मध्यंतरी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या अहवालात उघड करण्यात आले होते की, दर दिवशी हेपिटायटिस या आजारामुळे ३,५०० लोक मृत्युमुखी जातात. आता केरळ राज्यात हेपिटायटिस ए रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केरळमधील हेपिटायटिस एच्या उद्रेकाने देशभरात चिंतेचे वातावरण आहे. याचा विषाणूजन्य संसर्ग प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाणी किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास होतो. त्यामुळे आरोग्य अधिकार्यांसह लोकांमध्ये चिंता वाढली आहे.
पहिल्या साडेचार महिन्यांत राज्यात हेपिटायटिस एची १,९७७ प्रकरणे आणि १२ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी काळजीत आहेत. त्यांना भीती आहे की, हा सर्वांत वाईट उद्रेक असू शकतो. केरळ राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी बुधवारी (१६ मे) कोझिकोड, मलप्पुरम, त्रिशूर व एर्नाकुलम या चार जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला. या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हेपिटायटिस एचा विषाणू चिंतेचे कारण का ठरत आहे? याची लागण कोणाला होऊ शकते? याची लक्षणे काय? आणि हेपिटायटिस एचा संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घेता येईल? याबद्दल जाणून घेऊ या.
हेही वाचा : युक्रेन युद्धादरम्यान पुतिन आणि जिनपिंग यांची भेट; या भेटीचा नेमका अर्थ काय?
हेपिटायटिस ए कसा पसरतो?
‘अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन’ (CDC) नुसार, हेपिटायटिस ए हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. हेपिटायटिस ए विषाणू अनेक महिने जगू शकतो. तुमच्या यकृतावर मोठ्या प्रमाणात या विषाणूचा परिणाम होतो. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे यकृत सुजते; ज्याचा अर्थ हेपिटायटिस असा होतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये, विषाणूजन्य संसर्गामुळे यकृताच्या पेशींचेही नुकसान होऊ शकते; ज्यामुळे प्रत्यारोपणाची गरज निर्माण होते. सर्वांत वाईट प्रकरणांमध्ये मृत्यूदेखील होऊ शकतो, असे डॉ. पीयूष रंजन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिले.
हेपिटायटिस ए सामान्यत: अशा भागात पसरतो; जेथे स्वच्छतेचा अभाव आणि अन्न व पाणी दूषित असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, संक्रमित मल असलेल्या सांडपाण्यातील पाणीपुरवठ्यामुळे पाण्यातून हेपिटायटिस एचा प्रसार होऊ शकतो. १९५४ मध्ये दिल्ली आणि १९८८-९० मध्ये कानपूरमध्ये असे उद्रेक आढळून आले. “हेपिटायटिस ए हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित व्यक्तींच्या विष्ठेद्वारे पसरतो. अनेक ठिकाणी गळती झालेल्या पाण्याच्या पाइपलाइन कचऱ्याच्या संपर्कात येतात. त्यामुळे पाणी दूषित होते,” असे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. एन. एम. अरुण यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. अलीकडच्या वर्षांत राज्यातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शारीरिक संपर्कातून संसर्ग
एर्नाकुलम जिल्ह्यातील वेंगूर हा सर्वांत जास्त प्रभावित जिल्हा आहे. पंचायत अध्यक्ष शिल्पा सुधीश यांनी सांगितले की, राज्य जल प्राधिकरणाने पुरविलेल्या दूषित पाण्यामुळे हा उद्रेक झाल्याचे आरोग्य विभागाला आढळून आले आहे. १७ एप्रिलपासून जिल्ह्यातील सुमारे २०० व्यक्तींना याचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. ‘क्लीव्हलँड क्लिनिक’नुसार, हेपिटायटिस ए जवळच्या व्यक्तीच्या शारीरिक संपर्कातूनही पसरू शकतो; ज्यामुळे या आजाराच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या विषाणूच्या वाढत्या धोक्याचे व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. “या जिल्ह्यांमध्ये आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. सर्व बाधित भागांतील पाण्याचे स्रोत क्लोरिनद्वारे स्वच्छ केले जात आहेत आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना फक्त उकळलेले पाणी देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, भोजनालयांचीही तपासणी केली जात आहे.
‘हेपिटायटिस ए’ संक्रमितांना जाणवणारी लक्षणे
‘क्लीव्हलँड क्लिनिक’नुसार हेपिटायटिस ए संक्रमितांना जाणवणारी लक्षणे खालीलप्रमाणे:
-पोटदुखी, विशेषत: उजव्या भागात
-भूक न लागणे
-मळमळ आणि उलट्या
-अतिसार
-अशक्तपणा आणि थकवा
-ताप
-कावीळ (तुमची त्वचा, नखे व डोळे पिवळसर होणे)
-सांधेदुखी
-त्वचेला खाज सुटणे
-गडद लघवी आणि फिकट रंगाची विष्ठा
हेपिटायटिस ए कधी कधी पुन्हा होतो. म्हणजे काही प्रकरणांमध्ये नुकतीच बरी झालेली व्यक्ती या संसर्गाने पुन्हा आजारी पडते.
कोणाला धोका आणि का?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सामान्यतः हेपिटायटिस एचा संसर्ग प्रामुख्याने बालपणात होतो आणि बहुतेक मुलांमध्ये सहसा लक्षात येण्यासारखी लक्षणे आढळत नाहीत; फक्त १० टक्के मुलांना कावीळ होतो. अलीकडे झालेल्या उद्रेकामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सामान्यतः १५ वर्षांखालील मुलांना प्रभावित करणाऱ्या हिपॅटायटिस एचा संसर्ग वृद्ध व्यक्तींनादेखील होत आहे. वृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांच्यात गंभीर लक्षणे विकसित होण्याची अधिक शक्यता असते. जरी हेपिटायटिसचा प्रादुर्भाव सामान्य असला तरी कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असणार्यांसाठी आणि एचआयव्ही किंवा यकृताचे आजार असणार्या व्यक्तींसाठी ही चिंतेची बाब आहे.
स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?
या विषाणूजन्य संसर्गापासून स्वतःला वाचविण्याचा मार्ग म्हणजे लसीकरण. लसीकरणाच्या वेळी एक तर स्वतंत्र हेपिटायटिस एची लस किंवा हेपिटायटिस ए व हेपिटायटिस बी या दोन्ही लसी एकत्रित घेता येतात. हेपिटायटिस ए या लसीचे दोन डोस असतात. त्यात सहा महिन्यांचे अंतर असते. दरम्यान, १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना हेपिटायटिस ए व हेपिटायटिस बी या दोन्ही लसी एकत्रित घेता येतात, ज्या सहा महिन्यांत तीन डोसमध्ये दिल्या जातात.
या संसर्गापासून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही स्वच्छतेचे पालन करायला हवे..
-खाण्यापूर्वी किंवा पाणी पिण्याआधी आणि शौचालय वापरल्यानंतर आपले हात साबण आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
-पाणी शुद्धीकरण करणारी यंत्रे विषाणूमुक्त पाणी देऊ शकत नाहीत म्हणून पाणी उकळूनच प्या.
हेही वाचा : वकिलाने खटला नीट न चालविल्यास गुन्हा दाखल करता येतो का?सर्वोच्च न्यायालय काय म्हणते?
-रेस्टॉरंटमधील पेयांमध्ये बर्फाचे तुकडे वापरणे टाळा. कारण- बर्फ तयार होण्यासाठीही पाण्याचाच वापर होतो.
-अस्वच्छ भागात सोललेली किंवा कच्ची फळे आणि भाज्या खाणे टाळा.
-तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि कचरा व सांडपाण्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावा.