Dark History of Heeramandi एका गर्द काळोख्या रात्री त्याची आई किंचाळत होती. तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने शनवाज जागा झाला… शनवाज आवाजाच्या दिशेने आपल्या आईच्या बचावासाठी धावला. आणि समोर जे भयावह दृश्य त्याने पाहिले ते त्याच्या मनावर कामस्वरूपी कोरले गेले. त्याची आई अर्धनग्न अनस्थेत एका मारझोड करणाऱ्या पुरुषापासून स्वतःचा बचाव करत होती. या घटनेच्या अनेक वर्षांनंतर त्याची आई त्याच पुरुषाचे मनोरंजन करताना त्याला दिसली. त्यावेळी शनवाजला त्याच्या आईचे त्या पुरुषावर प्रेम असल्याचे समजले. परंतु हे सगळं इथेच थांबलं नाही. कालांतराने शनवाजच्या बहिणीचा जन्म झाला. शनवाजचे कुटुंब वेश्या व्यवसायाशी संबंधित होते. त्यामुळे साहजिकच त्याच्या बहिणीचा ‘लैला’चा जन्म हा त्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण होता. लैलाने ज्या वेळी बाराव्या वर्षात पदार्पण केले त्यावेळी हीरामंडीच्या समाजात मोठ्या उत्साहात तिचे स्वागत करण्यात आले. तिच्या कौमार्याचा लिलाव मांडण्यात आला. अखेर लैलाच्या कौमार्याचा लिलाव झाला. आणि ज्या पुरुषाने तिचे कौमार्य विकत घेतले, तो तोच होता ज्याने १२ वर्षांपूर्वी शनवाजच्या आईला मारझोड केली होती आणि त्याच्या आईचा तत्कालीन प्रियकर होता… शनवाजसाठी हे धक्कादायकच होते. या कथेचे तपशीलवार वर्णन फ्रेंच लेखक क्लॉडिन ले टूर्नर डी आयसन यांनी आपल्या ‘हीरामंडी’ (२००६) या कादंबरीत केले आहे.
हीरामंडीचे गडद सत्य
हीरामंडी या कादंबरीतील मुख्य कथानक हीरामंडी या जागेभोवती फिरते. या कथेत शनवाज हा वेश्या व्यवसायाशी संबंधित कुटुंबात जन्मलेला एक तरुण मुलगा आहे. या कथेत तो लाहोरच्या रेड लाइट डिस्ट्रिक्टमध्ये लहानाचा मोठा झाला. त्याच्या कथानकातून लेखकाने हीरामंडीचे गडद सत्य वर्णिले आहे. लाहोरच्या हीरामंडीमध्ये वेश्याव्यवसाय हा एक कौटुंबिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय आईकडून मुलीकडे बिनदिक्कत, उघड सोपवला जातो. संजय लीला भन्साळी यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्स वरील सिरीजमध्ये हीरामंडीचे जे ग्लॅमरस चित्रण करण्यात आलेले आहे, त्यापलीकडे या क्षेत्राचा खरा इतिहास बिभत्स आहे.
कधीकाळी समृद्ध पण आता …
कधीकाळी भरभराट अनुभवलेल्या लाहोरमधील हीरामंडीची अवस्था जीर्ण इमारती, बकाल वस्ती अशी झाली. हीरामंडी एकेकाळी मोठी समृद्ध बाजारपेठ होती. राजेशाही खेळाचे मैदान, कलाकार, वेश्या आणि गणिकांची घरं अशी हीरामंडीची ओळख होती. आज तिथले सज्जे ओस पडले आहेत, दुकाने अस्ताव्यस्त आहेत आणि बांगड्यांच्या सुरेल आवाजाची जागा आता मशिनच्या बेसूर आवाजाने घेतली आहे.
मुघल कलेचे चाहते….
मुघल कालखंडात हीरामंडीला महत्त्व आले. रुढीप्रिय इस्लामने नाच- गाणे निषिद्ध मानले तरी मुघल हे कलेचे चाहते होते. त्यांनी हजारो कलाकारांना शाही दरबारात मनोरंजनासाठी नियुक्त केले. द डान्सिंग गर्ल्स ऑफ लाहोर (२००५) या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ लुईस ब्राउन यांनी मुघलांनी गायन आणि नृत्य कला प्रतिष्ठेच्या मानल्याचे म्हटले आहे. १६ व्या ते १८ व्या शतकात मुघल राजवटीत नृत्य आणि वेश्याव्यवसाय या दोन्हींना परवानगी असल्याचे आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे वरिष्ठ सल्लागार रशीद मखदुम यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. याशिवाय बटीक ठेवण्याची परंपरा इस्लामिक संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे, ती जरी पत्नी नसली तरी तिला कुटुंबाचे महत्त्वाचे अंग मानले जाते असे रशीद मखदुम सांगतात.
तवायफ अनेक कलांमध्ये पारंगत तरीही स्वतंत्र
तवायफ या नृत्य, गायन आणि इतर सांस्कृतिक कलांमध्ये प्रशिक्षित होत्या. इतिहासकार प्राण नेव्हिल यांनी नॉटच गर्ल्स ऑफ द राज (२००९) मध्ये मुघल काळात तवायफशी संबंधित असणे हे दर्जा, संपत्ती, सुसंस्कृतपणा आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जात होते, असे म्हटले आहे. त्या काळच्या गणिका देखील स्वतंत्र स्त्रिया होत्या. १८५८ ते १८७७ या काळात लखनऊच्या नागरिक नोंदीवरून त्यांच्या सामर्थ्याची आणि सामाजिक गतिशीलतेची जाणीव होऊ शकते, त्याकाळी तवायफ हा सर्वात मोठा आणि सर्वाधिक कर भरणारा वर्ग होता. बहुसंख्य घरंदाज स्त्रियांना संपत्ती ठेवण्याची किंवा संपत्ती मिळवण्याची परवानगी नव्हती, परंतु मुघल काळात गणिका आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत्या, त्यांच्या जीवनावर आणि निवडींवर त्यांचे नियंत्रण होते.
अहमद शाह दुर्रानीचे आक्रमण आणि दुर्दशा
१८ व्या शतकाच्या पूर्वार्धात, अहमद शाह दुर्रानी याच्या नेतृत्वाखालील अफगाण आक्रमणांमुळे पंजाबमधील मुघल सत्ता कमकुवत झाली. अफगाण राजवटीत, तवायफचे शाही प्रायोजकत्व संपुष्टात आले. परंतु पारंपरिक उपपत्नी (concubine) संस्कृतीने वेश्याव्यवसायाला दुसरा मार्ग दिला. दुर्राणीच्या मृत्यूमुळे लाहोर शीख साम्राज्याचे पहिले महाराजा रणजित सिंग यांच्या हाती पडले, त्यांनाच शेर-ए-पंजाब (पंजाबचा सिंह) म्हणून ओळखले जाते.
रणजित सिंग आणि मोरन प्रेमकथा
मुघल राजवटीच्या पडझडीतून तवायफ संस्कृती कधीच सावरली नाही, पण शिखांच्या अधिपत्याखाली या संस्कृतीचे थोडेसे पुनरुत्थान झाले. रणजित सिंग स्वतः मोरन सरकार नावाच्या एका मुस्लिम नृत्यांगनेच्या प्रेमात पडले होते आणि तिच्या वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी तिच्याशी लग्न करून सामाजिक रोष ओढवून घेतला. मोरन हिचे अस्तित्त्व बहुतेक ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये दिसत नाही परंतु लाहोरच्या शाह आलमी गेटच्या आत असलेल्या पापर मंडी भागात तिला दफन करण्यात आल्याने तिच्या ऐतिहासिक उपस्थितीची साक्ष मिळते. प्रचलित कथेनुसार, एके दिवशी मोरन भारत-पाक सीमेवरील पुल कंजरी या गावात नृत्याच्या कार्यक्रमासाठी जात होती, तेव्हा तिचा बूट कालव्यात पडला. संतापलेल्या मोरनने कालव्यावर पूल बांधला जाईपर्यंत कार्यक्रम करण्यास नकार दिला. त्यामुळे सिंग यांनी या कालव्यावर पूल बांधून घेतला. पुल मोरान नावाचा पूल आजही त्या ठिकाणी उभा आहे.
मुक्त वावर
कालांतराने लाहोर हे रात्री घडणाऱ्या घटनांचे केंद्र झाले. पंजाबी सेंच्युरी (२०२३) मध्ये, इतिहासकार प्रकाश टंडन लिहितात, “हिरा मंडी दिवसा शांत आणि निर्जन होत असे, परंतु सूर्य मावळल्यानंतर ती झगमगून निघत असे” त्यांनी म्हटल्याप्रमाणे या मुलींचे आयुष्य संध्याकाळी सुरु होत असे. सायंकाळी त्या सजून नटून तयार असत. आणि पुढे आई किंवा मालकिणीच्या सूचनांची वाट पाहत. सुट्टीच्या दिवसांत त्या काश्मीरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंत करत, परंतु यावेळी त्यांची राहणी सामान्य गृहिणीप्रमाणे असे. जेएनयू मधील इतिहासच्या प्राध्यापिका लता सिंग यांनी व्हिजिबिलायझिंग द ‘अदर’ इन हिस्ट्री (२००७) या लेखात या स्त्रियांच्या सामाजिक दर्जाविषयी लिहिले आहे. या महिलांना लक्षणीय सामाजिक दर्जा लाभला होता. त्या संगीतकार आणि नर्तकांना प्रशिक्षण देण्याकरिता मोठी केंद्र चालवत होत्या. विशेष म्हणजे इतर साफसफाई किंवा तत्सम काम करण्यासाठी त्या महिलांऐवजी पुरुषांची नेमणूक करत असत. तर मुलींना गायन आणि नृत्यकलेच्या प्रशिक्षणासाठी घेतले जात होते.
हीरामंडी हे नाव कसे आले?
लाहोरच्या रेड लाईट डिस्ट्रिक्टला सध्याचे नाव शीख राजवटीत मिळाले होते. रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर, शीख साम्राज्याचे पंतप्रधान हिरा सिंग डोग्रा यांनी शाही मोहल्ला आर्थिक केंद्र, खाद्य बाजार म्हणून वापरले जाऊ शकते असा विचार मांडला. हिराने स्थापन केलेला धान्य बाजार ‘हिरा सिंग दी मंडी’ (हिरा सिंगचा बाजार) म्हणजेच हिरा मंडी म्हणून ओळखला जाऊ लागला. अनेक लोक हिरा मंडी या शब्दाचा संबंध उर्दूशी जोडतात. डायमंड मार्केट हे तिथे राहणाऱ्या स्त्रियांच्या सौंदर्याचे सूचक आहे, असे ते सांगतात.
पारंपरिक व्यावसायिक नर्तिका
१८४९ साली पंजाबवरील शीखांवरील वर्चस्वामुळे ईस्ट इंडियन कंपनीला या भागात पाय पसरण्यासाठी मार्ग मिळाला. व्हिक्टोरियन काळातील पुराणमतवादानेही हीरामंडीच्या ऱ्हासात मोठी भूमिका बजावली होती. नेव्हिलच्या म्हणण्यानुसार, ब्रिटीशांनी “कुशल व्यावसायिक पारंपरिक नर्तिका मुली किंवा देवदासी आणि सामान्य वेश्या यांच्यात कोणताही भेद केला नाही, दोघांना पतित स्त्रिया म्हणून संबोधले (संदर्भ: नॉच गर्ल्स ऑफ द राज, प्राण नेव्हिल, पेंग्विन इंडिया, २००९). ब्रिटीश सुधारक आणि ख्रिश्चन मिशनरीनीं या स्त्रियांशी संबंध निषिद्ध मानला (संदर्भ: द राँग्स ऑफ इंडियन वुमनहूड (१९००) : मार्कस फुलर). याच परिस्थितीतून तवायफ या प्रकारातून कला वर्ज्य होऊन फक्त वेश्याव्यवसाय मागे शिल्लक राहिला. शो गर्ल्स ऑफ पाकिस्तान (२०१०) या लघुपटाचे दिग्दर्शक साद खान सांगतात, ब्रिटीशांनी त्यांची सामाजिक श्रेष्ठता दाखविण्याच्या आणि मुघल दरबाराचा वारसा कमी करण्याच्या प्रयत्नात हीरामंडीतून पारंपारिक नृत्य सादरीकरणाचा सांस्कृतिक पैलू काढून टाकला आणि फक्त शिल्लक राहिला तो वेश्या व्यवसाय. म्हणूनच ब्रिटीशांच्या काळात हीरामंडी वेश्याव्यवसायाची गुहा म्हणून ओळखली जाऊ लागली. ब्रिटीश जनरल हेन्री माँटगोमेरीच्या शब्दात सांगायचे झाले तर “थकलेल्या सज्जन सैनिकांसाठी आवश्य आनंद” मिळवण्याची जागा ठरली. मखदुम म्हणतात १९१४ साली इंग्रजांनी लाहोर किल्ल्यातील चौकीमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना सेवा देण्यासाठी हीरामंडी येथे वेश्यालयाची स्थापना केली. अशा प्रकारे हीरामंडी आणि तवायफ संस्कृतीचे वेश्याव्यवसायात परिवर्तन सुरू झाले.
सिनेमाक्षेत्राकडे वाटचाल
१९५० च्या दशकात, नृत्य करणाऱ्या मुलींना पाकिस्तानी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कलाकार म्हणून कायदेशीर मान्यता देण्यात आली होती, त्यांना दररोज संध्याकाळी तीन तासांपर्यंत सादरीकरण करण्याची परवानगी होती. हीरामंडीने परफॉर्मिंग आर्ट्ससाठी आपली संस्कृती टिकवून ठेवली आणि पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध सिनेतारे निर्माण केले. या कालखंडात करमणुकीसाठी कला उच्च वर्गातील स्त्रिया करत नसत त्यामुळे हीरामंडीचे पारंपारिक कलाकार व्यावसायिक गायक आणि नर्तक झाले. नूरजहाँ, मुमताज शांती आणि खुर्शीद बेगम यांसारख्या कलाकारांना आताच्या कुप्रसिद्ध परिसरातच प्रशिक्षण देण्यात आले होते. असे असले तरी आता मात्र हीरामंडीची रया पूर्णतः गेली आहे, अनेक समाजसुधारक, कलाप्रेमी येथील महिलांसाठी कार्यरत असले तरी मागे फक्त इतिहास शिल्लक राहिला आहे.