दिल्ली पर्यटन खात्याकडून घेण्यात येणाऱ्या हेरिटेज वॉकच्या यादीत दिल्लीतील सर्वात झपाटलेल्या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. ऐकायला थोड विचित्र वाटत असले तरी दिल्लीतील अनेक ऐतिहासिक वास्तू त्यांच्या इतिहासापेक्षा ‘ऐतिहासिक भूतांनी पछाडलेल्या’ असल्याच्या समजुतीमुळे अधिक प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे हे सगळे हेरिटेज वॉक रात्रीच्या अंधारात होणार आहेत. त्यामुळेच अनेक पर्यटकांमध्ये यासारख्या हेरिटेज वॉक विषयी स्वारस्य असल्याचे लक्षात येते. दिल्ली पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक टप्प्यात या हेरिटेज वॉकची सुरुवात चाणक्यपुरीजवळील १४ व्या शतकातील ‘मालचा महल’ पासून करण्यात येणार आहे. त्यानंतर भूली भटियारी का महल, फिरोजशाह कोटला, तुघलकाबाद किल्ला यासारख्या रहस्यमय कथा असलेल्या ठिकाणांचा यथावकाश समावेश होणार आहे. मुळात म्हणजे अशा स्वरूपाचे हेरिटेज वॉक लोकाग्रहास्तव सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पर्यटकांनी अशा स्वरूपाच्या झपाटलेल्या वास्तूंच्या कथांमध्ये विशेष रस दाखविल्याने या स्वरूपाच्या हेरिटेज वॉकस् चे आयोजन करण्यात आले आहे. अद्याप संशोधक व आयोजक यांच्याकडून वास्तूंच्या गूढ, अनभिज्ञ पैलूंविषयी शोध घेणे सुरू आहे. त्यामुळे केवळ रंजकता कशी वाढेल याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. किंबहुना सहभागींसाठी काय करू नये व काय करता येवू शकते यासाठीही काही धोरण, निश्चित करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक हेरिटेज वॉकमध्ये केवळ २० सदस्यांना प्रवेश असून त्यांना देण्यात येणारा एक मार्गदर्शक असा चमू असणार आहे. सोबत त्यांना एक टॉर्च, काठी, ब्रॆण्डिंग असलेली बॅग, पर्यटन विभागाचे नाव असलेली कॅप, एक बिल्ला आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे. अशा स्वरूपाचे हेरिटेज वॉक प्रथमच इतक्या उघडपणे करण्यात येत आहे. या स्वरूपाचे हेरिटेज वॉक पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील काही ऐतिहासिक झपाटलेल्या वास्तूंच्या मागे नेमके कोणते गूढ दडलेले आहे ते जाणून घेणे मनोरंजक ठरेल. यात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. जिज्ञासा हा मनुष्याचा मूलभूत गुण आहे. म्हणूनच गूढ, अकल्पित कथा, सिनेमा ऐकण्याकडे- वाचनाकडे अधिक भर असतो. व त्याच प्रमाणे रहस्यमय कथा असणाऱ्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तशाच प्रकारची उत्सुकता इच्छुकांमध्ये दिसते असे निरीक्षण एका सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा