इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील शत्रूत्व जुने आहे. त्यांच्यातील संघर्षामुळे आजवर अनेकांचा जीव गेलाय. नुकतंच लेबनॉनमधील पेजर आणि रेडिओ हल्ल्यानंतर हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या हल्ल्यावर हिजबुल प्रमुख हसन नसराल्लाह यांनी नाराजी व्यक्त करत इस्रायलला कडक शब्दांत इशारा दिला आहे. हसन नसराल्लाह पश्चिम आशियातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. ते १९९२ पासून लेबनॉनमधील शिया दहशतवादी गट आणि राजकीय पक्ष हिजबुलचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हिजबुल हा स्थानिक दहशतवादी गट एक महत्त्वपूर्ण राजकीय आणि लष्करी शक्ती ठरला आहे. लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशात त्यांचा मजबूत प्रभाव आहे. कोण आहेत हसन नसराल्लाह? त्यांनी इस्रायलला कोणता इशारा दिला आहे? हसन नसराल्लाह यांचे लेबनॉनमध्ये किती महत्त्व आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
पेजर हल्ल्यामुळे संघर्ष वाढणार?
पेजर, रेडिओ आणि वॉकी-टॉकीसह समूहाच्या पायाभूत सुविधांवर अलीकडील हल्ल्यांना प्रतिसाद म्हणून नसराल्लाह यांनी गुरुवारी इस्रायलला इशारा दिला. या हल्ल्यांचे ‘तीव्र धक्का’ असे वर्णन करून नसराल्लाह यांनी इस्रायलवर मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप केला आणि कडक शब्दांत सांगितले की, गाझा संघर्षाचे निराकरण होईपर्यंत इस्रायली त्यांच्या घरी परतणार नाहीत. आपल्या भाषणात ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांत झालेल्या हल्ल्याची न्याय्य शिक्षा निश्चितच दिली जाईल. हिजबुल पुन्हा संघर्ष करेल, हिजबुल हल्ल्यांमुळे गुडघे टेकणार नाही. हिजबुलला कितीही मोठा फटका बसला तरी या हल्ल्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असे नसराल्लाह यांनी सांगितले. हिजबुलवर झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत किमान ३७ लोकांचा मृत्यू आणि तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे हिजबुल आणि इस्रायल यांच्यातील जवळपास वर्षभर चाललेला तणाव आणि सुरू असलेला संघर्ष पेटण्याची भीती वाढली आहे.
हेही वाचा : ‘सायलेंट सॅकिंग’ म्हणजे काय? ॲमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी याचा वापर का करत आहे?
कोण आहेत सय्यद हसन नसराल्लाह?
हसन नसराल्लाह यांचा जन्म १९६० साली लेबनॉनमधील बेरूत येथे एका गरीब शिया कुटुंबात झाला. धर्मातील स्वारस्यामुळे त्यांना इराकमधील नजफ येथील शिया सेमिनरीमध्ये शिकण्यास पाठविण्यात आले. ते सेमिनरीमधील सय्यद मुसा सदर यांसारख्या प्रमुख धर्मगुरूंनी प्रभावित होते. १९७५ मध्ये सुरू झालेल्या लेबनीज गृहयुद्धाचा नसराल्लाह यांच्या जीवनावर परिणाम झाला. ते पूर्वी शिया मिलिशियामध्ये सामील झाले आणि त्यानंतर इस्रायल आणि पाश्चात्त्य प्रभावाला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिजबुल संघटनेत सामील झाले.
१९९२ मध्ये, हिजबुलचे तत्कालीन नेते सय्यद अब्बास मुसावी यांची इस्रायली सैन्याने हत्या केली, त्यानंतर नसराल्लाह यांनी या संघटनेचा पदभार हाती घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, हिजबुलने आपली लष्करी क्षमता आणि राजकीय प्रभाव वाढवला आणि लेबनॉनमधील हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला. २०१८ च्या संसदीय निवडणुकीत, हिजबुलला ३,४०,००० हून अधिक मते मिळाली. लेबनॉनच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही पक्षासाठी ही मते सर्वाधिक होती.
नसराल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुलचा विकास
नसराल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुलची लष्करी ताकद बरीच वाढली आहे. २०२१ च्या भाषणात, नसराल्लाह यांनी दावा केला की हिजबुलकडे १ लाख लढवय्ये आहेत; ज्यामुळे ते जागतिक स्तरावर सर्वात शक्तिशाली सशस्त्र गटांपैकी एक ठरले आहेत. हा केवळ त्यांच्याकडील लष्करी सामर्थ्याचा परिणाम नाही तर प्रदेशात विशेषतः इराण आणि सीरिया यांच्याशी असलेल्या सामरिक युतीचाही परिणाम आहे. इराण, सीरियन सरकार, हमास आणि इस्लामिक जिहादसारखे पॅलेस्टिनी गट, येमेनमधील हुथी आणि अनेक इराकी मिलिशिया यांच्यावर मोठ्या प्रमाणात हिजबुलचा प्रभाव आहे. हे सर्व गट, संघटना इस्रायलच्या विरोधात एकत्र आले आहेत. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, गल्फ कोऑपरेशन कौन्सिल आणि अरब लीगच्या बऱ्याच देशांमध्ये हिजबुल दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते.
इस्रायलबाबत नसराल्लाह यांची भूमिका काय?
नसराल्लाह यांच्या नेतृत्वाखालील हिजबुल सातत्याने इस्रायलशी संघर्ष करत आहे. आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि रॉकेट हल्ल्यांसह गटाच्या गनिमी युद्धाच्या रणनीतींमुळे ते इस्रायलला तोंड देणारे सर्वात शक्तिशाली विरोधकांपैकी एक ठरले आहे. २००६ चे लेबनॉन युद्ध हे याचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. त्या युद्धात हिजबुलच्या प्रतिकारामुळे ३३ दिवसांचा संघर्ष झाला; ज्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. हे युद्ध संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामाने संपले, परंतु यामुळे एक शक्तिशाली नेता म्हणून नसराल्लाह यांची प्रतिष्ठा आणखी वाढली.
नसराल्लाहदेखील राजकारणात गुंतले आहेत का?
नसराल्लाह यांचा प्रभाव लष्करी संघर्षापलीकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लेबनीज राजकारणात हिजबुल एक प्रमुख खेळाडू ठरला आहे. अधिकृत सरकारी संस्था नसतानाही, लेबनॉनच्या राजकीय घडामोडींमध्ये हिजबुलचा मोठा प्रभाव आहे. १९९२ पासून लेबनॉनच्या संसदीय निवडणुकांमध्ये या गटाच्या सहभागाने एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून त्याचे स्थान मजबूत केले आहे. २०१८ च्या संसदीय निवडणुकीत, हिजबुलला ३, ४०,००० हून अधिक मते मिळाली होती, जी १९४३ मधील देशाच्या स्वातंत्र्यानंतर लेबनॉनमधील कोणत्याही राजकीय पक्षाने मिळवलेली सर्वाधिक मते होती. प्रादेशिक संघर्षांमध्ये, विशेषत: सीरिया आणि येमेनमधील हिजबुलच्या सहभागानेही या संघटनेचे महत्त्व वाढवले आहे. सीरियामध्ये, गृहयुद्धादरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना हिजबुलने समर्थन दिले; ज्यानंतर हिजबुलवर टीका झाली. परंतु, असद यांच्या पतनाने या प्रदेशातील हिजबुलची स्थिती कमकुवत होईल, असा युक्तिवाद करून नसराल्लाह यांनी हस्तक्षेपाचे समर्थन केले.
नसराल्लाह यांची इस्रायलबाबतची भूमिका कायम आहे. हमाससारख्या इतर गटांबरोबर मिळून इस्त्रायली राज्याचा नाश करण्याचा त्यांनी सातत्याने इशारा दिला आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या २००६ च्या मुलाखतीत, नसराल्लाह यांनी स्पष्ट केले की, लेबनॉनवरील इस्रायली हल्ले आणि व्यापक अरब-इस्त्रायली संघर्षाने मला आणि माझ्या साथीदारांना हे शिकवले की, आमच्याकडे शस्त्रे उचलणे आणि लढणे हा एकमेव मार्ग आहे.
गाझा युद्धावर नसराल्लाह काय म्हणाले?
अलिकडच्या वर्षांत, नसराल्लाहने या प्रदेशात हिजबुलच्या भूमिकेवर जोर दिला आहे. चालू असलेल्या इस्रायल-गाझा संघर्षादरम्यान, नसराल्लाह यांनी गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या आकस्मिक हल्ल्याचे त्यांनी कौतुक केले. “आम्ही हे ११ महिन्यांपासून म्हणत आहोत. त्याग, परिणाम किंवा भविष्यातील शक्यता काहीही असो, आम्ही गाझाला पाठिंबा देणे थांबवणार नाही.” इस्रायल आणि हिजबुल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. ताज्या अहवालानुसार, ७५ नागरिकांसह ३९० लेबनीज २० इस्रायली मारले गेले आहेत. याव्यतिरिक्त, अंदाजे ९० हजार लेबनीज आणि ८० हजार इस्रायली हिंसाचारामुळे विस्थापित झाले आहेत.
हेही वाचा : राजस्थानच्या सहाय्यक जिल्हाधिकारी चुकीच्या शस्त्रक्रियेचा बळी? कोण होत्या प्रियांका बिश्नोई?
नसराल्लाह यांना लेबनॉनमध्ये विशेषत: शिया समुदायातील लोकांनी विशेष स्थान दिले आहे. परंतु लेबनीज राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या हिजबुलला एक शक्तिशाली घटक म्हणून स्थान दिल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही केली जाते. इराणबरोबरच्या संबंधामुळे लेबनॉनचे इतर अरब देशांबरोबरचे संबंध आणखी ताणले गेले आहेत.