबईत जिथे पाणी तुंबते अशा ठिकाणी छोटे मोटर पंप ठेवले आहेत. यावर्षी तब्बल ४७७ पंप बसवण्यात आले आहेत. या पंपाद्वारे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सोडले जाते. या संचाची क्षमता ताशी ६०, १२५, १७५, २४०, २५०, ४८० व १००० घनमीटर अशी आहे. पावसाळ्यात कधीकधी भरती-ओहोटीच्या पाणी पातळीत फारसा फरक नसतो. म्हणजे ओहोटीला पाणी फारसे ओसरत नाही. याला भांगाची भरती (निप टाईड) म्हणतात. अशा वेळी कित्येक तास पाण्याचा निचरा होत नाही.  

मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) केव्हा उघडतात?

मुंबईत ठिकाठिकाणी अनेक मॅनहोल आहेत. हे सर्व मॅनहोल विविध खात्यांशी संबंधित आहेत. पर्जन्यजल वाहिन्या खाते, मलनि:सारण खाते, मलनि:सारण प्रचालने खाते, जल अभियंता खाते, सांडपाणी यासारख्या महापालिकेच्या विविध खात्यांच्या मॅनहोलचे जाळे मुंबईत पसरलेले आहेत. भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे खोलवर असल्यामुळे या मॅनहोलवरील झाकणे उघडी राहिल्यास त्यातून जीवघेणा अपघात होऊ शकतो. डॉ. अमरापूरकर यांच्या अपघातानंतर पालिकेने सखल भागातील मॅनहोलच्या आतल्या बाजूस लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. जोरदार पावसाप्रसंगी सखल भागात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यास महानगरपालिकेचे कर्मचारी मॅनहोल उघडतात आणि तेथे धोक्‍याची सूचना देणारे फलक देखील लावतात. मात्र, कधीकधी नागरिक स्‍वतःहून झाकण उघडतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.

कचराही कारणीभूत?

रस्त्यावर असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साठल्यामुळे पाणी ओसरण्यास वेळ लागतो. पालिकेचे कर्मचारी हा कचरा सतत बाजूला करत असतात. परंतु, पाणी खूप साचले की हे झाकण उघडून पाणी वेगाने वाहून जाण्यास मार्ग करून देतात. पण त्यामुळे पाण्याबरोबर कचराही जलवाहिन्यांमध्ये वाहून जातो. हा कचरा उदंचन केंद्राच्या भव्य जाळ्यांमध्ये अडकल्यामुळे पंपांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांबरोबरच, गाद्या, उशा, लाकडी सामान असा वाटेल तो कचरा टाकला जातो. हा कचरा हेसुद्धा पाणी तुंबण्याचे कारण आहे.

Story img Loader