देशामध्ये सणासुदीचा काळा सुरु झाला असून करोनासंदर्भातील काळजी घेत हळूहळू बाजारपेठा सुरु होत आहेत. दुकानांमध्ये पुन्हा पुर्वीसाठी गर्दी हळूहळू वाढू लागली आहे. लोक जोरदार खरेदी करताना दिसत आहेत. मात्र पुन्हा बाजारपेठा सुरु झालेल्या असतानाच ग्राहकांना काही समस्यांचा समानाही करावा लागत आहे. अशाच समस्येपैकी एक आहे सुट्ट्या पैश्यांची चणचण. सामान्यपणे जेव्हा ग्राहक सामान खरेदी करतात त्यानंतर सुट्टे पैसे खास करुन एक, दोन रुपये नसल्यास ग्राहकांना त्या किंमतीचे चॉकलेट देतात. यावरुन अनेकदा ग्राहक आणि दुकानदारांमध्ये वादही होतात. मात्र आता अशाप्रकारे पैशांच्या ऐवजी चॉकलेट देणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. देशामध्ये नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू होत असून आता सुट्ट्यांच्या मोबदल्यात चॉकलेट देणाऱ्या दुकानदारांविरोधात रितसर तक्रार करता येणार आहे.
सामान्यपणे सुट्टे पैसे नसल्यावर आणि दोन किंवा पाच रुपयांची नाणी नसल्यास दुकानदार ग्राहकांच्या हातात एखादे चॉकलेट किंवा कॅडबरी टेकवतात. ग्राहकांनी पैसे मागितल्यास सुट्टे नाही असं सांगून दुकानदार वेळ मारुन नेतात. अगदीच ओळखीचा दुकानदार असेल तर दुसरी वस्तू घ्या किंवा पुढील वेळेस कमी पैसे द्या असं सांगतात. मात्र अशी वागणूक देणाऱ्या दुकानदारांविरोधात ग्राहकांनी तक्रार केल्यास ते अडचणीत येऊ शकतात.
अशाप्रकारच्या समस्यांची तक्रार करण्यासाठी सरकारने एक पाऊल उचललं आहे. ग्राहकांना तक्रार करण्यासाठी आता भारत सरकारने आपल्या jagograhakjago.gov.in आणि consumerhelpline.gov.in या दोन साईटवर तक्रार करता येणार आहे. याशिवाय ग्राहकांना 1800 11 4000 या तसेच 14404 या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदवता येणार आहे. याचप्रमाणे ग्राहक 8130 0098 09 या मोबाईल क्रमांकावर एसएमएसच्या मदतीने दुकानदाराविरोधात तक्रार नोंदवू शकतात.
काही वर्षांपू्र्वी हरयाणा सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसेसमध्ये सुट्ट्यांऐवजी चॉकलेट देण्याचं प्रकरण चांगलच गाजलं होतं. हरयाणा सरकारने या संदर्भातील तक्रारी वाढल्यानंतर या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई केली होती. यानंतर सरकारने बस चालकांना असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासंदर्भात इशारा दिला होता. तसेच अशाप्रकारे चॉकलेट देणाऱ्यांविरोधात प्रवाशांनी तक्रार करावी यासाठी सरकारने सोयही उपलब्ध करुन दिली होती.